पुणे
राज्यातील महाविकास आघाडीत घटक पक्ष म्हणून असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दरवाढीसाठी बारामतीत आंदोलन केले.
दुध उत्पादक शेतकऱ्यांना संबोधित करताना, आता आक्रमक व्हावे लागेल,त्यामुळे एखादा मंत्री आला तर त्याला देखील दुधाने आंघोळ घाला, असं आवाहन राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केलं.
दुध दरवाढीच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी राज्यात ठीक-ठिकाणी आंदोलन पुकारत आहे. राजू शेट्टींनी आज बारामतीत दूध दरवाढीसाठी राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारला.त्यांच्या नेतृत्वाखाली बारामती नगरपरिषद ते प्रांत कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी मोर्चेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना संबोधित करताना राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आता आक्रमक व्हावे लागेल. त्यामुळे एखादा मंत्री आला तर त्याला देखील दुधाने आंघोळ घाला, असं आवाहन राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केलं. राज्यातील दुध उत्पादकांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत असून २५ रुपये प्रतिलिटरचा दर राज्यात शेतकऱ्यांच्या पोरांचे सरकार आल्यानंतरही १७ ते १८ रुपयांवर घसरला आहे. उत्पादन खर्चापेक्षा निम्म्या दराने दुध उत्पादकांना दर मिळत असून प्रतिलिटर ३० ते ३५ रुपये उत्पादन खर्च असलेल्या दुधाचा दर वाढवून द्यावा, दुधावरील जीएसटी रद्द करावी, केंद्र सरकारने दुधाच्या भुकटी आयातीचा निर्णय रद्द करावा अशा विविध मागण्या घेऊन स्वाभिमानीने दुध दर आंदोलन सुरू केले आहे.