Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशरेल्वे सेवा टप्प्याटप्प्याने होणार सुरु

रेल्वे सेवा टप्प्याटप्प्याने होणार सुरु

नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात 21 दिवसांसाठी लॉकडाउन करण्यात आल्याने सध्या रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद आहे. मात्र, लॉकडाउन संपल्यानंतर टप्प्याटप्प्याने सेवा पूर्ववत करण्यासाठी रेल्वेकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. याबाबत एका वेबसाईटने वृत्त दिले आहे. मात्र, यावर अद्याप केंद्र सरकारकडून कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही.

लॉकडाऊन संपल्यानंतर काय करायचं याबाबत सरकारच्या आदेशाची रेल्वे बोर्ड वाट पाहत आहे. मात्र, तत्पूर्वी रेल्वे मंत्रालयाने विभागीय रेल्वे बोर्डांना रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्याच्या नियोजनाबाबत विचारणा केली आहे. यामध्ये 14 एप्रिलनंतर टप्प्याटप्प्याने रेल्वे वाहतूक सुरु करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. तसेच याबाबतचा अहवाल रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यासही सांगितले आहे. या माहितीला रेल्वे झोन्सच्या अधिकार्‍यांनी पुष्टी दिल्याचे समजते.
रेल्वे विभागांनी तयारीत रहाण्याच्या सूचना आम्हाला रेल्वे मंत्रालयाकडून मिळाल्या आहेत. दरम्यान, जर विभागीय मंडळांकडून सुरुवातीला 25 टक्के सेवा सुरु करुन त्यानंतर टप्प्याटप्प्याने ती 50 टक्क्यांपर्यंत नेण्याची क्षमता असेल तर त्याबाबत रेल्वे मंत्रालयाला सूचित करण्याचे या विभागीय मंडळांनी निश्चित केले आहे. मात्र, हे सर्व सरकारच्या लॉकडाउनच्या धोरणावर अवलंबून आहे.

- Advertisement -

लॉकडाऊननंतर रेल्वेने आपल्या सर्व सेवा 22 मार्च 2020 च्या मध्यरात्रीपासून बंद केल्या आहेत. फक्त या काळात ज्या रेल्वे गाड्या त्यांच्या शेवटच्या स्टेशनपर्यंत पोहोचल्या नव्हत्या त्यांना तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी परवागनी देण्यात आली होती. दरम्यान, 15 एप्रिलपासून शंभर टक्के रेल्वे सेवा सुरु करण्याबाबत अद्याप मंत्रालयाशी बोलणं झालं नसल्याचे विभागीय मंडळातील अधिकार्‍यांनी सांगितलं आहे. तरी लॉकडाऊन संपल्यास 15 तारखेपासून 13,000 ट्रेन्स सुरु होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या