Sunday, May 10, 2026
HomeनगरAhilyanagar : ‘महसूल’चा सुधारित आकृतीबंध मंजूर

Ahilyanagar : ‘महसूल’चा सुधारित आकृतीबंध मंजूर

35 हजार 876 पदांसह प्रशासकीय रचनेत मोठे बदल

मुंबई, अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महसूल प्रशासनातील कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी, या उद्देशाने महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे महसूल विभागाच्या रचनेत मोठे बदल होणार असून एकूण 35 हजार 876 पदांना मंजुरी देण्यात आली आहे. महसूल विभागाने गुरुवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.

- Advertisement -

सन 2006 नंतर म्हणजे 20 वर्षांनी महसूल विभागातील क्षेत्रीय कर्मचार्‍यांचा सुधारित आकृतीबंध सरकारने मान्य केला आहे. मागील वीस वर्षांत महसूल आणि बिगर महसुली कामात अनेक बदल झाले. त्यामुळे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्याशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने या आकृतिबंधाला मान्यता दिली. महसूल विभागातील 34 हजार 576 नियमित आणि 1 हजार5300 बाह्यस्रोतांद्वारे असे मिळून 35 हजार 876 पदांचा आकृतीबंध सरकारने मान्य केला.

प्रशासकीय पुनर्रचना आणि नवीन कार्यालये
सरकारने महसूल विभागाची नवीन संरचना निश्चित केली असून यामध्ये विभाग, जिल्हा आणि तालुका पातळीवरील कार्यालयांचा समावेश आहे. यात 6 विभागीय आयुक्तालये, 36 जिल्हाधिकारी कार्यालये, 192 महसूल उपविभागीय कार्यालये आणि 360 तहसीलदार कार्यालयांचा समावेश आहे. तसेच क्षेत्रीय स्तरावर 2 हजार 625 मंडळ कार्यालये आणि 15 हजार 747 तलाठी साजांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. प्रशासकीय सोयीसाठी 11 नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये आणि 8 नवीन उपविभागीय कार्यालय, 2 तहसीलदार कार्यालय, 69 अतिरिक्त तहसीलदार कार्यालयांना मान्यता देण्यात आली आहे.
उमाकांत दांगट समितीच्या शिफारशींनुसार हा सुधारित आराखडा तयार करण्यात आला असून, यामुळे महसूल विभागाच्या कामकाजात आधुनिकता आणि वेग येणार आहे. नवीन कार्यालयांचे मुख्यालय आणि कार्यक्षेत्र निश्चित करण्याची प्रक्रिया आता जिल्हाधिकारी स्तरावर वेगाने पूर्ण केली जाणार आहे.

काळानुरूप वाढलेला कामाचा व्याप आणि लोकांच्या गरजा लक्षात घेऊन हा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. यामुळे प्रशासकीय कामात अधिक सुसूत्रता येईल. पारदर्शक आणि गतिमान प्रशासनासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री

नेवासा, अकोलेत नवीन अपर तहसीलदार कार्यालय; अपर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डीतच
दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्याचा मोठा जिल्हा म्हणून समावेश आहे. अपर जिल्हाधिकारी अहिल्यानगर आणि शिर्डीत आहे. हे कार्यालय शिर्डी ऐवजी श्रीरामपूरला व्हावे अशी मागणी होतीं. पण या आकृतीबंधात ते शिर्डीतच राहणार आहे. महसूल विभागनिहाय अस्त्विाततील तालुके मोठे, मध्यम आणि लहान यात समाविष्ट करण्यात आले आहेत. यात अहिल्यानगर, पारनेर,संगमनेर, राहुरी, नेवासा, अकोले आणि श्रीगोंदा हे मोठे तालुके म्हणून समावेश करण्यात आला आहे. तर शेवगाव, पाथर्डी, कोपरगाव, जामखेड, राहाता, श्रीरामपूर आणि कर्जतचा समावेश मध्यम तालुके म्हणून समावेश करण्यात आला आहे. तसेच अकोले आणि नेवाशात नवीन अपर तहसीलदार कार्यालये होणार आहेत.

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात आणखी एक भोंदूबाबा गजाआड

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur तंत्र मंत्राच्या साह्याने उतारे काढून जडीबुटी खाण्यास देऊन सुमारे 15 ते 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिसांनी तालुक्यातील पूर्व भागातील...