400 किलो गोमांस जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
संगमनेर (प्रतिनिधी)- राज्यात गोवंश जनावरांची कत्तल करण्यास बंदी असतांना देखील संगमनेरात जमजम कॉलनी येथील कत्तलखान्यात सर्रास गोवंश जनावरांची कत्तल सुरू आहे. या कत्तलखान्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने बुधवारी 4.45 वाजेच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यात सात बैल व दोन गायी या जनावरांची सुटका करून 400 किलो गोमांस पोलिसांनी जप्त केले.
संगमनेरातील जमजम कॉलनी येथे लाला कुरेशी व सुफियान कुरेशी यांच्या वाड्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांना मिळाली. त्यांच्या आदेशानुसार पोलीस नाईक श्यामराव हासे, शांताराम मालुंजकर, संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अमित महाजन, पोलीस कॉन्स्टेबल श्री. बोडखे, श्री. आढाव या पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला.
याबाबत पोलीस नाईक रमेश लबडे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सुफियान नसीर कुरेशी, लाला रज्जाक कुरेशी (दोघे रा. मदिनानगर, संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री. आरवडे करीत आहेत.
या छाप्यात सुमारे 80 हजार रुपयांचे 400 किलो गोमांस जप्त करण्यात आले असून सात बैल प्रत्येकी 20 हजार रुपये किमतीचे असे एकूण एक लाख 40 हजार रुपयांची जनावरे तर दोन गायी प्रत्येकी 20 हजार रुपयांची असे एकूण 40 हजार रुपये, असा एकूण दोन लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.