राहाता |प्रतिनिधी| Rahata
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी रोखण्यासाठी महायुतीने जोरदार प्रयत्न सुरू केले असून शिर्डी मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल करणारे राजेंद्र पिपाडा आणि ममता पिपाडा यांच्याशी पक्षाने संवाद सुरू केला आहे. त्यांना घेण्यासाठी पक्षाने विशेष चार्टड विमानाची सोय केल्याने चर्चा झाली.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 4 नोव्हेंबरपर्यंत आहे. भाजपचे मातब्बर नेते ना.राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीतून पक्षाचे उमेदवार आहेत. मात्र मतदारसंघातून भाजपमध्ये असलेल्या पिपाडा दाम्पत्याने अर्ज दाखल केले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राजेंद्र पिपाडा यांनी विखे पाटील यांच्यावर टीका सुरू केली होती. मतदारसंघातील तिढा सोडवण्यासाठी काल मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे आणि शिव प्रकाश, आ.प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत बंडखोरी झालेल्या मतदारसंघांचा आढावा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.