Thursday, May 2, 2024
Homeअग्रलेखशाळा पुन्हा बंद पडू नयेत यासाठी सामंजस्य गरजेचे!

शाळा पुन्हा बंद पडू नयेत यासाठी सामंजस्य गरजेचे!

राज्यातील शाळांच्या पहिली ती सातवीच्या वर्गाच्या घंटा अखेर घणाणल्या. नाशिक जिल्ह्यातील शाळा सुरु झाल्या आहेत. मुंबईमधील शाळा आजपासून सुरु होणार असल्याचे सांगितले जाते. पुण्यातील शाळा सुरु करण्याला देण्यात आलेली स्थगिती आज संपत आहे. तब्बल दीड पावणेदोन वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर शाळा बालपिढीच्या किलबिलाटाने गजबजल्या आहेत. काही पालकांनी मुलांना शाळेत सोडण्यासाठी रजा काढल्याचे आढळले. जणू काही त्यांच्या मुलांच्या आयुष्यातील शाळेचा पहिलाच दिवस असावा अशी लगबग काही ठिकाणी आढळली. अर्थात, छोट्या वर्गातील विद्यार्थ्यांचे रडगाणे काही ठिकाणी शिक्षकांनाही शांत करावे लागले. शाळांनीही विद्यार्थ्यांचे उत्साहाने स्वागत केले. ग्रामीण भागातील शाळा यात आघाडीवर होत्या. शहरी भागातील शाळांचे प्रवेशद्वार रांगोळ्यांनी सजवले होते. रंगीबेरंगी फुगे टांगले होते. ग्रामीण भागातील काही शाळांमध्ये मुलांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. शिक्षक-शिक्षिकांनी त्यांचे औक्षण केले. काही ठिकाणी मुलांना खाऊ वाटला गेला. शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे जे आकडे जाहीर झाले, त्यावरुन विद्यार्थीही शाळेत परतायला किती उत्सुक होते आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा सुरु करणे अत्यावश्यक होते हे लक्षात येते. मुलांना शाळेत सोडायला आणि शाळा सुटल्यावर घ्यायला आलेले पालक सुद्धा मुलांच्या शाळा पुन्हा सुरु झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत होते. ओमायक्रॉनच्या भीतीपेक्षा मुले शाळेत जायला लागल्याबद्दल काही पालकांनी माध्यम प्रतिनिधींकडे समाधान व्यक्त केले. माध्यमांनी सातत्याने चालवलेल्या प्रचार मोहिमेमुळे करोनाची दहशत वाढली होती. त्या काळात काळात शाळा सुरु करण्यास पालकांचाही विरोध होता. मुलांना लसीकरण झालेले नाही असाही पालकांचा आक्षेप होता. तो गैर नव्हता आणि नाही. तथापि शाळांशिवाय मुलांचे व्यक्तिमत्व फुलत आणि विकसित होत नाही हे पालकांच्याही कालांतराने लक्षात आले असावे. शाळा बंद असल्यामुळे मुलांचा केवळ अभ्यासच थांबलेला नाही तर त्यांच्यावर होणार्‍या मुल्यसंस्कारांची आणि सर्वांगीण विकासाची उणीव कदाचित पालकांना जाणवू लागली असावी. घराबाहेर न पडण्यामुळे गल्लीतल्या खेळांअभावी मुलांची झालेली कोंडी दीर्घकाळ लांबली. त्या कोंडीचा परिणामही पालकांना बेचैन करत होता. शाळा ऑनलाईन सुरु होत्या पण त्या पद्धतीने शिकवण्याचे तंत्र शिक्षकांच्या आणि शिकण्याचे तंत्र विद्यार्थ्यांच्या किती पचनी पडले असेल याविषयी शिक्षणक्षेत्रातच साशंकता आहे. त्यामुळेच अपवाद वगळता पालकांनीही मोठ्या प्रमाणात शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. शाळा सुरु करण्याची आवश्यकता महत्व मानसतज्ञ वारंवार विशद करत होते. शाळेत बालवयावर होणारे सहजीवनाचे संस्कार किती महत्वाचे असतात हेही त्या तज्ञांकडून लक्षात आणून दिले जात होते. शाळा बंद असल्यामुळे बुडालेला अभ्यास एकवेळ भरुन काढता येऊ शकेल पण शाळा लवकर सुरु झाल्या नाहीतर मुले एकलकोंडी आणि स्वयंकेंद्री होतील, त्यांच्यातील मैत्रीची भावना कमी होईल, मुले मैदानी खेळ विसरतील आणि भविष्याच्या वाटचालीला उपयोगी पडतील अशी अनेक जीवनकौशल्ये शिकण्याची राहून जातील अशा अनेक गोष्टी समजावण्याचे प्रयत्न जाणत्यांकडून होत होते. संबंधित सर्वांच्या भावना येनकेनप्रकारेन सरकारपर्यंत पोहोचल्या असाव्यात. कदाचित त्यामुळेच सरकारने सर्व शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला असावा. वर उल्लेखिलेल्या उणीवा लवकरात लवकर भरुन कशा काढल्या जातील यासाठी शिक्षकांचे कौशल्य आता पणाला लागायला हवे. शैक्षणिक वर्षातील नैमित्तिक वेळापत्रकाला पर्याय नाही. त्यामुळे सातवीच्या पुढच्या इयत्तेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना शाळा सुरु होताच शालेय परीक्षांना सामोरे जावे लागले होते. आत्ताही कदाचित तसे घडू शकेल. परीक्षांमध्ये मुले कदाचित अपेक्षेप्रमाणे प्रगती दाखवू शकणार नाहीत. परिणामी संबंधित सर्व घटकांमध्ये एकमेकांवर दोषारोप केले जाण्याची शक्यता संभवते. तथापि तसे घडू नये. दीर्घ मुदतीनंतर शाळा सुरु झाल्या आहेत. त्या बदलाशी जुळवून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ द्यावा लागणार आहे हे शालेय व्यवस्थापन, शिक्षक आणि पालकांना विसरुन कसे चालेल?

- Advertisment -

ताज्या बातम्या