Friday, September 11, 2026
Homeक्राईमCrime News : दरोडेखोर टोळीतील पाच जण एलसीबीच्या जाळ्यात

Crime News : दरोडेखोर टोळीतील पाच जण एलसीबीच्या जाळ्यात

शिर्डीहून परतणार्‍या चौघांचे केले होते अपहरण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शिर्डी येथे दर्शन करून परत येत असलेल्या चौघांची कार अडवून त्यांना मारहाण करत अपहरण करणार्‍या दरोडेखोर टोळीतील पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी पाच संशयित अद्याप पसार असून त्यांचा शोध सुरू आहे. विशाल संपत पवार (रा. सुपा, ता. पारनेर) हे 14 जुलै रोजी रात्री त्यांच्या स्कॉर्पिओमधून मित्र संभा लोणकर, सुभाष गाढवे आणि संजू लोणकर यांच्यासह शिर्डीहून दर्शन करून परत येत होते. देहरे (ता. अहिल्यानगर) परिसरातील रेल्वे पुलाजवळ दोन चारचाकी वाहनांतून आलेल्या सात ते आठ जणांच्या टोळीने त्यांना मारहाण करून अपहरण केले. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी सोडून संशयित पसार झाले.

- Advertisement -

विशाल पवार यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला संशयित आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड, अंमलदार गणेश लोंढे, राहुल व्दारके, रोहित येमुल, प्रशांत राठोड, प्रकाश मांडगे आदींचे विशेष पथक तयार करण्यात आले.

तपासादरम्यान शेंडी बायपास परिसरात पिंटू उर्फ भाऊ आनंदा रसाळ (रा. रसाळवाडी, निघोज, ता. पारनेर) आणि बंटी उर्फ स्वप्निल बिभीषण पाबळे (रा. कावळ पिंपरी, ता. जुन्नर, जि. पुणे) हे गावठी कट्ट्यासह संशयास्पदरीत्या आढळून आले. चौकशीत त्यांनी दरोडा व अपहरणाची कबुली देत इतर साथीदार चास परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना दिली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी चास गावच्या शिवारात सापळा रचून भाऊसाहेब रामचंद्र लंघे (रा. संविदने, ता. शिरूर), हर्षद मनोज थोरात (रा. लोणी धामणी, ता. आंबेगाव, जि. पुणे), जावेद किन्नर काळे (रा. राळेगण थेरपाळ, ता. पारनेर), मिनीनाथ पोपटराव वाघस्कर (रा. निंबोडी, जामखेड रोड, ता. अहिल्यानगर) आणि जितेश सुरेश सरडे (रा. देवीभोयरे, ता. पारनेर) यांना ताब्यात घेतले. चौकशीत या आरोपींनीही गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यात सचिन धोंडीभाऊ रसाळ, ऋषिकेश उर्फ भैय्या सुभाष भोसले, समाधान भांबरे, राजेंद्र रमेश सोडे आणि प्रवीण आनंदा रसाळ हे पाच संशयित अद्याप पसार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दुष्काळाची चाहूल; ऑगस्टपाठोपाठ सप्टेंबरही कोरडा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्ह्यात ऑगस्टपाठोपाठ सप्टेंबर महिन्यातही पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पिके होरपळून निघत असून राहुरी, श्रीरामपूर,...