अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पारनेर तालुक्यातील हंगा परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत चार सराईत गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून कटावणी, अॅडजस्टेबल पान्हा, गलोल, दुचाकी असा सुमारे 50 हजार 900 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एक जण पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
रविवारी (21 डिसेंबर) रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांना सुपा ते पारनेर मार्गावर पाच इसम विनानंबरच्या दोन दुचाकीवर दरोड्याच्या उद्देशाने जाणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग यांच्यासह अंमलदार अतुल लोटके, बाळासाहेब नागरगोजे, आकाश काळे, सागर ससाणे व बाळासाहेब खेडकर यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना देण्यात आल्या. पथकाने सुपा-पारनेर रस्त्यावर सापळा रचून संशयित वाहनांची तपासणी सुरू केली. दरम्यान, दोन दुचाकी संशयास्पदरीत्या येताना दिसून आल्या. पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न करताच एका दुचाकीवरील संशयित पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र, दुसर्या दुचाकीवरील चौघांना ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या संशयितांचे नावे सगड्या उंबर्या काळे (वय 50), मिथुन उंबर्या काळे (वय 26), सार्थक सगड्या काळे (वय 23, तिघे रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा) व गणमाळ्या संजय चव्हाण (वय 23, रा. दिवटे मळा, वाघुंगे, ता. पारनेर) अशी आहेत. पळून गेलेल्या संशयिताचे नाव अजय सादिश काळे (रा. वाळुंज पारगाव, ता. अहिल्यानगर) असे आहे. संशयित आरोपींची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून एक लोखंडी कटावणी, एक लोखंडी अॅडजस्टेबल पान्हा, दोन गलोल तसेच एक दुचाकी असा एकूण 50 हजार 900 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुपा पोलीस करत आहेत.
तिघांवर गंभीर गुन्हे
अटक संशयित आरोपींपैकी तिघांविरूध्द यापूर्वी अहिल्यानगर व पुणे ग्रामीण जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सगड्या उंबर्या काळे याच्यावर तब्बल 13, मिथुन उंबर्या काळे याच्यावर सात तर सार्थक सगड्या काळे याच्यावर सहा गुन्ह्यांची नोंद आहे. या सर्व गुन्ह्यांमध्ये दरोडा, चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न आदी गंभीर कलमांचा समावेश आहे.




