अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील स्वास्तीक चौक, गणेशवाडी भागात राहणार्या एका व्यापार्याला तांदुळामध्ये जादा नफ्याचे आमिष दाखवून तब्बल 1 कोटी 11 लाख 60 हजार रूपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीयुष संजय शिंगवी (वय 35) यांनी मंगळवारी (31 मार्च) रात्री फिर्याद दिली आहे. सतिष सिद्रप्पा कोरी, अर्थव अशोक कोरी (दोघे रा. कर्वेनगर, पुणे), संमेध सुभाष बसववडे (रा. डोंबिवली, जि. ठाणे, हल्ली रा. सिंहगड रस्ता, पुणे) आणि प्रकाश सरजू तंडन (रा. छत्तीसगड, हल्ली रा. सिंहगड रस्ता, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहे. सदरची घटना सन 2025 पासून सुरू असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. संशयित आरोपींनी संगनमत करून व्यवसायात मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले. आरोपींनी विविध बनावट कागदपत्रे तयार करून शिंगवी यांचा विश्वास संपादन केला. या विश्वासाचा फायदा घेत आरोपींनी त्यांच्याकडून 1 कोटी 7 लाख रूपये किमतीचा तांदूळ घेतला.
इतकेच नव्हे तर, हा माल पोहोचवण्यासाठी आणखी 4 लाख 60 हजार रूपये ऑनलाइन स्वरूपात उकळले. माल घेऊनही त्याचे पैसे न देता आणि दिलेली आश्वासने न पाळता आरोपींनी शिंगवी यांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शिंगवी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख पुढील तपास करीत आहेत.




