Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज-का-रण - अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी…

राज-का-रण – अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी…

नाशिक । शैलेंद्र तनपुरे – सल्लागार संपादक

महायुतीतील भाजप आणि शिंदे शिवसेना या दोन्ही पक्षांचा विस्तार कार्यक्रम पालिका निवडणुकीत ऐरणीवर येईल तेव्हा महाजनांपेक्षा सुधाकर बडगुजरांची अधिक कसोटी लागेल. कारण जुने नेते, आमदार आदी पक्षाचे नाक दाबण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच बडगुजर पुराणामुळे काही दिवसांनी ‘अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी’, असे म्हणण्याची वेळ भाजपवर येऊ नये म्हणजे मिळवली.

- Advertisement -

झाला.. अखेर सुधाकर बडगुजर यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला. संपूर्ण राज्यभरात चर्चेचा झालेला हा प्रवेश सोहळा अजूनही गाजतोय. पंधरा दिवसांपूर्वी याच सदरात ‘कोण हो, हे सुधाकर बडगुजर!’ हा लेख लिहिल्यानंतर पुन्हा एकदा याच विषयावर लिहावे लागत असले तरी मधल्या काळात भाजपसह सर्वच पक्षांत बर्‍याच करामती झाल्याने त्याचा उहापोह करणे गरजेचे ठरले. या मधल्या काळात राज्यभरातील माध्यमांनाही बडगुजरांचे वेगवेगळे कौशल्य लक्षात आल्याने नंतर सर्वांनीच त्यांना केंद्रस्थानी ठेवून या प्रवेशाच्या बातम्या दिल्या. बडगुजर यांचा पक्षातील प्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष यांनाच माहिती नसणे, बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री बबन घोलपांसह अनेक नगरसेवकांनी प्रवेश करणे, आमदार सीमा हिरे यांनी आपला विरोधाचा बाणा कायम ठेवत चालू ठेवलेला निषेध, बडगुजरांना दहशतवादी ठरवून विधिमंडळात त्यांच्या कर्तृत्वाची पिसे काढणार्‍या नितेश राणेंचे घूमजाव करत बडगुजरांचा हिंदुत्ववादाकडे सुरू झालेल्या प्रवेशाचे स्वागत करणे, ‘सलीम कुत्ताबरोबरच्या व्हिडिओ प्रकरणात एसआयटीला नंतर काहीच आढळले नाही. आता बडगुजर भाजपच्या शिस्तीत राहतील’ या शब्दात मुख्यमंत्र्यांची स्वागताची भाषा, बडगुजरांना इतके दिवस डोक्यावर घेऊन नाचणारे संजय राऊत यांची ‘आता भाजप दाऊदलाही पक्षात घेतील’ ही शेलकी टीका याशिवाय सामान्य कार्यकर्त्यांकडूनही झालेला बराच हंगामा अशा बर्‍याच घडामोडी घडल्याने या विषयाला पुन्हा हात घालणे क्रमप्राप्त झाले.

YouTube video player

सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश एवढा गाजतोय, कारण बडगुजर यांचा दाऊदचा कथित सहकारी सलीम कुत्ता याच्याबरोबर नृत्य करतानाचा व्हायरल झालेला व्हिडिओ! भाजपच्या कथनी व करणीतील फरकाचा हा उत्तम नमुना असल्याने साहजिकच पक्षातील नेत्यांसह विरोधकही तुटून पडले. काही महिन्यांपूर्वीच विधानसभेच्या समरांगणात भाजपच्या सीमा हिरे यांच्याविरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी करणारे सुधाकर बडगुजर यांचा सलीम कुत्ता याच्यासोबतचा व्हिडिओ बाहेर आला आणि भाजपने राज्यभर त्याचे भांडवल केले. हा व्हिडिओ व्यंकटेश मोरे नावाचे भाजपचेच कार्यकर्ते यांनी तेव्हा व्हायरल केला होता. तत्पूर्वी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊ येथील कसिनोत जुगार खेळतानाचा व्हिडिओ बाहेर आला होता. हा व्हिडिओ संजय राऊत यांनी मुंबईत दाखवला असला तरी तो प्रत्यक्षात याच बडगुजर यांनी त्यांना दिला होता, अशी तेव्हा चर्चा होती. या व्हिडिओला उत्तर म्हणून बडगुजर यांचा सलीम कुत्ताबरोबरचा व्हिडिओ भाजपने बाहेर काढला. हे व्हिडिओ युद्ध तेव्हा चांगलेच गाजले.

