नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. देशदूत सल्लागार संपादक
राज व उद्धव एकत्र आले तर काय होईल याबरोबरच निवडणुकीत महायुतीही स्वतंत्रपणे लढली तर काय होऊ शकेल याचाही विचार केला जाणे गरजेचे आहे. अत्यंत क्लिष्ट, गुंतागुंतीची स्थिती तयार होऊन काहीही भलतेच समीकरणही आकारास आले तर आश्चर्य वाटू नये.
हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मायमराठीच्या प्रेमापोटी राज व उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र आल्याचे गेल्या आठवड्यात दिसले असले तरी ते पुढे म्हणजेच भविष्यात एकत्र राहतील का? त्यांची राजकीय युती होणार का? या प्रश्नांनी संपूर्ण आठवडा लोकांना गुंतवून ठेवले. सर्वच माध्यमांमध्ये हा विषय दररोज काही ना काही निमित्ताने चर्चेला घेतला जात आहेच, पण याव्यतिरिक्त मैदाने, जॉगिंग पार्क, पोहण्याचे तलाव, शाळा, महाविद्यालयातील स्टाफ रूम्स एवढेच नव्हे तर घरोघरी या दोघांबद्दलच चर्चा होत आहे.
ही सारी चर्चा उभयतांना अनुकूलच होतेय असे नाही तर काहीजण दोघांविषयी कटू वा नकारात्मकही बोलत आहेत. पण गेला आठवडाभर हाच विषय ट्रेंडिंगला राहिला, हे मात्र मान्य करावेच लागते. याचा अर्थ हा विषय महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात माणसामाणसांपर्यंत पोहोचलाय. अनेकांना या दोघांनी एकत्र यावे असे वाटत होतेच. अशांना त्या मेळाव्यामुळे आता जणू आभाळ दोन बोटेच उरलेय असे वाटायला लागले, तर दोघांचा राजकीय अवकाश एवढा मर्यादित झालेला आहे की ते दोघेच काय पण यापुढे आणखी कोणीही एकत्र आले तरी महायुतीला काहीही फरक पडणार नाही, असेही काहींना ठामपणे वाटते. यांना विचारतो कोण येथपासून तर आता सगळेच मार्ग बंद झाले म्हणून यांना ‘भाऊबंधन’ आठवले इथपर्यंत लोक चर्चा करत आहेत. वरळीतील ‘त्या’ मेळाव्याने दोघे एक झाले तर पुढे काय होईल याची केवळ झलकच दिसली तर सारा महाराष्ट्र आठवडाभर हा एकच विषय चघळत बसलाय, ते खरोखरच एक झाले तर काय होईल, अशीही एक लोकभावना आहे.
मधल्या पाच ते सहा दिवसांत उद्धव ठाकरे गटाकडून युतीची रेघ आणखी मोठी किंवा विस्तृत करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होताना दिसतोय तर राज ठाकरे मात्र सावधगिरीने पावले टाकताना दिसत आहेत. गेल्या खेपेस युतीच्या अपेक्षेने तोंड पोळलेले असल्याने यावेळेस ते ताकही फुंकून पित असावेत. ते खरेही असेल, मात्र त्यांचे शागिर्द युतीला किती उत्सुक आहेत हे गावोगावी त्यांच्या मनोमिलनाच्या बैठकांमुळे दिसते आहे. मीरा-भाईंदर येथील परप्रांतियांच्या मोर्चाविरोधात मराठीप्रेमींनी काढलेल्या मोर्चात मनसेच्या खांद्याला खांदा लावून ठाकरे गटही सहभागी झाला. कार्यकर्त्यांचा हा हुरूप अन् उत्साह पाहिल्यानंतरच राज ठाकरेंनी युतीसंदर्भात कोणीही विचारल्याशिवाय काहीही बोलू नये, अशी तंबी दिली असावी. त्यामुळेच यावेळेस उद्धव गट उतावीळ तर राज सावध असे चित्र आहे. या संभ्रमामुळेच ठाकरेंची शिवसेना व मनसे एकत्र येणार का याबाबत संभ्रम कायम आहे. वरळीच्या मेळाव्यात उत्साह फसफसून बाहेर येताना दिसला. करोडोंनी तो दूरचित्रवाणीच्या विविध माध्यमातून बघितला. वातावरण बदलतेय का अशी चर्चा त्यामुळेच सुरू झाली.
