नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक शहर आणि जिल्ह्यातून (Nashik City and District) जाणाऱ्या राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरून प्रवास करताना हेल्मेट किंवा सीटबेल्ट वापरत नसाल, तर तुम्ही थेट मृत्यूला आमंत्रण देत आहात. ‘ब्लूमबर्ग फिलान्थ्रोपीज’ आणि ‘जॉन्स हॉपकिन्स इंटरनॅशनल इंज्युरी रिसर्च युनिट’ने महाराष्ट्र हायवे पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या विद्यमाने जाहीर केलेल्या ‘रोड सेफ्टी स्टेटस समरी २०२५’ या अहवालात राज्यातील रस्ते सुरक्षेचे भीषण वास्तव समोर आले आहे. यामध्ये राज्यातील अपघाती मृत्यूंची (Accident Death) संख्या तब्बल १५ हजार २२४ वर पोहोचली असून, त्यात सर्वाधिक बळी हे दुचाकीस्वार, पायदळ चालणारे आणि सायकलस्वारांचे (एकूण ७१ टक्के) जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नाशिक महानगरपालिका क्षेत्र, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग (Mumbai-Agra National Highway) आणि जिल्ह्यातील (District) राज्य महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर आणि बेशिस्तीवर या अहवालाने थेट बोट ठेवले आहे. निरीक्षणाखाली आलेल्या वाहनांचा सरासरी वेग ५६ किमी/तास इतका जास्त आढळून आला आहे. वेग मर्यादचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने सेडान कार (२५ टक्के), एसयूव्ही (२१ टक्के) आणि दुचाकी (१६ टक्के) आघाडीवर आहेत. तर, एक्स्प्रेस वे (७ टक्के) च्या तुलनेत राज्य महामार्गावर २१ टक्के आणि राष्ट्रीय महामार्गांवर १५ टक्के वाहने
अतिवेगाने धावताना आढळली.
नाशिकमधून (Nashik) जाणारे महामार्ग याच श्रेणीत येत असल्याने स्थानिक वाहनचालक किती धोक्यात आहेत, हे यावरून स्पष्ट होते. योग्य पद्धतीने हेल्मेट वापरणाऱ्या चालकांचे प्रमाण केवळ १९ टक्केच आहे. तर दुचाकीच्या मागे बसणाऱ्या प्रवाशांमध्ये (पिलियन रायडर) हेल्मेट वापरण्याचे प्रमाण फक्त ४ टक्के म्हणजेच जवळपास शून्य आहे. तसेच, चारचाकी वाहनांमध्ये फक्त ३१ टक्के लोकांनी सीट बेल्ट लावल्याचे आढळले. धक्कादायक बाब म्हणजे, १२ वर्षांखालील लहान मुलांसाठी ‘चाईल्ड रिस्ट्रॅट’ (सुरक्षा सीट /बेल्ट) चा वापर शून्य शून्य आढळला आहे. तर ओला-उबरसारख्या राईड शेअरिंग वाहनांमध्ये वेग मर्यादेचे उल्लंघन करण्याचे प्रमाण सर्वाधिक २३ टक्के आहे.
मृत्यूचा वाढता आलेख (महाराष्ट्राची स्थिती)
अहवालानुसार, २०२० मध्ये रस्ते अपघातातील मृत्यूंची संख्या ११,५६९ वर खाली आली होती, मात्र त्यानंतर ती सातत्याने वाढून २०२२ पर्यंत १५,२२४ वर जाऊन पोहोचली आहे.
‘ब्लूमबर्ग’ चा थेट इशारा!
या अहवालात नाशिक महानगरपालिका, जिल्हा व शहर पोलीस आणि हायवे पोलिसांना थेट उपाययोजना करण्याचे निर्देश व शिफारसी देण्यात आल्या आहेत.
मुद्दे
- – मॅन्युअल आणि ई-चलन सक्तीः केवळ कॅमेऱ्यावर विसंबून न राहता, अतिवेगाच्या कॉरिडॉरवर पोलिसांनी थेट मॅन्युअल कारवाई सुरू करावी आणि ई-चलन प्रणालीतील त्रुटी सुधारून दंड वसुली करावी.
- – स्पीड ब्रेकर आणि साईन बोर्ड्स: नाशिक मनपा आणि एमएसआरडीसीने अंतर्गत मुख्य रस्ते तसेच महामार्गावर गतिरोधक, रंबल स्ट्रिप्स आणि मलो-स्पीड झोनफचे साईन बोर्ड तातडीने लावणे गरजेचे आहे.
- – ‘हेल्मेट क्लास्प’वर कारवाई: मोटार वाहन कायदा कलम १२९ (बी) नुसार केवळ हेल्मेट डोक्यावर ठेवणे पुरेसे नाही, तर हेल्मेटची पट्टी लॉक केली आहे की नाही, यावर कडक मोहीम राबवावी.
रस्ते वापरकर्ते – मृत्यूचे प्रमाण (टक्के)
दुचाकीस्वार – ५१%
चारचाकी प्रवासी – २४%
पायी चालणारे – १९%
इतर – ५ %
सायकलस्वार – १%




