Saturday, November 16, 2024
Homeब्रेकिंग न्यूजगावठी दारू हातभट्टीवर छापा; लाखो रुपयांचे रसायन केले नष्ट

गावठी दारू हातभट्टीवर छापा; लाखो रुपयांचे रसायन केले नष्ट

घोटी | जाकीर शेख Ghoti

घोटी पोलीस ठाणे हद्दीतील शेवगेडांग येथील जंगलात गावठी दारू अड्डयावर घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्यासह पोलीस पथकाने धाड टाकुन सुमारे ३ लाख ७८ हजार रुपयांचे गावठी दारूचे रसायन व साहित्य जागेवरच नष्ट केले.

- Advertisement -

पोलीसांच्या धाडीमुळे गावठी दारू तयार करणाऱ्यांनी आता आपला मोर्चा जंगलात वळविला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांना मिळताच शेवगेडांग शिवारातील बिंड्या डोंगराच्या मध्यभागी असलेल्या जंगलातील वनविभागाच्या हद्दीतील झाडा झुडपांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा गावठी दारू बनविण्याचे काम सुरू असतांना या ठिकाणी धाड मारली.

या धाडीत ४५ ड्रममध्ये रसायन भरलेली गावठी दारू, २०० लिटरचे दोन लोखंडी ड्रम, जळावु लाकडे, प्लास्टीक ड्रम, ॲल्युनियचे पातेले असा ३ लाख ७८ हजार रुपयांचे साहित्य व गावठी दारू पोलीसांनी जागेवरच नष्ट केली. या प्रकरणी बुग्गा काळु पारधी, रा. टाकळीची वाडी, शेवगेडांग, तालुका इगतपुरी याच्या विरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तालुक्यातील गावठी दारू भट्ट्या समुळ नष्ट करण्यासाठी पोलीसांनी मोहीम सुरू केल्याने गावठी दारू तयार करणाऱ्यांनी आता पोलीसांचा मोठा धसका घेतला आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रवीन उदे, पोलीस हवालदार संतोष नागरे, पराग गोतूरणे, राजाराम दगळे, गौरव सोनवणे यांनी केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या