मुंबई | Mumbai
मुंबईत ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे महत्त्वाचे नेते रवी राजा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. रवी राजा यांना सायन कोळीवाडा या ठिकाणाहून त्यांना तिकिट हवे होते. मात्र काँग्रेसने गणेश यादव यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले रवी राजा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. रवी राजा यांनी आपला राजीनामा थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठवला आहे. आपण काँग्रेसमधील ४४ वर्षांचा राजकीय प्रवास थांबवत असल्याचे त्यांनी म्हटले.
मुंबईमध्ये रवी राजा हे काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत. मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची चांगली कामगिरी राहिली आहे. रवी राजा हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. मात्र, आता त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. रवी राजा यांचा सायन-प्रतिक्षा नगर भागात चांगला संपर्क आहे. या ठिकाणी ते नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते.
आपल्याला सलग दोनदा डावलले गेले आहे त्यामुळे आपण काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आहोत असे रवी राजा यांनी म्हटले आहे. रवी राजा तीन दशकांहून अधिक काळ काँग्रेसमध्ये होते. ऐन विधानसभेच्या तोंडावर रवी राजा यांनी काँग्रेसला हात दाखवत कमळ हाती घेतले आहे. त्यांच्याबरोबरच बाबू दरेकर या शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षातले नेते भाजपात आले आहेत.
कोण आहे रवी राजा?
रवी राजा हे मागील ४ दशकांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. १९८० मध्ये रवी राजा यांनी युवक काँग्रेसपासून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली होती. आपण मागील चार दशकांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत आहोत. मुंबई महापालिकेच्या राजकारणात अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख आहे. सायन परिसरात दक्षिण भारतीय समाजात त्यांची चांगली ताकद आगे. मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड वारंवार डावलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पक्षासाठी झोकून काम केले. पण, पक्षाकडून त्याचा आदर ठेवण्यात आला नाही. यामुळे आपण निराश झालो असून राजीनामा देत असल्याचे रवी राजा यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
रवी राजा यांच्यासह उपाध्यक्ष अभिषेक सावंत, ठाकरे गटाचे घाटकोपरचे विभाग प्रमुख बाबू दरेकर यांनीदेखील भाजपामध्ये प्रवेश केला आहे. रवी राजा यांना उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. रवी राजा यांची मुंबई उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. रवी राजा हे आमचे जुने मित्र आहेत. रवी राजा हे अभ्यासू नेतृत्व आहे. बीएसटीच्या बाबतीत तर यांचा अभ्यास दांडगा आहे असे आशिष शेलार यावेळी म्हणाले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिवाळीच्या पहिल्या दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवी राजा यांनी भाजपात प्रवेश केला आहे मी त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो. बाबू दरेकर हे उबाठा सेनेचे आहेत.भाजपात त्यांनी प्रवेश केल्याने आमची घाटकोपरची ताकदही वाढणार आहे. त्यामुळे मी दरेकर यांचेही स्वागत करतो. आता ५ किंवा ६ नोव्हेंबरपासून प्रचार सुरु झालेला असेल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा