नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहराचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या द्वारका चौक व परिसरात (Dwarka Chowk Area) सध्या मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. मात्र त्याचे योग्य नियोजन न करण्यात आल्याने या कामांचा फटका थेट सामान्य नागरिक आणि वाहनचालकांना बसत असून, नियोजनाच्या अभावामुळे परिसरात अक्षरशः वाहतूक कोंडीचे चित्र निर्माण झाले आहे. तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
वडाळा नाका भागात (Wadala Naka Area) अलीकडेच वाहतूकीसाठी नवीन वळण देण्यात आले. सुरुवातीपासूनच या वळणावर कोणतीही स्पष्ट दिशादर्शक फलक, वाहतूक नियंत्रण व्यवस्था किंवा पोलिस बंदोबस्त नसल्याने वाहनचालक गोंधळात सापडत होती. अशातच आज (दि.२) पासून या ठिकाणी पुन्हा खोदकाम सुरू करण्यात आल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. अरुंद रस्ते, सुरू असलेले काम आणि त्यातच अव्यवस्थित वाहतूक यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत.
विशेष म्हणजे, या ठिकाणी ना वाहतूक पोलिसांची (Police) उपस्थिती नाही, ना ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक. त्यामुळे वाहन चालकांचा गोंधळ होता असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. दुसरीकडे प्रशासनाने दिलेला पर्यायी मार्गही पूर्णतः खड्डेमय असल्याने नागरिकांच्या अडचणीत अधिक भर पडत आहे. स्थानिक नागरिकांनी या संदर्भात लोकप्रतिनिधींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, अनेक नगरसेवकांना या परिस्थितीची माहितीच नसल्याचे समोर आले. यावरून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयाचा अभाव स्पष्ट होत आहे.
दरम्यान, “सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbhmela) पार्श्वभूमीवर शहर सुशोभीकरण आणि रस्त्ो विकासाच्या गप्पा मारणारे प्रशासन प्रत्यक्षात नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरत आहे. नियोजनशून्य कामांमुळे नागरिकांचे हाल होत असताना जबाबदार यंत्रणा मात्र डोळेझाक करत आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांत्ूान व्यक्त होत आहे. तातडीने या परिसरात वाहत्ूाक पोलिसांची नेमणूक करणे, स्पष्ट दिशादर्शक फलक लावणे, पर्यायी मार्गाची दुरुस्ती करणे आणि सुरू असलेल्या कामांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.





