Monday, May 6, 2024
Homeअग्रलेखवाढते तापमान, बाजारभावांचे आणि बिजलीबाईचे सुद्धा!

वाढते तापमान, बाजारभावांचे आणि बिजलीबाईचे सुद्धा!

काल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र साजरी झाली. ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. लोकशाहीत जनता सार्वभौम आहे असे ते म्हणत. ‘लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही’ अशी लोकशाहीची व्याख्या विद्यार्थी दशेत शिकवली जाते. भारतीय राज्यघटनेनेही लोकांना काही मुलभूत हक्क बहाल केले आहेत. तात्पर्य, सामान्य माणसे लोकशाही बळकट करतात असे मानले जाते. याच सामान्य माणसांची सध्या ‘मुकी बिचारी कोणीही हाका’ अशी अवस्था झाली आहे. सध्या चर्चा फक्त वाढत्या तापमानाचीच होत असली तरी जनतेच्या डोक्याला मात्र असंख्य प्रकारचे ताप होत आहेत. तापमानाच्या पार्‍याने अनेक गावांमध्ये चाळीशी कधीच ओलांडली आहे. चंद्रपूरसारख्या ठिकाणी तर पारा 44 अंशांपर्यंत पोहोचला आहे. नाशिक हे थंड हवेचे ठिकाण मानले जाते. पण नाशिकमध्येही दुपारचे कडक ऊन सोसवेना झाले आहे. सकाळी साडेआठ-नऊलाच सुर्य माथ्यावर आला असे वाटावे अशी परिस्थिती भारतात सर्वत्र आहे असे सांगितले जाते. आगामी तीन-चार दिवस उष्णतेची लाट राहिल असा इशारा हवामानखाते अधुनमधून देतच असते. याच काळात भारनियमनाच्या झळा जनतेला सोसाव्या लागतील अशीच चिन्हे आहेत. राज्यात कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्याने भारनियमन करावे लागण्याचे संकेत राज्याच्या उर्जामंत्र्यांनीच जाहीररित्या दिले आहेत. तर कोळशाच्या अभावामुळे राज्यातील एकही वीजनिर्मिती केंद्र बंद नसल्याची माहिती महापारेषणच्या संकेतस्थळावर असल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. राज्याच्या अनेक भागात अघोषित भारनियमन सुरु झाल्याची लोकांची तक्रार आहे. काही गावांमध्ये संबंधित अधिकार्‍यांना आणि कर्मचार्‍यांना लोक कोंडून ठेवत असल्याचे वृत्त त्या त्या वेळी माध्यमात झळकत असते. महागाईचाही रोज नवानवा तडाखा जनतेच्या सहनशक्तीचा अंत पाहात आहे. जनतेच्या दैनंदिन जगण्याशी संबंधित पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, वाहनात भरावयाचा गॅस, डाळी, खाद्यतेले, दूध अशा सर्वच वस्तूंच्या किंमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. औषधांच्या किमतीतील बेसुमार वाढीला काही मर्यादाच नाही. कोथिंबीर आणि मेथीच्या भाज्यांची जुडी देखील 40-50 रुपयांना घेण्याची वेळ लोकांवर आली आहे. शाळा सुरु-बंदचा खेळ सध्याही सुरुच आहे. राज्यातील राजकीय खेळाचाही जनतेला पुरता वीट आला आहे. पलटवार, प्रत्युत्तर, दणका, खरमरीत उत्तर देणे या शब्दांची सध्या माध्यमात रेलचेल आहे. तथापि वाचकांपैकी कितींना त्या शब्दांचा नेमका अर्थ समजतो? जनतेच्या समस्यांनाच मात्र खरे उत्तर कोणी देईनासे झाले आहे. मग खरमरीतपणा केवळ शब्दातच डोकावतो. सध्या राजकारणात वैयक्तिक पातळीवर आरोप-प्रत्यारोपांचा आणि धाडी-प्रतीधाडींचा जो खेळ रंगला आहे त्यानेही लोक उबगले आहेत. सध्याचे वातावरण कमालीचे दुूषित आहे. त्यात कळत-नकळत सहभागी झालेले सगळेच ‘उडदातीलच काळे गोरे’ आहेत याची मात्र जनतेची खात्री झाली आहे. कोणी पलटवार करावा, कोणी खरमरीत उत्तर द्यावे किंवा कोणी चुप्पी साधावी हा ज्याच्या त्याच्या राजकीय सोयीचा भाग आहे. तथापि सध्याच्या कडक उन्हाळ्यात वीज सारखी ये-जा करु लागली तर ती मात्र शासनाची जनमाणसातील प्रतीमा डळमळीत करु शकेल. कोळशाचा साठा, मागणी आणि पुरवठा यातील गणिते जनतेला समजत नाहीत. परिस्थितीने पिचलेल्या लोकांनी ती का समजावून घ्यावीत? ती गणिते समजावून घेण्यासाठी जनता आपले प्रतिनिधी किंवा सत्ताधार्‍यांची निवड करते. लोकशाहीत बहुमोल मानले गेलेले मत उमेदवारांच्या झोळीत टाकते. पण सध्या त्याच जनतेची अवस्था ‘गरज सरो…’ अशी झाली आहे. वाढत्या तापमानाच्या झळांनी अस्वस्थ झालेल्या जनतेस किमान दिलासा कोण देणार?

- Advertisment -

ताज्या बातम्या