Friday, November 22, 2024
Homeनगररेल्वे गाड्यांना थांबा मिळण्यासाठी पुणतांबेकर पुन्हा आंदोलन करणार

रेल्वे गाड्यांना थांबा मिळण्यासाठी पुणतांबेकर पुन्हा आंदोलन करणार

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर सर्व गाड्यांना थांबा मिळावा घ्या मागणीसाठी पुणतांबेकरांनी 15 ऑगष्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रेल रोको आंदोलन केले होते. रेल्वेच्या अधिकारी वर्गाने आंदोलकांच्या मागण्या मान्य करत महिनाभरात मागणीतील सर्व रेल्वे सुरू होतील व त्यांना थांबा मिळेल, असे आश्वासन दिलेले होते. परंतु एक महिना उलटून गेला तरीही तिकीट घर तसेच कोणत्याही रेल्वे गाड्यांना पुणतांबा येथे थांबा नाही. त्यामुळे ग्रामस्थ वर्गामध्ये नाराजी पसरलेली आहे. आता या मागणीसाठी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

पुणतांबा ऐतिहासिक रेल रोको आंदोलनामध्येआंदोलकांनी आंदोलनास शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने सुरुवात केली होती. या ऐतिहासिक रेल रोको आंदोलनामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांसह, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पुणतांबा ग्रामस्थ, शेतकरी, गणेश मंडळातील कार्यकर्ते आपले सर्व व्यवहार बंद ठेवून पुणतांबा बंदला प्रतिसाद देणारे व्यापारी वर्ग, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रेल्वे पोलीस व महाराष्ट्र पोलीस यांचा खूप मोठ्या प्रमाणात ताफा पुणतांबा रेल्वे स्टेशनवर होता. अतिशय शांत पद्धतीने पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी रखरखत्या उन्हामध्ये जवळपास तीन तास ऐतिहासिक रेल रोको मधील मागण्या पूर्ण होईपर्यंत रेल्वे प्रशासनाच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आंदोलकांनी शांततेत आंदोलन केले होते. रेल्वेचे बेलापूर येथील प्रशासकीय अधिकारी यांनी अमरावती एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस या गाड्यांना थांबा मिळेल असे वरिष्ठांशी चर्चा करून सांगितले होते.

परंतु आंदोलन करताना आपल्या मागण्या संपूर्ण मान्य पाहिजे या कारणाने जवळपास तीन तास आंदोलन सुरू ठेवले. त्यानंतर वरिष्ठांशी रेल्वे प्रशासनाची चर्चा झाल्यानंतर दादर-शिर्डी एक्सप्रेस, झेलम एक्सप्रेस, काकीनाडा एक्सप्रेस, विशाखापट्टणम एक्सप्रेस या गाड्यांना पुणतांबा येथे थांबा मिळणे आवश्यक होते. ग्रामपंचायत प्रशासन व कोर कमिटीने या प्रमुख मागण्या संदर्भात चर्चा करण्यासाठी 21 ऑगस्ट रोजी नियोजन बैठक आयोजित केलेली होती. रेल्वे प्रशासकीय अधिकारी इंदू दुबे यांच्या गैरहजेरीत पुणतांबा कोर कमिटीतील सदस्यांची मीटिंग झाली. परंतू त्यामधून काहीही निष्पन्न झाले नाही. म्हणून कोर कमिटीने पुन्हा रेल्वे अधिकार्‍यांशी पत्रव्यवहार करून त्यांना सुचित केले की, जर येत्या काही दिवसात मागणीतील गाड्या सुरू झाल्या नाही तर 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी पुन्हा समस्त गावकर्‍यांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.

सदर पत्रामध्ये पुणतांबा जंक्शनवर शिर्डी येथे जाण्याकरिता व येण्याकरिता सर्व रेल्वे गाड्या थांबतील. पुणे दौंड-मनमाड मार्गावर अमरावती एक्सप्रेस महाराष्ट्र एक्सप्रेस यांना थांबा पुणतांबा येथे मिळेल. गेट क्रमांक 58 येथील रेल्वेने बांधकाम केलेल्या अंडरपास याची व्यवस्थित व्यवस्था करावी. जुने बंद असलेले पुणतांबा रेल्वे गेट पुन्हा सुरू करावे, गेट नंबर 57 वर विनाकारण बनविण्यात आलेले अवाढव्य स्पीडब्रेकर काढून टाकावेत. गेट नंबर 57 वर अंडरपासची व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून पुणतांबा तीर्थक्षेत्र असल्यामुळे येणार्‍या जाणार्‍या भाविक भक्तांना समस्येला तोंड द्यावे लागणार नाही. जर वरील मागण्या मान्य झाल्या नाही तर 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी पुणतांबा व पंचक्रोशीतील ग्रामस्थ पुन्हा आंदोलनासाठी बसतील, असा इशारा ग्रामस्थांनी पत्राद्वारे अधिकार्‍यांना दिला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या