Monday, June 8, 2026
HomeनगरAhilyanagar : पावसाच्या प्रतीक्षेत 55 हजार क्विंटल बियाणे दुकानांतच!

Ahilyanagar : पावसाच्या प्रतीक्षेत 55 हजार क्विंटल बियाणे दुकानांतच!

बळीराजाच्या नजरा अभाळाकडे || आजपासून मृग नक्षत्र सुरू

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

आज 8 जूनपासून सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश होत असून संपूर्ण जिल्ह्याला आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. काही भागांत तुरळक सरी कोसळल्या असल्या तरी अद्याप सर्वदूर मोठा पाऊस झालेला नाही. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होत असला, तरी पावसाने हुलकावणी दिल्याने खरिपाचे गणित रखडले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 55 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले असले, तरी पाऊस नसल्याने हे बियाणे व्यापार्‍यांच्या दुकानांतच पडून आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात यंदा सुमारे साडेसात लाख हेक्टरवर खरीप हंगामाच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, जोपर्यंत समाधानकारक पाऊस होत नाही, तोपर्यंत पेरण्या करणे शक्य नसल्याने खरिपाचे भवितव्य सध्यातरी अंधारात आहे. त्यामुळे कृषी विभागाचीही चिंता वाढली आहे. यंदा सुरुवातीपासूनच पावसाचे चिन्ह धूसर असल्याने कृषी विभागाच्या खरीप नियोजनाचा वेग मंदावलेला दिसला. त्यातच जूनचा पहिला आठवडा उलटला तरी मोठा पाऊस न झाल्याने बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले, तरी त्याचा कोणताही ठोस परिणाम अद्याप अहिल्यानगर जिल्ह्यात दिसून आलेला नाही.

दरम्यान, जिल्ह्यासाठी कृषी विभागाने शासनाकडे 92 हजार 463 क्विंटल बियाण्यांची मागणी केली होती. त्यापैकी 54 ते 55 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. मात्र, पेरणीयोग्य पाऊस नसल्याने यातील 95 टक्के बियाणे सध्या दुकानांमध्येच पडून आहे. दुसरीकडे, 15 जूननंतर राज्यात पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने, यंदा खरिपाची पेरणी वेळेत होणार की नाही? अशी भीती शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे. हवामान खात्याने जिल्ह्यात दोन दिवस पावसाचा अंदाज दिला असला, तरी प्रत्यक्षात पाऊस पडल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवता येणार नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

अहिल्यानगर जिल्हा हा प्रामुख्याने रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. गेल्या वर्षी नगर दक्षिण भागात अतिवृष्टीमुळे पेरण्या वाया गेल्या होत्या, तर यंदा पावसाअभावी पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. विशेषतः नगर दक्षिण भागात कडधान्यांचे क्षेत्र मोठे असून, या पिकांसाठी मान्सूनपूर्व किंवा सुरुवातीचा पाऊस अत्यंत आवश्यक असतो. हा पाऊस लांबल्यास कडधान्य पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

उपलब्ध झालेले बियाणे (क्विंटलमध्ये) :
सोयाबीन: 30,473 क्विंटल
मका: 11,323 क्विंटल
भात: 4,630 क्विंटल
उडीद: 3,632 क्विंटल
कपाशी: 1,964 क्विंटल
तूर: 1,460 क्विंटल
मूग: 1,270 क्विंटल
बाजरी: 678 क्विंटल

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कर्जमाफीसाठी कर्जखात्यांची पडताळणी सुरू

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या याद्यांची पडताळणी शासकीय लेखापरीक्षकांनी (ऑडिटर्स) सुरू केली आहे. येत्या 20 जूनपर्यंत...