मुंबई । Mumbai
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातातील मृत्यूच्या चौकशीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पवार कुटुंबातील आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता थेट रस्त्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी अपघाताच्या तपासावरून सरकारवर उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी “या विषयावर राजकारण करू नका” असा सल्ला दिला होता. आता या सूचनेला आमदार रोहित पवार यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, “मी पवार कुटुंबातच जन्माला आलो आहे आणि जन्मापासून माझे आडनाव पवार आहे. अजितदादा हे केवळ माझे नेतेच नव्हते, तर माझे काका होते. एका पुतण्याने आपल्या काकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे राजकारण नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची हीच इच्छा आहे की या अपघाताचा निष्पक्ष आणि योग्य तपास व्हावा; मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही.”
सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेचे समर्थन करत रोहित पवारांनी सरकारवर कडाडून हल्ला चढवला. “अजितदादांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई, सीआयडी किंवा बारामतीमध्ये एफआयआर दाखल होत नाही आणि त्यासाठी कर्नाटकला जावे लागत असेल, तर या सरकारला आणि प्रशासनाला लाज वाटली पाहिजे,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. सरकारमधील जे नेते दादांना मित्र मानत होते, ते आजपर्यंत त्यांना न्याय देऊ शकलेले नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
अजितदादांच्या गटातील ४० आमदारांवर निशाणा साधताना रोहित पवार म्हणाले की, “दादांना न्याय मिळावा आणि तपास सीबीआयकडे सोपवावा यासाठी या आमदारांना स्मरणपत्रे द्यावी लागत आहेत, तरीही त्यांच्या विनंतीला केराची टोपली दाखवली जात आहे. स्वाभिमानी लोक असते तर अशा परिस्थितीत लगेच सत्तेतून बाहेर पडले असते. पण स्वाभिमान जपणे प्रत्येकाला जमत नाही; त्यासाठी संघर्षाची तयारी असावी लागते. आम्ही विरोधात असलो तरी स्वाभिमानाने अजितदादांना न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरूच ठेवू.”




