नाशिक | शैलेंद्र तनपुरे- दै.देशदूत-सल्लागार संपादक
पक्षाच्या खर्या कार्यकर्त्याचाच यापुढे सन्मान होईल, असा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला तर इतर पक्षांनाही ती एक प्रेरणा राहील तर बंडोबांना धडा मिळू शकेल. हा कदाचित आदर्शवादही असेल. परंतु राष्ट्रवादीला आता यापुढे फार काही गमवायचे नाही. साहजिकच त्यामुळे जर एका चांगल्या राजकारणाची सुरुवात जर अशा निमित्ताने होणार असेल तर भविष्य निश्चितच उज्ज्वल राहू शकेल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भादील संभ्रम आता फिटल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आता तयारीला प्रारंभ केल्याचे दिसते. सत्तारूढ पक्षांनी स्वाभाविकपणे विकासकामांना मंजुरी, लोकार्पण, भूमिपूजन, रखडलेल्या योजना-कामांना सुरुवात अशा पद्धतीची कामे सुरू केली आहेत. विधानसभा निवडणुकीत लाडया बहिणींसह अशा असंख्य लोकानुनयी योजनांचा भडीमार केल्यामुळे महायुतीला प्रचंड यश मिळाल्याचे सर्वश्रुत आहेच. साहजिकच आता तोच जिंकण्याचा रोडमॅप झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठीही असेच काही फंडे वापरले जाणे गृहीतच आहे. प्रश्न विरोधी पक्षांचा आहे! एकतर विरोधी पक्ष कमालीचे ढेपाळलेले आहेत.
अनेकांचा शक्तिपात झालेला आहे. शिवसेना व राष्ट्रवादी या दोन पक्षांचे दोनाचे चार झाले. सहसा ‘दोनाचे चार होणे’, जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती एक चांगली घटना व दोन कुटुंबाच्या ऐयाचा तो सोहळा समजला जातो. इथे नेमके उलटे झाले आहे. मूळ शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदेंनी नवी शिवसेना स्थापन केली असली तरी निवडणूक आयोगाने त्यांनाच मूळ शिवसेना समजून चिन्हही दिलेले असल्याने खरी शिवसेना नेमकी कोणाची हा संभ्रम आहेच. विधानसभा निवडणुकीने खरी शिवसेना कोणाची हे सिद्ध केल्याचा दावा एकनाथ शिंदे करत असले तरी ठाकरेंच्या ब्रँडचे शिवसेनेला लाभलेले वलय अजूनही जुन्याच शिवसेनेला आहे. तरीही जुनी शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरेंची शिवसेना शिंदेंनी जवळपास खाली केली आहे. अनेक ठिकाणी तर उबाठाला उमेदवारही मिळण्याची मारामार होईल, असे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर या निवडणुकांकडे पाहावे लागते आहे.
राष्ट्रवादीच्या वाट्यालाही हेच दुखणे आले आहे. तेथेही मूळ राष्ट्रवादी शरद पवारांची तर नवी राष्ट्रवादी अजित पवारांकडे. चिन्हही त्यांच्याचकडे. शिंदेंप्रमाणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही मूळ पक्षाचे सारे काही आपल्याकडे तर घेतलेच शिवाय गावोगावची तालेवार मंडळीही कळपात ओढली. थोडयात काय तर यावेळेस दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष अशा पाच प्रमुख पक्षांचा एकेका संस्थांवर ताबा मिळवण्यासाठी संघर्ष राहील. म्हणायला महायुतीविरोधात महाविकास आघाडी असे दुरंगी चित्र दिसत असले तरी प्रत्यक्षात दोन्ही बाजूंकडील पक्षांना स्वत:ची शक्ती आजमावयाची खुमखुमी असल्याने या दुरंगीचा बेरंग होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
याव्यतिरिक्त दोन-चार रिपब्लिकन पक्ष, दोन-तीन डावे पक्ष, आम आदमी पार्टी, बच्चू कडूंची प्रहार जनशक्ती पार्टी, समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष आणि काही स्थानिक संघटना व बरेच अपक्ष असे डझनावारी पक्ष वा उमेदवारही रिंगणात दिसतील. महायुतीतील तीनही पक्ष आम्ही एकत्रितच निवडणुका लढवू असे राणा भीमदेवी थाटात बोलत असले तरी ते प्रत्यक्षात होणे नाही, हे त्यांनाही चांगलेच माहिती आहे. हाच प्रकार महाविकास आघाडीबाबतही होईल. उद्धव ठाकरेंनी राजधानी दिल्ली भेटीत शिवसेना व मनसे युतीच्या विषयात तिसर्या पक्षाची ढवळाढवळ नको असा थेट इशारा दिला. मुंबईत उबाठाने मनसेला बरोबर घेतल्यास आपण वेगळी चूल मांडू असा धोशा स्थानिक काँग्रेस नेत्यांनी लावला असल्याने ठाकरेंनी राहुल गांधींनी बोलावलेल्या बैठकीतच, ‘आमचे आम्ही बघू’, असे सांगून पुढे काय होणार याची चुणूक दाखवून दिली. पक्षांनी आपापल्या ताकदीचा भलता आवेश न दाखवल्यास ज्याची जिथे ताकद त्यांना पुढे चाल असा मार्ग निघू शकतो. तसे झाल्यास या निवडणुकांमध्ये खर्या अर्थाने रंगत येऊ शकेल.
