कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargaon
कोपरगाव नगरपालिकेच्या मालकीच्या सर्व्हे क्रमांक 215 मधील ज्या पत्र्याच्या शेडमध्ये गोमांस विक्री होत होती त्या जागेवर पोलीस बंदोबस्तात नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. कोपरगाव शहरातील संजयनगर, आयेशा कॉलनी परिसरामध्ये गोवंश कत्तल होत असल्याच्या आरोपानंतर मागील काही दिवसांपूर्वी नगरपरिषदेच्यावतीने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने त्या भागात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली आणि ज्या ज्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केलेल्या आहे ती ठिकाणे उध्वस्त करण्यात आली होती. परंतु ज्या पत्र्याच्या शेडमध्ये गोमांस विक्री होत होती ते मात्र तसेच होते. त्यानंतर कोपरगाव शहरातील हिंदुत्वाची संघटना आक्रमक झाल्या. त्यांनी पालिका प्रशासनाला निवेदन देत सदर शेड तात्काळ हटवण्याची मागणी केली कारवाई न झाल्यास 6 जून रोजी कोपरगाव शहर बंदची हाक देण्यात आली होती.
मात्र पोलीस बंदोबस्त अभावी 5 जून रोजी कारवाई करता आली नसल्याचे प्रशासनाने सांगितल्यानंतर सहा जून रोजी कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर हिंदुत्वाची संघटनांनी पुकारलेला बंद स्थगित केला होता. यावेळी अतिक्रमण धारकांनी रात्रीपासून आपली अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. उरलेली अतिक्रमणे नगरपरिषदेच्या बुलडोजरने जमीनदोज केली आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कोपरगाव नगरपालिकेच्या मालकीच्या सर्व्हे क्रमांक 215 मधील जागेवर पोलीस बंदोबस्तात कोपरगाव नगरपालिकेच्यावतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली.
मात्र या कारवाईबाबत सकल हिंदू समाज समाधानी नसल्याचे संतोष गंगवाल म्हणाले. यावेळी गंगवाल म्हणाले, आम्हाला सर्व्हे क्रमांक 215 मधील संपूर्ण 22 गुंठे जागेवरील सर्व अतिक्रमण हटविणे अपेक्षित होते. मात्र झालेली कारवाई अपुरी असून उर्वरित अतिक्रमणांवरही प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, असे सांगितले. याबाबत त्यांनी मुख्याधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून विचारणा केली असता, संबंधित 22 गुंठे जागेची मोजणी करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे मुख्याधिकार्यांनी सांगितल्याची माहिती गंगवाल यांनी दिली आहे.
यावेळी गंगवाल म्हणाले की,आंब्याच्या पेट्यांमधून गोमांसाची विक्री व वाहतूक केली जात असल्याचा गंभीर आरोप करत गौप्यस्फोट केला आहे. तसेच, हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याचे काम कोणी करत असेल तर त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी हिंदू समाज कायम तत्पर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले असून अतिक्रमण हटाव कारवाईवर सकल हिंदू समाज असमाधानी व 22 गुंठे जागेवरील सर्व अतिक्रमण हटविण्याची मागणी कायम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.




