Wednesday, May 8, 2024
Homeमुख्य बातम्या'कसबा-चिंचवड' पोटनिवडणुकांचं चित्र पालटणार?; राज ठाकरें 'मविआ'ला पत्र, ‘त्या’ निवडणुकीची करून दिली...

‘कसबा-चिंचवड’ पोटनिवडणुकांचं चित्र पालटणार?; राज ठाकरें ‘मविआ’ला पत्र, ‘त्या’ निवडणुकीची करून दिली आठवण

मुंबई | Mumbai

पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांचे निधन झाले आहे. त्यामुळे या जागा रिकाम्या झाल्या असून येथे पोटनिवडणुका लागल्या आहेत.

- Advertisement -

या निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणीही सुरू झाली आहे. या मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही उमेदवार उभे करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध होण्याकरता महाविकास आघाडीला पत्र लिहिले आहे.

राज ठाकरे यांनी नेमंक काय म्हटलं?

“महाराष्ट्र विधानसभेच्या २ आमदारांच नुकतंच दुःखद निधन झालं. ह्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. मी अगदी सुरुवातीपासून ह्या मताचा आहे की, जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेंव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी. कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो.”

“अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एका उमद्या राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला दिलेली श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर, जनता देखील सहानभूती दाखवेलच असं नाही.”

“अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके ह्यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या, त्यावेळेस मी देवेंद्र फडणवीस ह्यांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आव्हान केलं होतं. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली, आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वाना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा.”

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. कसबा आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक मनसेने लढवावी अशी स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. ही मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यापर्यंत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पोहोचवलीय. त्यामुळे राज ठाकरे स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबर पोटनिवडणुकीबाबत चर्चा करण्याची शक्यता होती.

मात्र, तसे काहीही झालेले नाही. एखाद्या लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर होणारी पोटनिवडणूक न लढण्याची आतापर्यंत मनसेची भूमिका आहे. मात्र, कसब्यातील जागेवर टिळक कुटुंबीय लढत नसल्याने त्या जागेसाठी राज ठाकरे काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले होते. मात्र, त्यांनी महाविकास आघाडीला ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या