स्थानिक संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पहिलाच दौरा नाशिकला केला. नाशिकला महत्त्व का दिले असेल असा प्रश्न कदाचित अनेकांना पडू शकेल. एकेकाळी शरद पवारांना मानणारा हा जिल्हा गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना सोडून अजितदादांच्या पाठीशी राहिला. त्याचे फळ म्हणून अजितदादांनीही तीन मंत्र्यांचे दान देऊन नाशिककरांच्या प्रेमाची परतफेड केली. या पार्श्वभूमीवर जुने वैभव पुन्हा मिळवण्याच्या इर्षेने कदाचित संवाद मेळाव्याचा शुभारंभ नाशिकमधून केला गेला असावा. या संवाद मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष शिंदेंनी एक अत्यंत चांगली गोष्ट केली अन् ती म्हणजे श्रवणभक्ती! ‘कार्यकर्त्यांनी बोलावे, आज मी फक्त तुमचे ऐकायला आलो आहे’, असे सांगून त्यांनी सुरुवातीलाच कार्यकर्त्यांची मने जिंकून घेतली.
कार्यकर्त्यांनी मन मोकळे करण्याच्या नादात पक्षाच्या धोरणांचीच पिसे काढायला सुरुवात केल्यावर मात्र शिंदेंना कदाचित चूक तर केली नाही ना, असेही वाटून गेले असेल. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात सलग दोनवेळा पक्षाने अखेरच्या क्षणी भारतीय जनता पक्षातून आलेल्यांना पायघड्या टाकल्या. दणदणीत पराभवानंतर ते दोघेही मूळ पक्षात, आले तसे गेले. यामुळे सामान्य कार्यकर्ता प्रचंड दुखावला गेला असून पक्ष नेतृत्वाच्या या प्रवृत्तीविरोधात अनेकांनी आपली खदखद व्यक्त केली. बाळासाहेब सानप, गणेश गीते यांनी गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत अखेरच्या क्षणी भाजपचा त्याग करून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवली. दोन्ही वेळेस या बंडोबांचा मुखभंग झाला.
