मुंबई | Mumbai
मराठी मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचे निधन झालेय. एकेकाळी त्यांची दूरदर्शनवरील ‘चिमणराव आणि गुंड्याभाऊ’ मालिकेत साकारलेली ‘गुंड्याभाऊ’ची भूमिका चांगलीच गाजली. बाळ कर्वे यांचे आज सकाळी १०.१५ च्या सुमारास निधन झाले अशी माहिती त्यांच्या कन्या स्वाती कर्वे यांनी माध्यमांना एका पोस्टद्वारे दिली आहे. तीन दिवसांपूर्वीच बाळ कर्वे यांनी त्यांचा ९५ वा वाढदिवस साजरा केला होता. मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनी आणि चाहत्यांनी बाळ कर्वे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
बाळ कर्वे यांचा जन्म २५ ऑगस्ट १९३० ला झाला होता. त्यांनी चिमणराव मालिकेत केलेली गुंड्याभाऊंची भूमिका लोकांच्या मनात आठवण करुन राहिली आहे. ही मालिका १९७९ मध्ये प्रसारित झाली होती. मात्र या मालिकेतून गुंड्याभाऊची भुमिका साकारणाऱ्या बाळ कर्वेंना लोक गुंड्याभाऊ या नावानेच हाक मारत होते. गुंड्याभाऊ या पात्राने मिळवून दिलेली ओळख इतकी आहे की आजही विलेपार्ल्यातून फिरताना लोक गुंड्याभाऊ म्हणूनच मला ओळखतात, असे कर्वेंनी एका मुलाखतीत सांगितले होते.

बाळ कर्वेंची अशी राहिली कारकिर्द
बाळ कर्वे यांनी टीव्ही मालिका आणि रंगभूमीवरील दर्जेदार कलाकृतींमघ्ये काम केले आहे. ‘सूर्याची पिल्ले’, ‘रथचक्र’, ‘तांदुळ निवडता निवडता’, ‘मनोमनी’, ‘कुसुम मनोहर लेले’ अशा नाटकांमध्ये बाळ कर्वे यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या. ‘प्रपंच’, ‘राधा ही बावरी’, ‘वहिनीसाहेब’, ‘उंच माझा झोका’ या मालिकांमध्ये बाळ कर्वेंनी काम केले होते. ‘जैत रे जैत’ हा बाळ कर्वेंनी अभिनय केलेला पहिला चित्रपट. या सिनेमासोबतच ‘सुंदरा सातारकर’, ‘चांदोबा चांदोबा भागलास का’, ‘चटक चांदणी’, ‘बन्याबापू’ अशा सिनेमांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका विशेष गाजल्या.

रंगभूमीवरचा त्यांचा आजवरचा प्रवास अविस्मरणीय ठरला. भारतीय टीव्ही मालिकांची नांदी देणारी चिं. वि. जोशी यांच्या ‘चिमणराव’ या मालिकेत त्यांनी गुंड्याभाऊंची भूमिका छोट्या पडद्यावर साकारली होती. मिळालेल्या संधीचे सोने कसे करावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी साकारलेला गुंड्याभाऊ. खरेतर या भूमिकेसाठी ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर यांचे नाव विचारात होते, पण काही कारणाने हे घडले नाही आणि ही भूमिका बाळ कर्वे यांना मिळाली. त्यांनी ती भूमिका अजरामर केली.
सई परांजपे यांच्या ‘कथा’ या एकमेव सिनेमात त्यांनी अभिनय केले होते.. मराठी मनोरंजन विश्वातील ‘प्रीतीचे झुळझुळ पाणी’ हे गाजलेले गाणे बाळ कर्वे यांच्यावर चित्रित झाले आहे. उत्कृष्ट अभिनय, मराठी भाषेवर प्रभुत्व, नम्र स्वभाव, अभिनयाची समज आणि सहकलाकारांसोबतची मैत्री अशा गुणांमुळे बाळ कर्वे ओळखले जात असत. बाळ कर्वे यांच्या निधनामुळे अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





