Saturday, November 16, 2024
Homeब्रेकिंग न्यूजRatan Tata : राज्य मंत्रिमंडळाची रतन टाटांना श्रद्धांजली; भारतरत्न देण्यासाठी केंद्राकडे विनंती

Ratan Tata : राज्य मंत्रिमंडळाची रतन टाटांना श्रद्धांजली; भारतरत्न देण्यासाठी केंद्राकडे विनंती

मुंबई | Mumbai

ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या (Cabinet Meeting) बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. यावेळी रतन टाटा (Ratan Tata) यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला.

- Advertisement -

हे देखील वाचा : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन

या शोकप्रस्तावात म्हटले आहे की, उद्यमशीलता हादेखील समाज उभारणीचा प्रभावी मार्ग असतो. नवनवीन उद्योगांच्या उभारणीनेच देश प्रगतीपथावर नेता येतो, मात्र त्यासाठी हृदयात निस्सीम देशप्रेम आणि आपल्या समाजाप्रती तितकाच प्रामाणिक कळवळा हवा. रतन टाटा यांच्या रुपाने आपण अशाच विचारांचा एक समाजसेवी, द्रष्टा आणि देशप्रेमी मार्गदर्शक गमावला. भारताच्या उद्योगक्षेत्रातच नव्हे, तर समाजउभारणीच्या कामातही टाटा यांचे योगदान अपूर्व होते. ते महाराष्ट्राचे सुपुत्र होते. भारताचा अभिमान होते. स्वयंशिस्त, स्वच्छ कारभार आणि मोठमोठे उद्योग सांभाळताना पाळलेली उच्च प्रतीची नैतिक मूल्ये या कठोर कसोट्या पार पाडत टाटा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला आणि भारताचाही ठसा उमटवला. त्यांच्या रुपाने देशाचा एक प्रमुख आधारस्तंभ कोसळला आहे.

हे देखील वाचा : : Ratan Tata Death : राज्य सरकारकडून एक दिवसाचा दुखवटा जाहीर; रतन टाटांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा (Jamshetji Tata) यांचे पणतू होते. टाटा समुहाचे अध्यक्ष म्हणून आणि नंतर अंतरिम अध्यक्ष म्हणून या समुहाचा कारभार अनेक वर्ष पाहिला. देशातल्या सर्वात जुन्या अशा टाटा समुहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून अतिशय परोपकारी वृत्तीने त्यांनी काम पाहिलं.रतन टाटा यांनी नैतिक मूल्यांची जी जपणूक केली, ती इतर उद्योजकांसाठी आणि उद्योगविश्वातील भावी पिढ्यांसाठीही दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरतील. ते तत्त्वनिष्ठ कर्मयोगी होते. स्वातंत्र्यानंतर देशाच्या पुन्हा उभारणीत टाटा समूहाचा वाटा सिंहाचा होता. या समूहाच्या माध्यमातून रतन टाटा यांनी भारताचा झेंडा जागतिक पातळीवर दिमाखाने फडकता ठेवला.मोटारीपासून मिठापर्यंत आणि कंप्युटरपासून कॉफी-चहापर्यंत असंख्य उत्पादनांशी टाटा हे नाव अभिमानाने जोडले जाते.शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेच्या क्षेत्रातही रतन टाटा यांनी आपले अनन्यसाधारण योगदान दिले. मुंबईवर झालेल्या २६ / ११ च्या हल्ल्यानंतर त्यांनी दाखवलेला खंबीरपणा स्मरणात राहणार आहे. कोविड काळात रतन टाटा यांनी पीएम रिलीफ फंडाला तत्काळ १५०० कोटी रुपये दिले.

हे देखील वाचा : Raj Thackeray Tribute to Ratan Tata : कर्तृत्ववान तरीही निर्लेप राहिलेला उद्योजक…; रतन टाटांच्या जाण्याने राज ठाकरे गहिवरले

तसेच कोविड काळात रुग्णांसाठी त्यांची बहुतांश हॉटेलही उपलब्ध करून दिली. हा त्यांचा मोठेपणा कायम लक्षात राहणारा आहे.नवनिर्मिती आणि दानशूरता यांचा अपूर्व संगम त्यांच्या ठायी होता. त्यांनी कधीही आपल्या ‘टाटा मूल्यां’ शी तडजोड केली नाही.तरुणांमधील कर्तृत्वाला, प्रयोगशिलतेला प्रोत्साहन देण्यात ते कायम आघाडीवर होते. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात तरुणांच्या कौशल्याला वाव आणि रोजगाराची संधी देण्यासाठी त्यांनी इनोव्हेशन सेंटर सुरू केलं. महाराष्ट्र सरकारचा पहिला ‘उद्योग रत्न’ हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. त्यांच्या मार्गदर्शनाचा महाराष्ट्राला सदैव झाला. रतन टाटा यांच्या निधनाने आपला देश आणि महाराष्ट्राचेही कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे.टाटा समूहाच्या विशाल परिवाराच्या दुःखात मंत्रिमंडळ सहभागी आहे. त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो, ही प्रार्थना. देशाच्या या महान सुपुत्राला महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने राज्य मंत्रिमंडळ भावपूर्ण श्रद्धांजली, असे या शोकप्रस्तावात म्हटले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या