कुत्ताबरोबरचा व्हिडिओ 2015 सालातील असल्याचे स्पष्टीकरण तेव्हा बडगुजर यांनी दिले होते. सलीम कुत्ता याच्या वाढदिवसासाठी बडगुजर यांच्याच फार्महाऊसचा वापर झाला आणि दस्तुरखुद्द बडगुजर तेथे हजर होते, त्यांनी कुत्ताबरोबर नृत्यही केल्याचा आरोप होता. यानंतर नितेश राणे यांनी विधिमंडळात या प्रकरणाची चिरफाड केली. देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीची घोषणा केली. निवडणुकीच्याच काळात बडगुजर यांचे चिरंजीव दीपक यांनाही एका प्रकरणात गोवण्यात आले. त्याच्यावर मोक्का लागला. प्रचारकाळात दीपक बाहेर राहावा म्हणून हे कारस्थान केले गेल्याचा आरोपही तेव्हा बडगुजर यांनी केला होता. एवढेच नव्हे तर कुत्ता प्रकरणात पोलिसांनीही त्यांची चौकशी केली होती. पुढे साहजिकच बडगुजर पडले. सीमा हिरे विजयी झाल्या. तत्पूर्वीच बडगुजर यांना मित्र पक्षांनाही दुखवून दिली गेलेली उमेदवारी याबद्दल शिवसेना उद्धव ठाकरे गटात नाराजी होतीच. संजय राऊत त्यांना देत असलेली विशेष वागणूक हा समस्त संघटनेत केवळ चर्चेचा नव्हे तर असुयेचाही भाग बनला होता. साहजिकच त्यांच्या पराभवानंतर ही सारी नाराज मंडळीही सक्रिय झाली. मधल्या काळात बडगुजर यांनाही भाजपच्या चक्रव्यूहातून सुटण्यासाठी हालचाल करणे गरजेचे वाटू लागले. प्रथम त्यांनी चिरंजीवांना पद्धतशीर सोडवले. त्याच्यावरील गुन्ह्यात तसाही दम नव्हताच. परंतु सत्तेपुढे शहाणपण चालत नसते याचा स्वानुभव असल्याने त्यांनी भाजपमधीलच ‘समविचारी’ मित्रांच्या सहकार्याने संकटमोचक गिरीश महाजन यांच्याशी सूत जुळवले. पुढे काय झाले याचा इतिहास ताजा आहे.

शंभर प्लससाठी आटापिटा
बडगुजर यांचा सिडको भागात प्रभाव आहे, हे नाकारता येणार नाही. सीमा हिरे यांना उमेदवारी देऊ नये यासाठी पक्षातील किमान दीड डझन उत्सुकांनी तेव्हा मोठा राडा केला होता. दिनकर पाटील यांनी तर पक्षाचाच त्याग करून मनसेची उमेदवारी करण्यात धन्यता मानली. पक्षाने मात्र असंतुष्टांची फिकीर न करता सीमा हिरे यांनाच उमेदवारी दिली. पुढे काही नाराजांचे मन वळवण्यात आले. विशेष म्हणजे पक्षाचे शहरातील सर्वात ज्येष्ठ नेते व स्वयंभू चाणक्य लक्ष्मण सावजी यांचाही या नाराजांना उघड पाठिंबा होता. साहजिकच यावेळेस सीमा हिरेंचे काही खरे नाही, असेच वातावरण तयार झाले. प्रत्यक्षात त्या मोठ्या फरकाने विजयी झाल्या. पण तरीही महापालिका जिंकायची असेल तर त्यासाठी काहीतरी वेगळे करावे लागेल याची जाण महाजनांना आली होती. सातपूर भागात सातत्याने विजयी होणारे दिनकर पाटीलदेखील पक्ष सोडून गेल्याने शंभर प्लससाठी तातडीने काही हालचाल करण्याची गरज अधोरेखित झाली. नेमक्या याचवेळेस बडगुजरही नव्या साथीदाराच्या शोधात होते.