वास्तविक राजकारण एवढेही काही सरळसोट नसते. ही तर सुरुवात आहे. मधल्या वीस वर्षांत उभय नेत्यांमध्ये, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जो काही चिखल होऊन बसलाय तो कसा व कधी निस्तरणार ही खरी समस्या आहे. झाले गेले गंगेला मिळाले, एवढा साधा हा विषय नाही. भले दोघांनीही महाराष्ट्र व मराठी माणसांच्या हितासाठी आमची भांडणे क्षुल्लक आहेत, असे म्हटले असो, पण भांडणे होती, आहे हेदेखील त्यातून स्पष्ट होत आहे. त्याचे स्वरूप किती गुंतागुंतीचे होते हे त्या कुटुंबानेच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रानेही पाहिले आहे. सध्या जे काही चित्र दिसते आहे, त्यात काळाने दोघांवरही उगवलेला सूड तर आहेच, पण परिस्थितीचा रेटाही तसाच आहे. या परिस्थितीच्या रेट्याचा ताण कार्यकर्ते सहन करू शकत नसल्याने त्यांचा एकत्र येण्याचा आग्रह वाढला आहे. शिंदेंनी बंड केल्यानंतर आजपावेतो शिवसेनेला लागलेली गळती थांबलेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसा या गळतीला कदाचित वेगही येईल. कणाकणाने शिवसेना अस्ताला निघाल्याचे दारूण चित्र एकीकडे पुढे येत आहे तर शिंदेंच्या शिवसेनेला मात्र चांगलेच बाळसे येऊन ती धष्टपुष्ट होत चालल्याचे चित्र दुसरीकडे आहे.
मधल्या काळात राज ठाकरेंनी, ‘कितीही प्रयत्न केला तरी ठाकरे ब्रँड महाराष्ट्रातून संपवता येणार नाही’, असे वक्तव्य केले आणि त्यातूनच ठाकरे बंधूंच्या ऐक्याच्या ‘गप्पा’ सुरू झाल्या. पुढे मराठी माणसाच्या हितापुढे आमची भांडणे काहीच नाहीत, असे राज म्हणाले अन् उद्धव यांनीही लागलीच त्याला प्रतिसाद दिला. या सार्या घडामोडी एका ठराविक दिशेने जात असतानाच राज्य सरकारने तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न चालवला आणि ठाकरे बंधूंच्या ऐक्याला सूर सापडला. पुढचा इतिहास ताजा आहे. वरळी मेळाव्याचे नेपथ्य पाहता दोघांचे पडद्याआड काही निश्चित सूत्र ठरले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कदाचित आतापासूनच एकत्र आलो तर विरोधकांना काड्या लावण्याची संधी मिळेल, असे त्यांना वाटत असावे किंवा या दोघांची युती होऊ नये म्हणून भाजप व शिंदे गट अत्यंत जोमदारपणे प्रयत्न करत असावेत. राज यांनी त्यामुळेच थोडी उसंत तर घेतली नाही ना, अशी शंका येते. संजय राऊत यांनी मात्र दोघांनी एकत्र यावे हा मराठी माणसाचाच दबाव असल्याचा दावा करून दोघांवरील ताण वाढवला आहे. नेमके काय होणार हे लागलीच कळणार नाही. परंतु जे वातावरण गेल्या आठवड्यात तयार झाले ते पाहता कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र कैकपटीने वाढला आहे. उभय बाजूचे नेते आतापासूनच आकडेमोडही करू लागल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहावयास मिळत आहे.
