नाशिक | शैलेंद्र तनपुरे- दै. ‘देशदूत’ – सल्लागार संपादक
काँग्रेसच्या जिल्ह्यातील सद्यस्थितीवर नजर टाकली तर कोणाच्या आणि कशाच्या बळावर हा पक्ष भाजप किंवा इतर ताकदवान पक्षांशी लढाई करणार, असा प्रश्न उभा राहतो. एकापाठोपाठ स्थानिक नेते पक्ष सोडून जात असतानाही नेतृत्व डोळे झाकून बसल्याने पक्षाची अवस्था अधिक केविलवाणी होत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीची प्रभाग रचना सुरू होताच राजकीय पक्षांमधील हालचालींची गतीही वाढली आहे. गट-गण तसेच प्रभागांमधील बैठकांचा जोर वाढला आहे. आयाराम-गयारामांची चुळबुळही सुरू झाली आहे. महानगरपालिकेत नगरसेवक व काँग्रेसमध्ये दीर्घकाळ घालवलेल्या डॉ. हेमलता पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करून पक्षांतराच्या ताज्या प्रक्रियेचा शुभारंभ केला. गेल्या तीन-चार महिन्यांतील पाटील यांचा हा तिसर्या पक्षातील प्रवेश! काँग्रेसचा त्याग करून त्या शिंदे गटात गेल्या. काही दिवस तेथे काम केल्यानंतर स्थानिक गटबाजी पाहून त्यांनी तेथून बाहेर पडणे पसंत केले. काही काळ शांततेत घालविल्यानंतर त्यांनी अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला.
खरे तर तत्पूर्वी शिवसेनेत त्या का गेल्या असा प्रश्न अनेकांना पडला होता, तसाच आताही पडला असून राष्ट्रवादीत जाऊन त्यांना आणखी कोणता नवा साक्षात्कार होणार हे कदाचित लवकरच कळू शकेल. या पक्षातील अगदी भुजबळांपासून ते शहराध्यक्ष रंजन ठाकरेंपर्यंत ताईंचे पूर्वीपासून फारसे कोणाशी पटलेले नाही. पालिकेत त्यांना ज्यांच्याशी लढावे लागले, त्या योगिताताई आहेर या महिला अध्यक्ष असल्याने किती लोकांशी जुळवून घ्यावे लागेल याची ही झलक. स्वच्छ प्रतिमा आणि उच्चविद्याविभूषित या लौकिकामुळे त्यांच्यासोबतच पक्षाची प्रतिमाही संबंधित परिसरात चांगली होती. काँग्रेसने त्यांना महापौरपदाची उमेदवारी, विरोधी पक्षनेतेपद तसेच प्रवक्तेपद दिले होते. विधानसभेची उमेदवारीही दिली. दुसर्यांदा उमेदवारी मिळाली नाही, कारण पक्षाला ती जागाच सुटली नव्हती. परंतु तेव्हापासून त्या पक्षावर कमालीच्या नाराज होत्या.
शिवसेनेच्या दोन्ही गटांबरोबरच भारतीय जनता पक्षाचा पर्यायही त्यांच्यापुढे होता. नेमया त्याच काळात शिंदे गटाकडे नाशिकच्या माजी नगरसेवकांची रीघ लागल्याने कदाचित पाटीलताईंना तिकडे जाण्याचा मोह झालेला असावा. काँग्रेसमध्ये सारी कारकीर्द घालवल्यानंतर पूर्णत: भिन्न धाटणीच्या पक्षात आपले कसे जमेल असा विचार त्यांना पक्षांतर करताना आला नसेल का, असा प्रश्न पडला. शेवटी जे व्हायचे तेच झाले आणि अवघ्या काही दिवसांतच त्यांना परतीचा प्रवास करावा लागला. अर्थात असे असले तरी त्यांना पुन्हा काँग्रेस पक्षात यावेसे वाटू नये हे अधिक चिंतनीय. त्यांनी परत यावे असे काँग्रेसमधीलही कोणाला वाटू नये, ही भीषण अवस्था. ज्यांनी विचारावे असे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्याशीच त्यांचा छत्तीसचा आकडा! साहजिकच ही आपत्ती परत नको, असा विचार छाजेड यांनी केला असल्यास नवल नाही.