‘समसमा संयोग की जाहला’ अशीच ही परिस्थिती! दीपक बडगुजरवरील मोक्का हटला. नंतर जामीनही झाला आणि साहजिकच सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग प्रशस्त व्हायला सुरुवात झाली. सीमा हिरे व काही लोक विरोध करतील याचे भान महाजन यांना नक्की होते, पण त्याचवेळी त्यांना हेदेखील माहीत होते की विधानसभा निवडणुकीवेळी साधारण अशीच परिस्थिती असताना समस्त नाराजांच्या नाकावर टिच्चून सीमा हिरेंनाच उमेदवारी देऊन त्यांना आपण कसे विजयी केले. त्यामुळेच महाजन यांनी या विरोधाची फिकीर केली नाही, आजही करीत नाहीत. त्यांच्याच भरवशावर देवेंद्र फडणवीसांनीही मम म्हटले हे उघड आहे. येथपर्यंत तर सारे ठीक. पण खरी लढाई पुढेच आहे. बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला अपेक्षेहून अधिक विरोध पक्षांतर्गत पातळीवर होत आहे. विशेष म्हणजे पक्षाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांबरोबरच राज्यभरातील भाजप हितचिंतक व सहानुभूतीदारांकडूनही उघड विरोध होत आहे. काहींनी तर समाज माध्यमांवर नावानिशी लेख लिहून, ‘देवेंद्रजी, या पापाला क्षमा नाही’, असा इशारा दिला आहे. अर्थात यातूनही मार्ग काढू, असा महाजनादी नेत्यांना विश्वास आहे.

घोलपांसाठी पायघड्या
बडगुजर यांच्या समवेत माजी मंत्री बबनराव घोलप व असंख्य माजी नगरसेवकांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपला जवळ केले. नियतीचा फेरा बघा. एकेकाळी हेच बडगुजर काही कामांसाठी घोलप यांच्या मिनतवार्‍या करायचे. आज घोलपांना बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करावा लागला. युती सरकारच्या पहिल्या सरकारमध्ये समाजकल्याणमंत्री असताना बबनराव घोलप यांच्यावर अनेक आरोप झाले. अण्णा हजारेंनी आंदोलन केले. अखेरीस घोलप यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. 1999 च्या निवडणुकीत भाजपने घोलप यांच्या उमेदवारीस तीव्र विरोध केला. कारण तेव्हा भाजप भ्रष्टांचा कर्दनकाळ होता. त्यामुळे अगदी युती तुटायच्या बेतात असताना शिवसेनेला नाईलाजाने घोलप यांचे पुतणे राजू ऊर्फ रविकिरण यांना उमेदवारी जाहीर करावी लागली. उमेदवारी अर्ज भरताना रविकिरण यांचा ए व बी फॉर्म ‘गहाळ’ झाला. बबनराव यांनी अपक्ष अर्ज भरला. संपूर्ण शिवसेना बबनरावांच्या प्रचारासाठी उघडपणे उतरली. अगदी राज ठाकरेदेखील प्रचाराला आले पण उघड नाही. तेव्हा घोलपांची निशाणी विमान होती. राज यांनी जाहीर सभेत घोलपांचे नाव न घेता चला विमानाने जाऊया थाटाचे वक्तव्य करून अप्रत्यक्षपणे प्रचारही केला.

