मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांचा निकाल (Zilla Parishad and Panchayat Samiti Election) जाहीर झाला असून अनेक ठिकाणी बड्या नेत्यांना, नेत्यांच्या नातेवाईक व कुटुंबीयांना पराभवाचा धक्का बसला आहे. जनतेने आपला कौल देताना नेतेमंडळींनाही धडा शिकवला आहे.
परभणी जिल्ह्यात माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांनी आपल्या पाच नातेवाईकांना जिल्हा परिषद निवडणुकीच्या (ZP Election) मैदानात उतरवले. मात्र, चार जागांवर त्यांना पराभव पत्कारावा लागला. त्यांचा पुतण्या काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाला आहे. मोहोळमध्ये कुरुल जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील स्वतः पराभूत झाले आहेत. तर नरखेड जिल्हा परिषद गटातून उमेश पाटील यांचे बंधू संतोष पाटील यांचा पराभव झाला आहे. राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे चिरंजीव सूरज पाटील यांचा पंचायत समिती निवडणुकीत विजय झाला आहे.
सांगली जिल्ह्यात (Sangli District) रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत यांच्या सूनबाई मोहिनी खोत बागणी जिल्हा परिषदेतून विजयी झाल्या आहेत. आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल आमेर अंभई गटातून जवळपास ३४३५ हजार मतांनी विजयी झाले आहेत. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील निंबवडे जिल्हा परिषद गटात भाजपच्या उमेदवार माधवी पडळकर विजयी झाल्या आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या त्या वहिनी आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती राहिलेले ब्रह्मानंद पडळकर यांच्या पत्नी आहेत. सोलापूर जिल्ह्यात सांगोला पंचायत समितीवर माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सुनबाई विजयी झाल्या.
अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव जिल्हा परिषद गटातून भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी विजयी झाल्या. तर चपळगाव पंचायत गणातून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू सागर कल्याणशेट्टी विजयी झाले आहेत.तोळनूर पंचायत गणातून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या कन्या शीतल सिद्धाराम म्हेत्रे विजयी झाल्या आहेत. सलगर जिल्हा परिषद गटातून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा मुलगा शिवराज सिद्धाराम म्हेत्रे हे विजयी झाले आहेत.
उत्तर सोलापूरच्या कोंडी जिल्हा परिषद गटातून माजी आमदार दिलीप माने यांचे पुत्र डॉ. पृथ्वीराज दिलीप माने विजयी झाले आहेत. दक्षिण सोलापूरच्या हत्तूर जिल्हा परिषद गटातून माजी आमदार रतिकांत पाटील यांच्या पत्नी लक्ष्मी पाटील विजयी झाल्या आहेत. धाराशिव जिल्ह्याच्या परंड्यातील शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी विजयी झाली आहे.
धाराशिवमध्ये समाजवादीने खाते उघडले
धाराशिव जिल्ह्यात समाजवादी पक्षाने खाते उघडले असून येथील मंगरूळ जिल्हा परिषद गटातून सीमा माडजे रोचकरी तर आरळी पंचायत समिती गणातून कृष्णा रोचकरी हे भाऊ-बहीण विजयी झाले आहेत. संभाजीनगर तालुक्यातील वडगाव कोल्हाटी गटातील भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन गरड यांना एक मताने विजय मिळाला. शिंदे गटाचे हनुमंत भोंडवे यांचा त्यांनी पराभव केला.





