अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्य सरकारने शिधापत्रिकेतील दुबार, मयत आणि स्थलांतरीत लाभार्थ्यांची पडताळणी करण्याची सूचना पुरवठा विभागाला दिला होती. त्यामुळे जिल्हानिहाय रिक्त असलेल्या नवीन लाभार्थ्यांना शिधापत्रिकेत समाविष्ट करण्यात येणार असून राज्यात 12 लाख 6 हजार 271 जणांना संधी मिळणार आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यात 50 हजार 378 नवीन नावे शिधापत्रिकेत समाविष्ट केली जाणार आहेत. गेल्या काही महिन्यांत पुरवठा विभागाने राबवलेल्या मोहिमेमुळे नवीन कुटूंबासाठी ही संधी निर्माण झाली आहे.
राज्य व केंद्र सरकार अंत्योदय व प्राधान्यक्रम गटातील कुटुंबांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचे वितरण केले जाते. अंत्योदय योजनेचे 87 हजार शिधापत्रिकाधारक असून 3 लाख 82 हजार लाभार्थी आहेत तर प्राधान्य कुटुंब योजनेतील 6 लाख 40 हजार 571 शिधापत्रिका असून 25 लाख 71 हजार 488 लाभार्थी आहेत. जिल्हा पुरवठा विभागाकडून नवीन शिधापत्रिका तयार करणे तसेच विविध कारणांनी वगळली जातात. यासाठी पुरवठा विभागाने जिल्ह्यात जानेवारी 2025 पासून विशेष मोहिम राबवली होती. यात 50 हजारहून अधिक लाभार्थ्यांची नावे वगळली होती. मृत्यू झालेले, स्थलांतरित, विवाहित अशा विविध कारणांनी शिधापत्रिकांमधून 50 हजारहून अधिक नावे वगळली गेली आहेत.
पुरवठा विभागाने जानेवारी 2025 म्हणजेच गेल्या आठ महिन्यांपासून शिधापत्रिकांची तपासणी मोहिम राबवली. या तपासणीत हजारो नावे कमी करण्यात आलेली आहेत. यामुळे रिक्त झालेल्या नावांच्या ठिकाणी आता नव्याने शिधापत्रिकेत नावे समाविष्ट करण्याची संधी निर्माण झाली असल्याची माहिती पुरवठा विभागाच्या सुत्रांच्यावतीने देण्यात आली.
अंत्योदयच्या 1 हजार नवीन शिधापत्रिका
राज्यातील सर्व जिल्ह्यात मिळून 19 हजार 742 नवीन रेशनकार्ड वाटप होणार आहे. तर प्राध्यान्य कुटुंब योजनेत 12 लाख 6 हजार 271 नवीन लाभार्थ्या समाविष्ट केले जाणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात अंत्योदय योजनेचे 1 हजार 27 नवीन रेशनकार्ड दिले जाणार आहेत. तर प्राधान्य कुटुंब योजनेत 50 हजार 378 लाभार्थी समाविष्ट केले जाणार आहेत.




