अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या याद्यांची पडताळणी शासकीय लेखापरीक्षकांनी (ऑडिटर्स) सुरू केली आहे. येत्या 20 जूनपर्यंत ही पडताळणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सहकार विभागाच्या आदेशानुसार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शंभरहून अधिक शासकीय लेखापरीक्षक गाव आणि संस्थांनिहाय (सोसायटी) माहितीची तपासणी करत आहेत.
जिल्हा बँकेने शासनाला सादर केलेल्या कर्जखात्यांमधील शेतकर्यांचे नाव, बँक खाते क्रमांक, पॅन कार्ड, अॅग्रीस्टॅक आणि आधार कार्ड या तपशीलासह त्यांच्या कर्ज रकमेची पडताळणी केली जात आहे. या छाननीनंतर पात्र शेतकर्यांची माहिती अंतिम मंजुरीसाठी कर्जमाफीच्या पोर्टलवर अपलोड केली जाईल. कर्जमाफी योजनेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी गेल्या आठवड्यात सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील उपनिबंधक व जिल्हा बँकांच्या अधिकार्यांना विशेष प्रशिक्षण दिले होते. यामध्ये कर्जमाफीची माहिती वेळेत अपलोड करणे, पात्र शेतकर्यांच्या याद्यांचे प्रमाणीकरण, मूळ कर्ज रक्कम आणि बँकेने आकारलेले व्याज या बाबी तपासून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या मोहिमेला रविवारपासून सुरुवात झाली असून, जिल्हा बँकेत लेखापरीक्षकांकडून प्रत्यक्ष पडताळणीचे काम वेगाने सुरू आहे.
कर्जमाफीच्या यादीकडे नजरा
शासनाने जाहीर केलेल्या नवीन कर्जमाफीत जिल्ह्यात केवळ 50 हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार्या शेतकर्यांची संख्या सर्वाधिक असणार आहे, तर दोन लाखांपर्यंत पूर्ण कर्जमुक्ती मिळणार्या शेतकर्यांचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. यामुळे बडे थकबाकीदार शेतकरी या नियमित कर्जमाफीतून मुकणार का? असा मोठा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. नियमांमधील या मोठ्या बदलामुळे ज्या शेतकर्यांवर सध्या मोठे कर्ज आहे किंवा जे बडे थकबाकीदार आहेत, त्यांना या योजनेचा पूर्ण फायदा मिळणार की नाही, याबद्दल शंका निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, शासनाच्या कर्जमाफीच्या अधिकृत यादीत आपले नाव येणार की नाही आणि आल्यास किती लाभ मिळणार, हे पाहण्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्यांच्या नजरा आता सरकारच्या आगामी कर्जमाफी यादीकडे लागल्या आहेत.




