अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
रिलायबल ग्रुप ऑफ कंपनीअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या रिलायबल लॅण्ड ओनर्स अॅण्ड डेव्हलपर्स लि. या कंपनीमध्ये गुंतवणूक करून अनेक नागरिकांची आर्थिक फसवणूक करणारा आणि तब्बल सात वर्षे पसार असलेला मुख्य संशयित आरोपी डॉ. संतोष विश्वनाथ कोथिंबिरे (रा. श्रीगोंदा) याला अखेर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे.
गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा व विविध बक्षिसांचे आमिष दाखवून 39 लाख 84 हजार रूपयांची फसवणूक केल्याचा आरोपावरून सन 2018 मध्ये कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संगिता सोमनाथ तरटे (रा. पळवे खुर्द, ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली होती. डॉ. कोथिंबिरे व इतर सहआरोपी भगवतीबाई सिसोदिया (रा. मध्यप्रदेश) आणि संतोष पवार (रा. मध्यप्रदेश) यांनी वाडिया पार्क, माळीवाडा, अहिल्यानगर येथे रिलायबल ग्रुपची उपकंपनी स्थापन केली होती. एफ.डी. व आर.डी.च्या पावत्या देऊन अधिक परताव्याचे अमिष दाखवत त्यांनी एकूण 39 लाख 84 हजार रूपये गुंतवणूकदारांकडून गोळा केले. मुदतपूर्ती झाल्यानंतरही गुंतवणूकदारांना परतावा न देता आरोपींनी कार्यालयाला कुलूप ठोकत पसार होत गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केली. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
आरोपी डॉ. कोथिंबिरे सातत्याने ठिकाण बदलत पळ काढत होता. तपास अधिकार्यांना त्याचा कोणताही ठोस सुगावा लागत नव्हता. मात्र माहितीदारामार्फत व तांत्रिक विश्लेषणाच्या साहाय्याने आर्थिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की आरोपी पुणे येथील साई श्रध्दापार्क, मांजरी बुद्रुक येथे राहात आहे. त्यानंतर तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक शिशीरकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पुण्यात धाड टाकून आरोपीला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला न्यायालयात हजर केले असता 9 डिसेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक देशमुख व योगेश जाधव, उपनिरीक्षक योगेश पवार, अंमलदार कावरे, खोमणे, राहुल गुंड्डू यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
गुंतवणूकदारांसाठी आवाहन
रिलायबल लॅण्ड ओनर्स अॅण्ड डेव्हलपर्स लि. मध्ये ठेव स्वरूपात रक्कम जमा करूनही परतावा न मिळालेल्या गुंतवणूकदारांनी आपल्या पावत्या, कागदपत्रे व उपलब्ध पुराव्यांसह आर्थिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.