शिवसेना ठाकरे गट व महाराष्ट्र नवनिर्माण सेना खरोखरच एकत्र आल्या तर नाशिकमध्ये काय होईल, असा प्रश्न नाशिककरांनाही पडला आहे. नाशिकने दोघांनाही सत्तेची संधी दिली आहे. भारतीय जनता पक्षालाही नंतर पूर्ण सत्ता देऊन त्यांचाही कारभार बघितला आहे. महापालिकेत लोककल्याणकारी राजवट आल्यानंतर सुरुवातीला काँग्रेसला संधी मिळाली. तीदेखील पूर्णांशाने नव्हती. परंतु तेव्हा शांतारामबापूंसारखे दिग्गज नेते काँग्रेसबरोबर असल्याने त्यांनी अपक्षांसह काही कच्चे दुवे नेमकेपणाने हेरून बरोबर घेतले आणि दोन वर्षे कारभार चालवला. चौथ्या वर्षी तत्कालीन सर्वपक्षीय नेते उत्तमराव ढिकले यांनी बाजी पलटवली आणि काँग्रेस तर फोडलीच शिवाय शिवसेना, भाजपसह इतर सर्व पक्षांना सोबत घेत पहिल्यांदाच महापालिका ताब्यात घेतली. शेवटच्या वर्षी पुन्हा काँग्रेसने सत्ता राखली. परंतु त्या काळात काँग्रेसचे प्रस्थ कमी होत चालले होते आणि शिवसेना बळावत चालली होती. संपूर्ण जिल्हाभरात शिवसेनेचे प्राबल्य वाढले होते.
भारतीय जनता पक्ष तेव्हा रांगत होता. शिवसेनेने नंतर सत्ताही घेतली. वसंत गिते पहिले महापौर झाले खरे पण पुढे ही सत्ता टिकली नाही. कारण बहुमत नव्हते. पुढच्या खेपेला शिवसेना व भाजपची ताकद वाढली आणि दशरथ पाटील यांच्या महापौरपदाच्यारूपाने संपूर्ण सत्ता मिळवण्यात यश आले. पूर्ण पाच वर्षे तेव्हा शिवसेनेला सत्ता राखता आली. पाटलांनंतर नयन घोलप या महापौर झाल्या. नंतर शिवसेनेत फूट पडली. राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली आणि पदार्पणातच त्यांना सत्ताही मिळाली. पण त्यांनाही ती राखता आली नाही. नंतर खर्या अर्थाने सत्ता मिळाली ती भारतीय जनता पक्षाला! शहरानेही या मधल्या कळात कूस बदलली. काँग्रेस, शिवसेना, मनसे आणि नंतर भाजप असा हा नाशिकच्या सत्तेचा प्रवास झाला आहे. आता शिवसेनेत पुन्हा एकदा फूट पडली आहे. काँग्रेसमधून राष्ट्रवादी बाहेर आली आणि आता राष्ट्रवादीचाही अजित पवार गट स्वतंत्र झाला आहे. एकूणच यावेळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अशा बहुकोनी होणार आहेत. परिस्थिती तर बदलली आहेच, त्यातच पक्षीय भूमिकाही बदलल्या आहेत. एक शिवसेना सत्तेबरोबर तर दुसरी विरोधात.
राष्ट्रवादीचेही तसेच. यात आता मनसेचाही सहभाग झाला आहे. मध्यंतरी मनसेने कधी भाजपच्या साथीला तर कधी विरोधात अशा भूमिका बदलल्या. यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर मनसे येईल, अशी परिस्थिती आहे. तसे झालेच तर सध्या औषधालाही शिल्लक नसलेल्या शिवसेनेला बूस्टर डोस मिळेल का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दोन्ही पक्षात सध्या व्यापक जनाधार नसलेल्या क्षणिक नेत्यांकडे सूत्रे आहेत. महायुतीसारख्या बलदंड संघटनेशी त्यांना लढायचे आहे. साम, दाम, दंड, भेद अन् नीतीमध्ये नैपुण्य मिळवलेले व ते अलीकडे सातत्याने सार्थ ठरवलेल्या नेत्यांची फौज त्यांच्याकडे आहे. अशा या बलाढ्य महाशक्तीला नमवणे वाटते तेवढे सोपे नाही.
