Sunday, May 19, 2024
Homeधुळेसीटीस्कॅन : दर जास्त त्यात वागणूक चुकीची

सीटीस्कॅन : दर जास्त त्यात वागणूक चुकीची

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

सध्या करोनाचा सुरु असलेला उद्रेक, दिवसेंदिवस बाधितांची वाढत जाणारी संख्या हा सगळ्यांसाठीच चिंतेचा विषय असतांना कोरोना तपासणीपुर्वी कराव्या लागणार्‍या सीटी स्कॅनसाठी (एचआरसीटी) धुळ्यात जास्तीची पैसे घेतले जात आहेत.

- Advertisement -

इतकेच नव्हे तर अशा सेंटरमध्ये रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना वाईट वागणूक दिली जात असल्याची तक्रारही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत या विषाणुने अक्षरशः हैदोस घातला आहे.

महाराष्ट्रात सगळीकडेच प्रचंड फैलाव होत असतांना धुळे जिल्ह्यातही रोज वाढणारी आकडेवारी प्रशासनासह सार्‍यांसाठीच डोकेदुखी ठरणारी आहे. जिल्हाधिकारी संजय यादव, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, मनपा आयुक्त अजिज शेख यांच्यासह हिरे वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस कमालीची मेहनत घेवून सेवा बजावत आहेत.

प्रशासनातील अधिकारी, डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी यांच्यासोबतच समाजातील विविध घटक कोरोनाशी दोन हात करतांना जीवाची पर्वा न करता लढत आहेत. रुग्णांना, जनतेला अधिकाधिक सेवा देण्याचा, सुरक्षीत ठेवण्याचा प्रयत्न सुरु आहे. खरे तर लढणार्‍या या सार्‍यांना मनापासून सलाम केला पाहिजे.

परंतु कोरोनाची वाढती संख्या जणू आपल्यासाठी सुवर्णसंधी असल्याचे समजून काही खासगी लॅबवाले मात्र आर्थिक लूट करीत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर खासगी हॉस्पिटलमध्ये देखील बिलांच्या बाबतीत लूट सुरु असून दररोज कुठल्या न कुठल्या हॉस्पिटल संदर्भात तक्रारी होवू लागल्या आहेत. पालिकेने यासाठी पथक नियुक्त केलेत, याचे समाधानही व्यक्त केले आहे.

जास्तीचे दर त्यातही दादागीरी

शासनाने कोरोनाच्या संदर्भात मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक प्रसिध्द केले आहे. मागील वर्षाचे हे परिपत्रक यंदाही लागू आहे. यामध्ये कोणत्या कारणासाठी किती पैसे घ्यायचे, रुग्ण बाधित असेल, रुग्णालयात दाखल असेल तर त्यावर होणार्‍या उपचाराबाबतही स्पष्ट सूचना आहेत.

अतिदक्षता विभागासह इतर बाबींचे दर निश्चित करुन सुस्पष्टपणे जाहीर केलेले असतांना देखील काही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शासकीय दर बाजुला ठेवून अव्वाच्या सव्वा दर आकारले जात आहेत. धुळे शहरातील काही हॉस्पिटलवर तर चार-चार वेळा कारवाई देखील झाली आहे.

रुग्णांच्या नातेवाईकांनी तक्रार करण्याची हिम्मत दाखविली तरच असे प्रकार उघड होतात. पालिकेच्या पथकाने जावून अगदी चार लाखांचे बिल लाख-दीड लाखापर्यंत खाली आणले जाते. याचा अर्थ रुग्णसेवेच्या नावाखाली चाललेली ही सर्रास लूट आहे.

एकीकडे जीवदान देणार्‍या डॉक्टरांना देवदूत म्हणून संबोधले जात असतांना आणि याच शहरात अनेक डॉक्टर खर्‍या अर्थाने अनेकांसाठी देवदूत ठरत असतांना ठरावीक ठिकाणी सुरु असलेली लूट थांबली पाहिजे, अशी अपेक्षा या सामाजिक कार्यकर्त्यांसह समाजामधूनही व्यक्त होते आहे.

विशेष म्हणून असे हॉस्पिटल किंवा सीटी स्कॅन सेंटरमध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मिळणार्‍या वागणुकीबद्दल देखील अनेक तक्रारी आहेत. ते सांगतील तेव्हढे पैसे, तेही रांगेत उभे राहून भरले जात असतांना देखील तासंतास नंबर लागत नाही.

त्रास होवू लागल्याने नंबर कधी लागेल? अशी विचारणा करणार्‍यांना वाईट शब्दात फटकारले जाते. आधीच आजाराने बेजार झालेल्या, कोरोनाची भिती मनात असलेल्या रुग्णांना आधार देण्या ऐवजी काहीठिकाणी मिळणारी वागणूक ही मानवतेला शोभणारी नाही.

एकीकडे आम्ही सेवा करीत असल्याचे भासवले जात असतांना मात्र जास्तीचे पैसे घेवून देखील ही अशी वागणूक मिळत असेल तर यात कसली आली सेवा? असा प्रश्न उपस्थित होतो. यामुळे रुग्णांची होणारी आर्थिक लूट थांबली नाही, तर आंदोलन छेडण्याचाही या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या