राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अतितिव्र दाबाच्या क्षेत्रात परीवर्तीत होत असल्याने, 21 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर पर्यंत अहिल्यानगरसह महाराष्ट्राच्या बहुतांश भागात ढगाळ हवामान असणार आहे. 23 सप्टेंबरला हे चक्रीवादळ आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणमच्या किनारपट्टीला येईल. 26 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सिमावर्ती भागात पोहचेल. तेथुन त्याचा प्रवास थेट उत्तरेकडे प्रयागराज, दिल्ली आणि हिमालय असा राहिल, असा अंदाज जलसंपदा चे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता तथा हवामान अभ्यासक उत्तमराव निर्मळ यांनी व्यक्त केला.
निर्मळ म्हणाले, या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे नागपूर तसेच पूर्व विदर्भात मुसळधार तसेच काही भागात अतिवृष्टी सदृश्य विजेच्या कडकडाट व मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होईल. दरम्यानच्या काळात अरबी समुद्रातून बाष्प खेचले जाऊन कोकणपट्टी जोरदार वार्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो. घाटमाथ्यावर हलक्या स्वरुपात पाऊस पडेल. अहिल्यानगरसह पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात अंशतः ढगाळ वातावरण राहील. 22 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर पर्यंत स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी दुपारनंतर अर्धा-पाऊण तास विजेचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वळीव पावसासारखी वाहवणीची जोरदार पर्जन्यवृष्टी होईल. मात्र हा पाऊस सर्वदुर असणार नसून त्याची भौगोलिक व्याप्ती 10 ते 15 टक्के इतकीच असेल. 26 सप्टेंबरनंतर पावसाचा जोर काहीसा ओसरण्याची शक्यता असून त्यानंतर तापमानात आणि उकाड्यात काही प्रमाणात वाढ होईल.
खरीप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात आलेल्या या पावसामुळे बहुतांश खरीप पिकांना काहीच फायदा होणार नाही. कारण जवळपास दिड महिना पावसाचा खंड पडल्याने खरीप पिके पाण्याअभावी करपून गेली आहेत. तसेच वारंवार खंडीत होणार्या विजेमुळे पाणी असूनही पिकांना वेळेत देता न आल्याने पिकांच्या सरासरी उत्पादनात जवळपास 50 टक्के घट होणार आहे. तग धरुन सुस्थितीत उभ्या असलेल्या पिकांना या पावसामुळे काहीसा तात्पुरता आधार मिळेल. या पावसामुळे भुजलपातळीत वाढ होण्याची मुळीच शक्यता नसल्याने येत्या रब्बी हंगामावर सुद्धा पाणी टंचाईचे सावट असणार आहे. 19 सप्टेंबरला राजस्थानमधून मान्सूनची माघार सुरु झाली असून महाराष्ट्रातून 8 ते 9 ऑक्टोंबरला तो माघारी जाईल. परतीच्या पावसावर एल निनोचा प्रभाव असणार आहे.
आय. ओ. डी. 0.61 अंश सेल्सिअस म्हणजे सकारात्मक असला तरी मान्सुन काळ संपत आल्याने त्याची उपयुक्तता राहिलेली नाही. एम. जे. ओ सध्या फेज 8/1 मध्ये असल्याने त्याचा आपल्याकडे प्रभाव असणार नाही. सध्या मध्य प्रशांत महासागरातील विषुववृत्तीय 3.4 क्षेत्रातील एल – निनोचे तापमान 2.51 अंश सेल्सिअस झाले असून जानेवारी पर्यंत तो 4.1 अंश सेल्सिअस या अतितिव्र (सुपर एल निनो ) पातळीवर जाण्याची शक्यता आहे. एल निनोची 0.5 वरुन 4.1 अंश सेल्सिअसकडे वेगाने होणारी वाटचाल ही परतीच्या मान्सूनला प्रभावित करणार असल्याने आगामी हंगामाच्या दृष्टीने चिंतेची बाब असेल. ओढे-नाले वाहतील, खरीप/रब्बी पिके जोमात येतील, अशी अपेक्षा असताना महाराष्ट्राच्या जवळपास 18 जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे. सध्याचा पाऊस हा स्थानिक स्वरुपाचा मर्यादित ठिकाणी असल्याने दुष्काळी परिस्थितीमधे काहीच सुधारणा होणार नाही.
पावसाची जिल्हावार सरासरी आणि जिल्ह्यातील विविध क्षेत्रिय भागात पडलेला पाऊस यात कमालीची तफावत आहे. जिल्ह्याच्या काही भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस तर काही भागात 40 ते 60 टक्के तुट इतके टोकाचे वितरण दिसते. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या एकात्मिक उपाययोजनात ही वस्तुस्थिती नजरअंदाज करता येणार नाही.
– उत्तमराव निर्मळ, सेवानिवृत्त अभियंता जलसंपदा




