Tuesday, May 7, 2024
Homeअग्रलेखबदल आता नाही तर कधी?

बदल आता नाही तर कधी?

युवा पिढीतील कॅन्सरचे वाढते प्रमाण हा राष्ट्रीय चिंतेचा विषय आहे. जागतिक पातळीवर यासंदर्भात अनेक सर्वेक्षणे होतात. त्याचे निष्कर्ष काळजीच वाढवतात. ब्रिटिश मेडिकल जर्नल मध्ये एका सर्वेक्षणाचे निष्कर्ष नुकतेच प्रसिद्ध झाले. भारतासह अनेक देशांमध्ये युवा पिढीत कँन्सर वाढण्याच्या प्रमाणात सध्याच्या तुलनेत सुमारे ७० टक्क्यांनी वाढ झाली आहे असे त्यात नमूद आहे. तरुणांमध्ये याव्यतिरिक्त विविध दीर्घकालीन व्याधींचे प्रमाणही लक्षणीय आहे. यामागची कारणे शोधून उपाय योजले जायला हवेत.

तरुणांचा देश अशी भारताची जागतिक स्तरावर ओळख आहे. याच युवा शक्तीच्या बळावर महासत्ता होण्याचे स्वप्न देश बघत आहे. तथापि तीच युवा पिढी अनारोग्याने ग्रस्त व्हायला लागली तर तो स्वप्नपूर्तीमधील मोठाच अडथळा ठरू शकेल. बदलती बैठी जीवनशैली हे याचे प्रमुख कारण मानले जाते. त्यात वाढते ताणतणाव, आहार विहाराच्या बदललेल्या सवयी, वाढती व्यसनाधीनता, व्यायाम न करणं, तंबाखू आणि दारूचं सेवन असे अनेक मुद्दे अंतर्भूत आहेत. पर्यावरणाशी संबंधित बदल हे देखील एक कारण असू शकेल असे तज्ञ म्हणतात. त्यावर उपाय योजने सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेरचे असू शकेल. तथापि अन्य याबाबतीत वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केले जाऊ शकतात. ते युवा पिढीच्या हातात आहे. कारणे गंभीरपणे घेतल्यास अनेक प्रकारच्या कॅन्सर संसर्गाला अटकाव करता येऊ शकतो याकडे तज्ज्ञ लक्ष वेधून घेतात.

- Advertisement -

तथापि त्याबाबतीत सद्यस्थिती नकारात्मक जास्त आढळते. बैठी जीवनशैली युवा पिढीने स्वीकारली खरी पण त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी दक्षता क्वचितच घेतली जाताना आढळते. व्यायामाचा अभाव, सामान्य हालचाली देखील कमीच आढळतात. जंक किंवा फास्ट फूड सेवन वाढत आहे. घरचे खाणे युवा पिढीला बॊरिंग वाटते. वास्तविक जिभेला जे चांगले ते पोटासाठी बरे नाही आणि जिभेला जे बेचव ते पोटासाठी चांगले असे म्हंटले जाते. भारतीय आहारात अल्ट्रा प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचा वापर वाढला आहे. २०३२ पर्यंत हा खप वेगाने वाढेल असा इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष माध्यमात प्रसिद्ध झाला आहे. मिळून सगळ्याचे दुष्परिणाम युवा पिढी जाणून आहे. अनेक सामाजिक संस्था स्वयंस्फूर्त काम करतात. तथापि ‘कळते पण वळत नाही’ हेच जाणत्यांचे निरीक्षण आहे. तथापि कॅन्सर आणि इतर व्याधींचे वाढते प्रमाण लक्षात घेता आता तरी वळायलाच हवे. माणसाला मरणाची सर्वांत जास्त भीती वाटते. त्या भीतीपोटी का होईना पण तरुण पिढी बदलाचे मार्ग प्रशस्त करेल का?

- Advertisment -

ताज्या बातम्या