पटना । Patna
बिहारच्या राजकारणात मोठा उलटफेर घडला आहे. राज्यात यंदा होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी एनडीएला जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे (रालोजपा) प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांनी एनडीए आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.
सोमवारी माध्यमांशी बोलताना पारस म्हणाले, “२०१४ पासून आम्ही एनडीएसोबत होतो, मात्र आता रालोजपाचा एनडीएशी काहीही संबंध राहिलेला नाही.” एनडीएकडून आपल्याला सन्मान मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर दलितविरोधी असल्याची टीकाही केली. पारस हे चिराग पासवान यांचे काका असून, दोघांमध्ये पूर्वीपासून राजकीय मतभेद आहेत. लोकसभा निवडणुकीतही त्यांच्यातील संघर्ष समोर आला होता.
सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत पारस म्हणाले, “बिहारमध्ये लाच दिल्याशिवाय कोणतंही काम होत नाही. आम्ही वक्फ संशोधन विधेयकाचा विरोध करत आहोत. दारूबंदी धोरणाचा आम्ही विरोध करत नाही, पण त्याच्या नावाखाली गरीबांना तुरुंगात टाकणं अयोग्य आहे.” त्यांनी सरकारकडे गरीब कैद्यांच्या मुक्ततेची मागणी केली.
यावेळी त्यांनी स्व. रामविलास पासवान यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा अशी मागणीही केली. रालोजपा लवकरच राज्यातील २४३ मतदारसंघांमध्ये सदस्य नोंदणी अभियान सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
“जो पक्ष आम्हाला सन्मान देईल, त्यांच्यासोबत आम्ही युती करू,” असे सांगत त्यांनी कोणत्याही आघाडीसोबत अद्याप निर्णय न झाल्याचे स्पष्ट केले. मात्र, पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.