अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातून कनिष्ठ अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेल्या एका लोकसेवकाने ठेकेदाराच्या कामाचा अहवाल देण्यासाठी 7 हजार रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी निवृत्त अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार ठेकेदार असून, त्यांनी श्रीगोंदा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणार्या रस्ता मजबुतीकरण आणि डांबरीकरणाची दोन कामे केली होती. नियमानुसार, या कामांची बिले मंजूर होण्यासाठी राज्य गुणवत्ता निरीक्षण विभागाचा अहवाल आवश्यक असतो. हा अहवाल मिळवून देण्याच्या बदल्यात जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता, वर्ग-3, प्रकाश निवृत्ती पाचनकर (वय 58) याने ठेकेदाराकडे लाचेची मागणी केली. पाचनकर याने पुणे येथील गुणवत्ता निरीक्षक आर. एस. देशमुख यांच्याकडून अहवाल मिळवून देतो, असे सांगून प्रत्येक कामासाठी 3 हजार 500 रुपये, याप्रमाणे दोन्ही कामांसाठी 7 हजार रुपयांची मागणी केली.
ठेकेदाराने अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात याबाबत 16 एप्रिल 2025 रोजी तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक छाया देवरे व पथकाने त्याच दिवशी सापळा रचून लाच मागणीची पडताळणी केली. यावेळी, प्रकाश पाचनकर याने तक्रारदाराकडे दोन्ही कामांसाठी 7 हजार रुपयांच्या लाचेची स्पष्ट मागणी केली आणि ती रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर पथकाने पुढील कारवाई करत पाचनकर विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.




