अहिल्यानगर |कर्जत |प्रतिनिधी| Ahilyanagar | Karjat
मिरजगाव ते कर्जत रस्त्यावरील पठारवाडी येथे दरोड्याच्या तयारीत असलेल्या 9 जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून 12 लाख 16 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कर्जत येथील व्यापार्याला लुटण्याचा गुन्हाही उघड झाला आहे.
संदीप बबन बर्डे (वय 32), विनोद बबन बर्डे (वय 27), राहुल दिलीप येवले (वय 22), आकाश माणिक चव्हाण (वय 23), दिलीप यल्लप्पा फुलमाळी (वय 21), संजय छबुराव गायकवाड (वय 30, सर्व रा. वारणी, ता. शिरूरकासार, जि. बीड), शुभम महादेव धायतडक (वय 22 रा. पाथर्डी), बाळासाहेब दगडू बडे (वय 23 रा. टाकळीमानूर, ता. पाथर्डी) व एक विधीसंघर्षित बालक (वय 17) अशी पकडलेल्यांची नावे आहेत. तर भारत यल्लप्पा फुलमाळी (रा. वारणी) हा पसार झाला आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखालील तपास पथक कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोड्याच्या प्रतिबंधासाठी गस्त करत असताना पोलीस अंमलदार बबन मखरे यांना गुप्त माहिती मिळाली की, संदीप बबन बर्डे आणि त्याचे आठ ते नऊ साथीदार पठारवाडी येथे दरोड्याच्या तयारीत आहेत.
त्यानंतर पथकाने सापळा रचून कारवाई केली. पकडलेल्या टोळीकडून तलवार, लोखंडी कत्ती, लोखंडी पाईप, चाकू, लाकडी दांडे, मिरची पावडर पॅकेट, मोबाईल, वाहन असा 12 लाख 16 हजार 150 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निरीक्षक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार मखरे, फुरकान शेख, संदीप दरंदले, राहुल सोळुंके, सोमनाथ झांबरे, रोहित येमुल, आकाश काळे, शिवाजी ढाकणे, जालींदर माने, किशोर शिरसाठ, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, अरुण मोरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.