गंमत बघा, तेव्हा भाजपच्या भ्रष्टाचारविरोधी विचारांचा नैतिक धाक एवढा होता की बाळासाहेब ठाकरेंनीही घोलप यांना उमेदवारी नाकारली होती. पुढे घोलप निवडून आले असले तरी चर्मोद्योग घोटाळ्यात त्यांना शिक्षा झाली. साहजिकच निवडणुकीसाठी सहा वर्षे अपात्र ठरले. त्यांचे चिरंजीव योगेश यांनी त्यांची जागा घेऊन ते निवडूनही आले. आज त्याच घोलपांसाठी भाजपने आपली दारे सताड उघडी केली. त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या. त्याकाळी भाजपचे एक से एक नेते, अगदी दौलतराव आहेर यांनीदेखील घोलपांना थेट विरोध केला होता. शांताराम तात्या आहेर यांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत ते आहेरांचे विरोधक म्हणून तेव्हा घोलपांनी त्यांना निवडून आणण्यासाठी सारी शिवसेना कामाला लावली होती. असो. आता हा इतिहास झाला. कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच राहणार. त्यामुळे इतिहास सोडा. भविष्याकडे पाहा, हा मुख्यमंत्र्यांचा संदेश अधिक बोलका आहे. या प्रवेशनाट्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत बरीच खळबळ, अस्वस्थता आहे. कार्यकर्ते गटागटाने बोलतात. वरिष्ठांजवळ आपले मन मोकळे करतात.

प्रवेश सोहळ्यास लक्ष्मण सावजी, विजय साने व बाळासाहेब सानप हे त्रिकूट आवर्जून उपस्थित होते तर पक्षाचे जिल्ह्यातील पाचही आमदार गैरहजर होते. असंख्य ‘मोठे लोक’ पक्षात आल्याने या हजेरीपटाकडे अनेकांचे दुर्लक्ष झालेले दिसते. पक्षातील हा दुर्लक्षित गट यानिमित्ताने सक्रिय झाल्याने या अस्वस्थतेत भर पडली आहे. या त्रिकुटाशी शहरातील एकाही आमदाराचे जमत नाही, हा काही योगायोग नाही. सावजी यांनी हिरेंच्या उमेदवारीला उघड विरोध करणे व बडगुजरांच्या प्रवेशाला मात्र उत्साहात हजर राहणे यातील धागे सहजच जोडता येतील. तरी अद्याप गणेश गीते यांचा प्रवेश व्हायचा आहे. त्यांच्या प्रवेशालाही आमदार राहुल ढिकले यांनी विरोध केलेला आहे. थोडक्यात काय तर हे सारे प्रवेश एकदा झाले की मग भाजपमधील अंतर्गत लढाईचे स्वरूप स्पष्ट होत जाईल. महापालिकेच्या उमेदवारी वाटपापर्यंत ही लढाई साहजिकच तीव्र होत जाईल.

विशेषत: नाशिक पश्चिम व पूर्व या विधानसभा मतदारसंघात तर शब्दश: हातघाईची होणार यात शंका नाही. शंभर प्लसचा नारा साक्षात संकटमोचकांनीच दिलेला असल्याने तेवढ्या जागा जिंकायच्या असतील तर पक्षाला सर्वच जागा लढवाव्या लागतील. त्यासाठी मग तूर्तास महायुतीला बाजूला ठेवावे लागेल. किंबहुना हे सारे जाणूनच तिकडे मित्र पक्ष शिवसेना शिंदे गटानेदेखील आपला विस्तार कार्यक्रम धुमधडाक्यात चालवला आहे. मुंबईत बडगुजरांचा सेलेब्रिटी प्रवेश सोहळा चालू असतानाच तिकडे ‘मुक्तागिरी’वरही चार माजी नगरसेवकांनी शिंदे गटाचा शिवपटका गळ्यात घातला. आतापावेतो ठाकरे गटातील पंधरा तर काँग्रेस, राष्ट्रवादीतीलही दोन-चार माजींना घेऊन शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांनी आपले हौसले बुलंद केले आहेत. एकूणच दोन्ही पक्षांचा हा विस्तार कार्यक्रम पालिका निवडणुकीत ऐरणीवर येईल तेव्हा महाजनांपेक्षा सुधाकर बडगुजरांची अधिक कसोटी लागेल. कारण जुने नेते, आमदार आदी पक्षाचे नाक दाबण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच बडगुजर पुराणामुळे काही दिवसांनी ‘अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी’, असे म्हणण्याची वेळ भाजपवर येऊ नये म्हणजे मिळवली.

ताज्या बातम्या

संपादकीय : २३ जानेवारी २०२६ – मार्ग मोकळा तर झाला..

0
राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या महापौरपदाचे आरक्षण अखेर जाहीर झाले. एकप्रकारे सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. गेली आठ वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकीय राजवट होती. त्यामुळे...