संस्थाने खालसा
हाताच्या बोटावरही मोजता येतील एवढी नेत्यांची संख्या असलेल्या काँग्रेसमधील समीर कांबळे यांनी पूर्वीच पक्षत्याग करीत शिवसेनेला जवळ केले. आता शाहू खैरे, वत्सलाताई खैरे यांच्यासोबतच काँग्रेसच्या विचारांचे गुरुमित बग्गा, नरेश पाटील व माजी नगरसेविका नंदिनी बोडके यांच्याही पक्षांतराची चर्चा आहे. एवढेच नव्हे तर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे माजी आमदार शिरीष कोतवाल यांचाही एक पाय पक्षाच्या उंबर्याबाहेर पडलेला आहे. आपल्याला जबाबदारीतून मुक्त करा, अशी विनंती आपणच पक्षाकडे केल्याचे त्यांनी स्वत:च सांगितले असून पक्षांतराच्या वावड्या नाहक उठविल्या जात असल्याचा संताप व्यक्त केला. जायचे तेव्हा ‘डंके की चोट पे’ जाईन, कोणाला घाबरण्याचे कारणच नाही, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. यातून ‘जो जे वांछिल तो ते लाहो सारखा’ अर्थ काढायला हरकत नाही. दुसरे माजी आमदार व नांदगाव तालुयात काँग्रेसला अजून तरी अस्तित्वात ठेवलेले अनिल आहेर यांचे चिरंजीव दर्शन यांना शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या आशीर्वादाने नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतिपद मिळाले आहे. दर्शन यांनी समाज माध्यमांवर केलेल्या काही पोस्टमध्ये आपल्या वडिलांसह आ. कांदेंचे छायाचित्र टाकल्याने आता पक्षाचे ‘न्यायडोंगरी संस्थान’ही कांदेंच्या झंझावातात खालसा झालेले दिसते. यापूर्वीच कवडेंनीही कांदेंची दीक्षा घेतलेली असल्याने व चांदवडला कोतवालही एकाकी पडल्याने एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या तालुयांमध्येही आता औषधालाही पक्ष शिल्लक राहील का, हा प्रश्न आहे.
प्रभारी कारभार
हेमलता पाटील यांच्या पक्षांतराची चर्चा होणे क्रमप्राप्त होते, कारण त्यांना पक्षाने बरेच काही दिले. माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी असलेल्या नातेसंबंधामुळे सुरुवातीपासूनच त्यांना इतरांपेक्षा अधिक संधी मिळत गेली. व्यवसायाने डॉटर असल्याने त्यांच्याविषयीची समाजातील स्वीकारार्हताही साहजिकच अधिक होती. सुरुवातीला अपक्ष, पुढे काँग्रेसकडून त्यांनी चार वेळा पालिकेत कर्तृत्व गाजविले. अर्थात पक्षातील माने-छाजेड संघर्षात त्यांच्यासह अनेकांची अनेकार्थांनी कोंडी झाली. पक्षाला घरघर लागल्यानंतर व अनेकांनी पक्षत्याग केल्यानंतरही स्थानिक नेतृत्व झापडबंदच राहिले. परिणामी, पक्षाची स्थिती केविलवाणी होत गेली. गेल्या निवडणुकीत तर अवघे सहा नगरसेवक विजयी झाले. तरीही अंतर्गत संघर्षाला सीमा नव्हतीच. हेमलता पाटील यांनी तर विधानसभा निवडणुकीत छाजेड गटाच्या लोकांनी आपले काम केले नसल्याचा आरोप केला होता. आजही काँग्रेसमध्ये आकाश छाजेडसह सगळेच प्रभारी अध्यक्ष असून हे प्रभारीपद काही दिवसांत कदाचित गिनीज बुकात नोंदले जाईल. ज्या पक्षाला साधा पूर्णवेळ अध्यक्षही निवडता येत नाही, कोणी पक्षातून चालले तर त्याला थांबण्याची विनंती करण्याचे सौजन्यही नाही, निवडणुका तोंडावर आल्यानंतर अद्याप साध्या बैठकाही घेण्याचे सूचत नाही असा पक्ष कोणाच्या व कशाच्या बळावर भाजप वा तत्सम पक्षांशी लढाई करणार, हा प्रश्न आहे.
