जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed
जामखेड तालुक्यातील नान्नज येथील रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या हल्ल्यातील उर्वरीत आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी आंबेडकरी समाजाच्यावतीने रविवारी (दि.7) जामखेड शहर कडकडीत बंद ठेवून रस्तारोको आंदोलन करण्यात आले.
आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी करत आरोपींना तातडीने अटक न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्याचा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी दिला. निवेदनात म्हटले आहे, 24 ऑगस्ट रोजी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबावर काही गावगुंडानी प्राणघातक हल्ला करून कुटुंबातील सदस्यांना गंभीर जखमी केले होते. त्यासंबंधी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. दि. 26 ऑगस्ट रोजी समस्त आंबेडकरी समाजाच्यावतीने पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना निवेदन दिले होते. आठ दिवसांत आरोपींना अटक करा, अन्यथा जामखेड बंद ठेवू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले यांनी दिला होता.
परंतु 14 पैकी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. साळवे कुटुंबावरील खोटा गुन्हा मागे घ्यावा, साळवे कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे, आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, मुख्य सूत्रधाराला अटक करावी, केस फास्टट्रॅक कोर्टात चालवून विशेष सरकारी वकीलाची नियुक्ती करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते अरुण जाधव, माजी प्रा. सुनिल जावळे, आझाद क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष पोपट फुले, पत्रकार बाळासाहेब शिंदे, प्रा. विकी घायतडक, माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक, समता ग्रुपचे अध्यक्ष संतोष गव्हाळे, राजन समिंदर, रवी सोनवणे, किशोर कांबळे, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष आतिश पारवे, जेष्ठ नेते प्रकाश सदाफुले, सचिन सदाफुले, वसीम बिल्डर, अमर चाऊस, माजी संचालक सागर सदाफुले, देवा मोरे, उमर कुरेशी, जमीर सय्यद उपस्थित होते.




