संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
शहरात गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ व्हायरल होत होता. त्यामध्ये दोन तरुण मोटारसायकल फूटपाथवर अतिशय धोकादायक व बेदरकारपणे चालवून स्वतःच खाली पडून जखमी झाल्याचे दिसत आहे. सदरच्या तरुणांनी ही स्टंटबाजी रील्स बनवण्यासाठी केल्याचे दिसून येत असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी याची गंभीर दखल घेत तिघांवर संगमनेर शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
सदर व्हिडिओबाबत शहर पोलिसांनी स्वतःहून शहानिशा केली असता सदरची घटना ही शहरातून जाणार्या जुन्या पुणे-नाशिक महामार्गानजीक महाविद्यालयाजवळील फूटपाथवर घडलेली असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी यातील तरुणांची ओळख उघड करत त्यांच्यावर पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल माफीनामा देखील दिला आहे.
रील्स बनवण्यासाठी रात्रीच्या वेळी अतिशय धोकादायक अशी स्टंटबाजी त्यांनी केली आहे. या रील्स बनविण्याच्या नादात मोटारसायकलचा अपघात होऊन स्वतः देखील गंभीर जखमी झाले आहे. त्यांनीच परस्पर शहरातील एका रुग्णालयामध्ये उपचार देखील घेतले. त्यांच्या एका मित्राने या घटनेची रील्स बनवून ती समाज माध्यमांवर टाकली. सुदैवाने या घटनेत त्यांच्याशिवाय अन्य कोणी जखमी नाही.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी केली आहे. दरम्यान, अशाप्रकारे धोकादायकपणे वाहने चालवत असल्याचे निदर्शनास आल्यास गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.




