Tuesday, October 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजसिन्नरला नदीजोड प्रकल्प वरदान - उपमुख्यमंत्री अजित पवार

सिन्नरला नदीजोड प्रकल्प वरदान – उपमुख्यमंत्री अजित पवार

पूर कालव्यांच्या जलपूजनासह विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

- Advertisement -

पंचाळे । वार्ताहर Panchale

महायुतीचे सरकार हे सर्वसामान्यांचा विचार करणारे व छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे आहे. सर्वसामान्य शेतकर्‍यांचे हित डोळ्यासमोर ठेवून राज्याची योग्य दिशेने वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन झाल्यानंतर आयोजीत जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, माजी खासदार देवीदास पिंगळे, महिला तालुकाध्यक्ष मंगल कुर्‍हाडे, विजय गडाख, नवनाथ गडाख, विजय काटे, नवनाथ मुरडनर, नितीन आव्हाड उपस्थित होते. देवपूर येथे देव नदीवरील बंधार्‍याचे भूमिपूजन, पूरचारीच्या माध्यमातून भरलेल्या डांबरनाला येथे जल पूजन करण्यात आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आमदार कोकाटे यांनी मागणी केल्यानुसार दोन मतदारसंघात 130 बंधारे, दोन एमआय टँक, दोन बंदिस्त पूरचार्‍या यांच्या माध्यमातून पूराचे वाहून जाणारे पाणी अडवण्याचं काम कोकाटे यांनी केले आहे. जलपूजन करताना आपणास समाधान मिळाले आहे. शेतकर्‍याच्या अंगात पाणी असते. परंतु शिवारात पाणी आले तर त्याची शक्ती दुपटीने वाढते.

बंदिस्त पूरचार्‍यांसाठी आतापर्यंत 300 कोटी रुपये खर्च झाले आहेत. आमच्या महायुती सरकारचे ध्येय हे वचनपूर्तीकडे आहे. आम्ही काम करणारे आहोत. चार तालुक्यांना जोडणारा लासलगाव ते इगतपुरी हा 940 कोटी रुपयांचा 21 फुटांचा सिमेंट काँक्रीटचा रस्ता असून हा त्याची लांबी 148 किलोमीटर आहे.या रस्त्यामुळे गुजरात, मध्य प्रदेश या राज्यातील व मालेगाव- धुळे या भागातील शेतकर्‍यांना थेट मुंबईला भाजीपाला नेता येणार आहे. त्यामुळे व्यवसायाच्या संधी निर्माण होणार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराला मी शंभर-दीडशे कोटींचा एक रस्ता सूचवण्यास सांगितले होते. परंतु आमदार कोकाटे यांनी हजार कोटीच बजेट करून पाच आमदारांचा निधी मिळविला. ते दमदार आमदार आहेत.

त्यांच्या पाठीशी जनतेने उभे राहून त्यांना पुन्हा विधानसभेत पाठवावे असे आवाहन पवार यांनी केले. राज्याच्या कामासाठी आम्ही सदैव केंद्राकडे पाठपुरावा करतो. कांदा निर्यात बंदी उठवण्यास आम्ही केंद्राला भाग पाडले. दुधाला सात रुपये अनुदान दिले, एक रुपयात पिक विमा योजना चालू केली. साडे सात अश्वशक्तीपर्यंचे शेतकर्‍यांचे वीजबिल माफ केले. नदीजोड प्रकल्पासाठी आमचे प्रयत्न सुरू असून हा प्रकल्प मंजूर झाल्यानंतर सिन्नर तालुक्यावरील दुष्काळाचा कलंक पुसला जाणार आहे.