साहजिकच पक्षातर्फे तत्पूर्वी तयारी करून बसलेल्यांनी यानिमित्ताने अशा प्रवृत्तींविरोधात गरळ ओकली. पक्षाने अशांचे चोचले का पुरवले, असा सवालही केला गेला. ‘प्रत्येकाला २५ कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी दिली गेली. ज्यांनी हे काम इमानेइतबारे केले ते खाली सतरंजीवर बसले आहेत आणि जे केवळ फुशारया मारतात, ते मात्र साहेबी थाटात व्यासपीठावर आहेत’, असा हल्लाबोलही काहींनी केला. ‘पक्षाच्या विविध सेलच्या अध्यक्षांना साधा सन्मानही दिला जात नाही आणि बाहेरून आलेले मात्र पक्षाचा ताबा घेतात याची आम्हाला लाज वाटते’, असेही मत एकाने सदगदित होत मांडले. संवाद मेळाव्याला तुलनेने गर्दी फार नव्हती. परंतु नवे अध्यक्ष आल्याने उत्साह भरपूर होता. शिंदे हे आक्रमक राजकारणासाठी प्रसिद्ध असल्याने त्यांच्याकडून अनेकांनी अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. शहरात पक्षाची अवस्था अगदीच तोळामासा आहे. पक्षातील फुटीनंतर माजी नगरसेवक गजानन शेलार यांनी धुरा सांभाळून शहरात पक्ष जिवंत ठेवला खरा परंतु पुढे काहीच होत नाही, हेही तेवढेच खरे. इतके दिवस त्यांच्या जोडीला जिल्हाध्यक्ष म्हणून कोंडाजीमामा आव्हाड होते. त्यांचाही एक स्वतंत्र अंदाज होता. ते काही उत्तम संघटक नाही आणि कधीही नव्हते. त्यासाठी एकच उदाहरण पुरेसे ठरावे.
व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत एकदा सगळे पॅनल भुईसपाट झाले तरी मामा सरचिटणीसपदी एकटेच विजयी झाले होते. असेच एकदा त्यांच्या पॅनलकडून ते व इतर दोघे निवडून आले होते. अर्थात, एकदा त्यांचे संपूर्ण पॅनल जरूर निवडून आले पण तेव्हा त्यांच्यासोबत हेमंत धात्रक, तानाजी जायभावे यांचेही नेतृत्व होते. याचा अर्थ त्यांच्या संघटनशक्तीला मर्यादा होत्या. उत्तम वक्तृत्त्वाचीही वानवा होती. दिलदार मनाचा माणूस म्हणून मात्र तसे ते ओळखले जात. विधानसभा निवडणुकीत पक्षाची अवस्था दारूण झाली. जिल्ह्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळवला. शरद पवार यांना मानणारा जिल्हा असा लौकिक असलेल्या नाशिकमध्येच पक्ष रसातळाला गेल्याचे पाहावे लागले. शहरातही भाजपच्या गणेश गीतेंना उमेदवारी दिल्याने पक्षात नाराजी होती. प्रेस कामगार संघटनेचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी तत्पूर्वी बरेच शक्तिप्रदर्शन केले होते. पण गीतेंनी उमेदवारी मिळवल्यानंतर गोडसे निवडणुकीबरोबरच पक्षातूनही गायब झाले. हेच गोडसे आधी शिवसेनेत असताना लोकसभेसाठी भाजपचे उंबरे झिजवत होते. तेथे डाळ शिजली नाही म्हणून त्यांनी नाशिक पूर्व मतदारसंघावर डोळा ठेवून राष्ट्रवादीवर जाळे टाकले.
प्रेस कामगार संघटनेच्या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी शरद पवारांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावून त्यांनी फिल्डिंग तर उत्तम लावली होती. परंतु नोटप्रेसच्या नेत्यापेक्षा प्रत्यक्ष नोटावाले गीते भारी पडले. निवडणुकीत गीतेदेखील पडले आणि नंतर जुन्या नेत्यांच्या नाकदुर्या काढून पुन्हा गिरीश महाजनांच्या कळपात सामीलही झाले. सतत दोन टर्म पक्षाने असा ‘बाहेरख्यालीपणा’ केल्याने संघटना म्हणून पक्ष उभाच राहू शकला नाही. गजानन शेलार त्यांच्यापरीने प्रयत्न जरूर करत होते; परंतु त्यांच्या राजकारणाचा बाज हा महापालिकेच्या राजकारणाशी मर्यादित असल्याने त्याला मर्यादाही तेवढ्याच आहेत. त्याचे दर्शन गेल्या काही दिवसात होत आहेच. अर्थात शेलार नसते तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष शहरात औषधाला तरी राहिला असता का, असा प्रश्न पडतो. ऐन निवडणुकीत माजी आमदार नितीन भोसले यांचाही राष्ट्रवादीत गाजावाजा होता. जागावाटपात पक्षाला जागा न सुटल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला आणि तेव्हापासून भोसले जे गायब झाले ते परवा पक्षाच्या नव्या अध्यक्षांच्या कार्यक्रमातही दिसले नाहीत.