जिल्हाभर घरघर
हेमलता पाटील यांच्या पक्षत्यागाने सहजच काँग्रेसच्या जिल्ह्यातील विद्यमान स्थितीविषयी विचार केला तेव्हा डोके गरगरायला लागले. नांदगावचा उल्लेख वर केला आहेच. साधारण अशीच स्थिती अनेक तालुयांत आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर अशा काही तालुयांना अध्यक्षही नाही. हिरामण खोसकर, संपत सकाळे, संदीप गुळवे यांच्या पक्षत्यागाने व उरलेल्यांच्या हकालपट्टीने दोन्ही तालुयात काँग्रेसचा पाया पार खरवडून गेला. आता तेथे पक्षाकडे अध्यक्षासाठीही माणूस नाही. ज्या तालुयाने पक्षाला गोपाळराव गुळवेंसारखा शक्तिशाली अध्यक्ष तब्बल दहा वर्षे दिला, त्याची ही अवस्था. अर्थात गुळवेंच्या चिरंजीवांनीच पक्षाशी द्रोह केल्यावर इतरांची काय कथा! या दोन्ही तालुयातील बरेचसे राजकारण नाशिक तालुयातील ग्रामीण भागावरही परिणाम करणारे असते. त्यामुळे त्याची छाया येथेही पडली. नाशिक तालुयात सुरुवातीपासूनच शिवसेनेच्या झंझावातापुढे काँग्रेस कमकुवत होती. नंतर तर ती लयालाच गेली. पेठ तालुका अगदी अलीकडेपर्यंत शब्दश: बालेकिल्ला होता. तेथील जनतेने सिन्नरच्या मालती कोंडाजी आव्हाड यांना जिल्हा परिषदेवर पाठवले होते.
पक्ष एवढा महान की, त्यांनी नंतरच्याही दोन निवडणुकांत एकदा माधव मोरे व प्रमोद मोरे अशा बाहेरच्यांनाच उमेदवारी देऊन हाताने घात करून ठेवला. शेखचिल्ली पद्धतीचा आविष्कार काँग्रेसने बर्याच ठिकाणी केला. नजीकच्या सुरगाणामध्ये तर लाल बावट्याने काँग्रेसचा तिरंगा कधीच फडकू दिला नाही. माणिकराव कोकाटे होते, तोपर्यंत सिन्नरमध्येही काँग्रेस हालचाल करीत होती. आता तेथील घडीही पार विस्कटली आहे. हीच परिस्थिती मालेगावची. शेख रशीद व आसिफ शेख या आमदार पिता-पुत्रांचा रोष झाला आणि पक्ष गळपटला. ज्या मालेगाव शहरात काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत पावणेदोन लाख मते पडली, त्याच मालेगावात तीन महिन्यांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अवघी सात हजार मते पडतात, यातून आजही कोणीही काही बोध घ्यायला तयार नाही. तेव्हा वरिष्ठ नेत्यांच्या संघर्षात हिरामण खोसकर, निर्मला गावित, आसिफ शेख, मौलाना मुफ्ती अशा काही मोहर्यांवर संक्रांत आली. पण तेथूनच पक्षाचा राहिलेला धागाही तुटला. जिल्हाध्यक्ष राहिलेले तुषार शेवाळे यांनी विधानसभा निवडणुकीत ऐन मोयाच्या क्षणाला हाय खाल्ली नसती तर गेल्या दहा वर्षांत काँग्रेसची स्थिती नक्कीच वेगळी राहिली असती. आज हेच शेवाळे भाजपच्या कमळात विहार करीत आहेत. छगन भुजबळांचे नाशिक जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर काँग्रेसने एकापरीने येवला व नांदगाव त्यांना आंदण देऊन टाकले होते. हुसेन शेख यांची नगराध्यक्षपदाची कारकीर्द सोडल्यानंतर काँग्रेसला तेथे काहीच हाती लागलेले नाही.