संविधान बदलण्याचा खोटा प्रचार लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधकांनी केला. मात्र, राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून आम्ही फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारावर चालत असून आम्ही जात, धर्म, पंथ असा भेद करीत नाही. मुस्लीमांना निधी दिला. येत्या विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाच्या वाट्याला आलेल्या जागांपैकी 10 टक्के जागा अल्पसंख्यकांना देणार असून काही नवे तर काही जुने चेहरे यांचा मिलाफ करणार असल्याचे पवार म्हणाले. राघोजी भांगरे स्मारकासाठी लवकरच निधी मंजूर होईल. या स्मारकापासून कळसुबाई शिखरापर्यंत रोप-वेचे कामही सुरू होईल, असे पवार म्हणाले.

सिन्नर तालुका निर्माण झाला तेव्हापासून पहिल्यांदाच तालुक्याला सर्वाधिक साडे तीन हजार कोटींंचा निधी अजितदादांमुळे एका वर्षात मिळाला असून राज्यातील सर्वाधिक लांबीचा सिंमेंटचा रस्ता दादांमुळेच तालुक्यात होत असल्याचे कोकाटे म्हणाले. शहा, उजनीला 33 केव्हीचे उपकेंद्र होणार असून परिसरात 500 ट्रान्सफॉर्मर बसवण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असल्याचे कोकाटे म्हणाले. प्रास्ताविक व स्वागत जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सिमंतिनी कोकाटे यांनी केले. कोकाटे यांच्या दूरदृष्टीमुळे तालुक्यात झालेल्या दोन पूरचार्‍यांमूळे तालुक्यावरील दुष्काळाचा कलंक पुसला जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.

दादांना दीड लाख मताधिक्याने निवडून आणेल
तालुक्याने 30-35 वर्ष मला भरपूर प्रेम दिले. जिल्हा परिषदेत निवडून दिले. जिल्हा बँकेत निवडून दिले. आपण चार वेळा निवडून आलो असून मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. जनता सदैव आपल्या पाठीशी उभी आहे. त्यामुळे मला आमदारकीची अपेक्षा नाही. अजितदादांनी सिन्नर तालुक्यातून विधानसभेसाठी उभे रहावे असे आवाहन कोकाटे यांनी केले. ही माझी ऑफर असून त्यांना दीड लाखांच्या मताधिक्क्याने निवडून आणेल. नाहीतर मंत्रालयाची पायरी पुन्हा चढणार नाही असे कोकाटे म्हणाले. मला सिन्नरची बारामती करायची असून सर्वांनी दादांच्या पाठीमागे उभे रहावे, महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी दादांना ताकद देणार असे कोकाटे म्हणाले. सिन्नरकर भाग्यवान आहेत की तुम्हाला कोकाटे यांच्यासारखा धडाकेबाज आमदार मिळाला. परंतु, मला बारामतीच चांगली. बारामती माझी, मी बारामतीचा असे अजितदादा म्हणाले. मी आपल्या घरातच जाऊन थांबतो. तुम्ही माणिकरावांना निवडून द्या. आपण स्पर्धा लावू, बारामतीला मला जास्त मते मिळतात की कोकाटे यांना सिन्नरला जास्त मते मिळतात याची पैंज लावू असे म्हणत आपण बारामतीतूनच लढणार हे त्यांनी स्पष्ट केले.

बंदीस्त कालव्यांचे लोकार्पण
कुंदेवाडी ते सायाळे या 157 कोटी रुपयांच्या व खोपडी ते मिरगाव या 154 कोटी रुपयांच्या बंदिस्त पूर कालव्यांचे पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तर देवपूर येथे जलपूजन करण्यात आले. लासलगाव, विंचूर ते सोमठाणे-पंचाळे- पांगरी-मर्‍हळ-मानोरी-हिवरे-पाडळी फाटा-ठाणगाव ते म्हैसवळण घाटमार्गे इगतपुरी टाकेद-वासाळी-इंदोरे-खडकेद-आंबेवाडी ते समृद्धी हायवे या महत्त्वाकांक्षी 146 किलोमीटर लांबीच्या व 940 कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. पाच कोटी रुपये निधीच्या सोमठाणे येथील शेती मार्केट व आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. उजनी येथील 33 केव्हीच्या वीज उपकेंद्राचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या