औरंगजेबच्या महाप्रचंड सेनेपुढे मराठा सेनेने भीमपराक्रम गाजवला होता व त्याची कबरही शेवटी याच महाराष्ट्रात करावी लागली, त्यामुळे महाशक्तीने हा इतिहास विसरू नये, असा आशावाद शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जागविते आहे. गेल्या खेपेस शिवसेनेचे 35 तर मनसेचे पाच नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी सध्या शिवसेनेकडे केवळ पाच उरले आहेत. मनसेचे सलीममामा शेख तेवढे उरले होते; परंतु विधानसभेच्या निवडणुकीत दिनकर पाटील मनसेत आले आणि पक्षाचे प्रमुखच होऊन बसले. या दोघांचाही प्रभाव सातपूरमधील एका ठराविक भागावर आहे. शिवसेनेचाही सिडकोतील प्रभाव बडगुजरांमुळे कमी झाला असेल, डी. जी. सूर्यवंशींना ती भर काढावी लागेल. या दोघांनाही हे शक्य होईल का आणि पूर्ण शहरात ते कसा प्रभाव वाढवतात यावर बरेच काही अवलंबून आहे.
सध्या तरी वसंत गिते, विनायक पांडे व दत्ता गायकवाड हे तिघेच नेते शिवसेनेत थोडाफार जनाधार टिकवून आहेत. मनसेमध्येही सलीम शेख, दिनकर पाटील, सुदाम कोंबडे असे तिघेच आहेत. महानगरप्रमुख सूर्यवंशी व अंकुश पवार यांना आपापल्या प्रभागात काही करता आले तरी खूप झाले. या दोन्ही पक्षांच्या दृष्टीने एकच गोष्ट लक्षणीय आहे, ती म्हणजे प्रमुख नेत्यांनी बाहेरचा रस्ता धरल्याने दुसर्या, तिसर्या फळीची उत्साही कार्यकर्ते मंडळी त्यांच्याकडे आहेत. हा उत्साह किती टिकतो हे महत्त्वाचे. ऐन निवडणुकीत या कार्यकर्त्यांनाही विविध प्रलोभने मिळाली व ते त्या चक्रव्यूहात फसले तर मग दोन ठाकरे एकत्र येऊनही फार काही साध्य होईल असे वाटत नाही. आज त्यांच्या प्रत्येक मेळाव्यांना कार्यकर्त्यांची भरपूर गर्दी होताना दिसते आहे, प्रत्येक प्रभागात पुरेसे स्पर्धकही आहेत. पण ते प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत टिकतील का, हाच खरा कळीचा मुद्दा आहे.
भाजप व शिंदे गटाच्या चालींना ते कसे प्रत्युत्तर देऊ शकतात यावर नाशिकमध्ये नेमके काय होईल ते कळू शकेल. अर्थात, केवळ महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असेच चित्र राहील असेही नाही. सध्या ज्या पद्धतीने भाजप व शिंदे गट एकमेकांना जोखत इतर पक्षांच्या लोकांना आपल्याकडे खेचत आहेत, ते पाहता त्या दोघांची रणनीतीही आपापल्या संघटनेच्या विस्ताराची दिसत आहे. याचाच अर्थ ते स्वतंत्रपण एकमेकांविरोधात लढू शकतात. तसे झालेच तर या खिचडीतून जे काही बाहेर येईल ते अनपेक्षितही असू शकेल. त्यामुळेच राज व उद्धव एकत्र आले तर काय होईल याबरोबरच निवडणुकीत महायुतीही स्वतंत्रपणे लढली तर काय होऊ शकेल याचाही विचार केला जाणे गरजेचे आहे. अत्यंत क्लिष्ट, गुंतागुंतीची स्थिती तयार होऊन काहीही भलतेच समीकरण आकारास आले तर आश्चर्य वाटू नये.