माणिकराव व उषाताई शिंदे यांचा विविध पक्षांमधील संचार, दराडे बंधूंचाही सोयीचा संसार यातून पक्षही हेलकावत राहिला. तो अद्यापही सावरलेला नाही. बागलाणमध्ये यशवंत पाटील यांनी काही काळ पक्ष जिवंत ठेवला, पण पुढे पक्षाने जसे कोणत्याच ठिकाणी लक्ष दिले नाही, तद्वतच येथेही केले. आजही ठेंगोडे, ताहाराबाद व वीरगाव येथे लक्ष दिले आणि जीवापाड मेहनत घेतली तर पक्षात धुगधुगी येऊ शकते. साखरचंद कांकरिया यांच्यासारख्या नेत्याने तालुकाध्यक्ष असताना पंचायत समितीत काँग्रेस व भाजपचे प्रत्येकी चार सदस्य निवडून आलेले असताना सभापतिपदी काँग्रेसचा उमेदवार विराजमान केला होता, हा इतिहास असला तरी पक्षाने तो सुवर्णकाळ नव्या लोकांपुढे ठेवून जीव आणता येईल, असे भासवायला हवे. ए.टी. पवार घराण्याच्या प्रभावातही यशवंत गवळी, काशिनाथ गायकवाड, बहिरम कुटुंबीय यासारख्या स्थानिकांनी आजही औषधाला का होईना पण पक्ष जिवंत ठेवलाय. त्याची कदर पक्ष कधीतरी करणार आहे का? असे प्रश्न अनेक ठिकाणी आहेत. निफाड तालुयात परवा तालुकाध्यक्षाविरोधात झालेल्या गटबाजीने किमान काँग्रेस ‘जिवंत’ तरी आहे याची जाणीव इतरांना झाली, हेही नसे थोडके. भास्करराव बनकर, राजाभाऊ पानगव्हाणे, निर्मलाताई खर्डे, दिगंबर गीते, मधुकर शेलार, साधना जाधव, प्रकाश अडसरे, राजेंद्र मोगल आदींमुळे काही काळापूर्वी काँग्रेसचे अस्तित्व निफाडमध्ये जाणवत होते. आता पक्षाच्या इमारतीतील गाळ्यांच्या उत्पन्नात कोणाचा वाटा यावरून भांडणे होणार असतील तर पक्ष गुंडाळलेलाच बरा. देवळा तालुयाच्या निर्मितीपासूनच काँग्रेसने तो भाजप व राष्ट्रवादीला सोडून दिला होता. साहजिकच आता तेथे काँग्रेस हा पक्ष आहे हेदेखील काहींना माहिती नसावे.
वास्तवाच्या पलीकडे
अशा सगळ्या भीषण परिस्थितीत काँग्रेस पक्षाने नाशिकमधून पाच जणांना राज्य कार्यकारिणीवर घेतले. याशिवाय, युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी स्वप्निल पाटील यांची नियुक्ती केली. राजाभाऊ पानगव्हाणे व शरद आहेर उपाध्यक्षपदी तर ज्ञानेश्वर गायकवाड, राहुल दिवे व रमेश कहांडोळे यांना सचिवपदी नियुक्त केले गेले. या नियुक्त्यांमध्ये शहर-ग्रामीण तसेच जातीय समीकरणांचा समतोल साधला गेला असला तरी यातील किती जण सक्रिय आहेत आणि किती जण केवळ नावालाच पक्षाचा टिळा लावून फिरतात याचा शोध घेतल्यास काँग्रेस अजूनही स्थानिक पातळीवरील वास्तव समजून घेण्याच्या मन:स्थितीत नाही हेच दिसते. अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस किती धावा करणार की स्वयंचित होणार हे पाहावे लागेल.





