Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्याराज्याच्या अनेक भागात पावसाची हजेरी

राज्याच्या अनेक भागात पावसाची हजेरी

पुणे । प्रतिनिधी Pune

आता मान्सूनची प्रतीक्षा संपली असून राज्याच्या अनेक भागांत पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, मुंबईसह अनेक भागात काल सकाळी पाऊस सुरू झाला असून शेतकर्‍यांसह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

बंगालच्या उपसागरात ओडिसा, पश्चिम बंगालपर्यंत चक्रिय स्थिती तसेच अरबी समुद्रात गुजरातच्या किनारपट्टीपर्यत हवेच्या वरच्या भागात चक्रिय स्थिती तयार झाली आहे. या दोन्ही स्थितीमुळे मान्सूनने शनिवारी अलिबाग, मुंबई, कोल्हापूर, पुणे, नागपूरपर्यत धडक मारली. येत्या चोवीस तासात उर्वरित महाराष्ट्र व्यापणार आहे. तसेच 28 जूनपर्यत राज्यात चांगला पाऊस होणार आहे.

पुणे हवामान शास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी ही माहिती दिली. येत्या 24 तासांत पुणे, मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात मोसमी वारे पोहचणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. बुधवारपर्यंत (28 जून) राज्यातील विदर्भ आणि कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

बिपरजॉय चक्रीवादळाने मोसमी वार्‍यांच्या प्रवासास आवश्यक असलेले सर्व बाष्प खेचून घेतल्याने सुमारे दहा ते बारा दिवसांपासून कोकणातील रत्नागिरीच्या भागात मान्सूनच्या प्रगतीत अडथळा निर्माण झाला होता. मात्र, शुक्रवारी बंगालच्या उपसागरात तयार आलेल्या चक्रिय स्थितीमुळे या वार्‍यांनी झपाट्याने प्रगती करत विदर्भापर्यंत मजल मारली. शनिवारी त्यामध्ये आणखी वाढ होऊन कोल्हापूर, अलिबाग आणि नागपूरपर्यंत मान्सूनने धडक मारली.

दरम्यान, पूर्व मध्य अरबी समुद्र ते म्यानमारपर्यंत 40 ते 45 आणि त्यानंतर 65 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. मात्र त्याचा परिणाम मोसमी वार्‍यांवर होण्याची शक्यता नाही. 28 जूनपर्यंत विदर्भात वादळी वार्‍यासह मुसळधार, तर कोकणात अतिमुसळधार याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पोषक स्थितीमुळे मोसमी वार्‍यांनी मध्य अरबी समुद्र, कर्नाटकचा काही भाग, तेलंगंण, छत्तीसगड, मध्य प्रदेशाचा बहुतांश भाग, उत्तर प्रदेशाचा काही भाग, उत्तराखंडचा बराचसा भाग व्यापून पुढे हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाखपर्यंत शनिवारी धडक मारली. पुढील 24 तासात बिहार, छत्तीसगडचा उर्वरित भाग, दिल्ली, गुजरात राजस्थान, पंजाब या भागात पोहचणार आहे.

मोसमी वार्‍यांच्या पुढील वाटचालीसाठी सध्या पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामध्ये उत्तरपूर्व बंगालचा उपसागर ते ओडिसा तसेच पश्चिम बंगालपर्यत चक्रीय स्थिती कार्यरत आहे. या चक्रीय स्थितीचे 24 तासांत कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होणार आहे. याबरोबरच उत्तरपूर्व अरबी समुद्र ते गुजरातच्या किनारपट्टीपर्यंत चक्रीय स्थिती आहे. या दोन्ही स्थितीमुळे मोसमी वारे पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती आहे.

नाशिक जिल्ह्याच्या काही भागातही बरसला

नाशिक जिल्ह्याच्या काही भागातही आज पावसाने हजेरी लावली. नांदगाव, येवला, नाशिकरोड, देवळाली कॅम्प भागात हजेरी लावली. गेल्या महिनाभरापासून गायब असलेल्या पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. यंदा मृग नक्षत्राने वाट पहायला लावून शेवटी हुलकावणीच दिली. मात्र आर्द्रा नक्षत्राकडे बळीराजाच्या नजरा लागून होत्या. आभाळ भरून येताना दिसत नसल्याने आर्द्रा पण हुलकावणी देतो की काय, असा प्रश्न शेतकर्‍यांना सतावत होता.

असा आहे अंदाज

हवामान खात्याच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात पुढच्या 5 दिवसांत मान्सून सक्रिय होईल तर येत्या 5 दिवसांमध्ये जोरदार पाऊस बसेल अशी माहिती आहे. के. एस. होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटनुसार कोकण आणि विदर्भात काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या