मध्यंतरी एकेका पक्षाकडून शिंदेंची शिवसेना व भाजपने जी काही घाऊक भरती केली त्याचा फटका या राष्ट्रवादीलाही अनेक ठिकाणी बसला. हिरे कुटुंबियांची त्रिस्थळी यात्राही या काळात अनेकांनी अनुभवली. माजी आमदार अपूर्व हिरे अजितदादांकडे तर पिताश्री माजी मंत्री प्रशांतदादा हिरे शरद पवारांकडे आणि अद्वय हिरे ठाकरे गटात असा हा मामला होता. आता अपूर्व हे भाजपमध्ये डेरेदाखल झाले आहेत. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांचे बंधू माजी खासदार देवीदास पिंगळे हे अजित पवारांबरोबर आहेत. अशा अनेक गंमतीजमती काही ठिकाणी बघायला मिळतील. कोंडाजी मामांना बाजूला करून खेडगावच्या दत्तात्रेय पाटील यांच्याकडे जिल्हाध्यक्षाची जबाबदारी दिली गेली. त्यांनी धूमधडायात काम सुरू केले पण त्यांच्यावरही वशिलेबाजीचा आरोप झालाच. ते ज्या दिंडोरीत असतात तेथे अजितदादांच्या राष्ट्रवादीने बाजी मारलेली असून नरहरी झिरवाळ हे थेट मंत्री आहेत. कादवा कारखान्याचे सर्वेसर्वा श्रीराम शेटे हे आता ‘सार्वजनिक काका’ झाले असून सर्वांनाच त्यांचा आशीर्वाद हवा असतो.
झिरवाळ तर उठसूठ गुरुवर्य म्हणून त्यांचा उल्लेख करत असतात. या सार्या गुंतागुंतीत कार्यकर्त्यांना सजग ठेवणे, त्यांच्या मनातील खरा नेता कोण हा गुंता सोडवणे आणि प्रत्यक्ष पक्षकार्याला गुंतवणे असे मोठे आव्हान शेलार व पाटील यांच्यापुढे आहे. शिंदेंसारखा प्रदेशाध्यक्ष मिळाल्याने खरे तर पक्षाला नव्याने उभारी देता येऊ शकते. त्यासाठी झोकून देऊन काम करण्याची गरज राहील. दोघांनाही चांगला संघ आधी बांधावा लागेल आणि नंतर त्यांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाता येऊ शकेल. विद्यमान परिस्थिती फारशी आशादायी नाही. आव्हान दुसर्या राष्ट्रवादीचेच राहील. ते सत्तारूढ तर आहेतच शिवाय जुनी जाणती बरीच मंडळीही त्यांच्याकडेच असल्याने उमेदवार निवडीसाठीही बरीच यातायात करावी लागेल. यंदा सगळीकडेच उत्सुकांची भरमार असणार असल्याने दुसरीकडे जागा न मिळाल्याने इकडे येणार्यांची संख्याही मोठी राहील. अशाप्रसंगी खरी कसोटी लागेल. कारण संवाद मेळाव्यात सारी खदखद अशा ऐनवेळी पक्षाचा ताबा घेणार्यांविषयीच होती.
दस्तुरखुद्द शशिकांत शिंदे यांनीही निष्क्रियांना नारळ देतानाच निष्ठावानांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असा शब्द जाहीरपणे दिला आहे. पक्षाच्या दीर्घकालीन अस्तित्वासाठी या शब्दाशी प्रामाणिक राहावे लागेल. भले अपयश पदरी पडले तरी चालेल पण पक्षाच्या खर्या कार्यकर्त्याचाच यापुढे सन्मान होईल, असा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला तर इतर पक्षांनाही ती एक प्रेरणा राहील तर बंडोबांना धडा मिळू शकेल. हा कदाचित आदर्शवादही असेल. परंतु राष्ट्रवादीला आता यापुढे फार काही गमवायचे नाही. साहजिकच त्यामुळे जर एका चांगल्या राजकारणाची सुरुवात जर अशा निमित्ताने होणार असेल तर भविष्य निश्चितच उज्ज्वल राहू शकेल.





