मुंबई | Mumbai
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झाले. दरम्यान त्यांच्या मृत्यूनंतर आता हा अपघात होता की घातपात याबाबतचे प्रश्न उपस्थित होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत पत्रकार परिषद घेत विविध मुद्दे उपस्थित केले आहे. तसेच थातुरमातुर काही गोष्टी समोर केल्या तर महाराष्ट्र काय असतो आणि मराठी माणूस काय असतो ते दाखवून देऊ असेही रोहित पवार यांनी म्हटलेय. आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले असून यावेळी आमदार रोहित पवार यांनी अजित दादांबाबत आठवण काढली.
एका रुबाबात ते याठिकाणी यायचे
माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांना विचारण्यात आले की, अजितदादांना जाऊन जवळपास एक महिना होत आला आहे. अजितदादा गेल्यानंतर पहिलेच अधिवेशन होत आहे. याकडे तुम्ही कशापद्धतीने बघता, काय भावना आहेत तुमच्या? या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले की, दु:ख भावना आहे. एक तर समजत नाही, आता अधिवेशनामध्ये कसं बोलायचं? काय बोलायचं? तुम्हालाही माहिती कधी कधी माध्यमांशी संवाद साधत असताना अजितदादा माझ्या मागून जायचे तेव्हा ते मिश्किलपणे टोमणे देखील मला मारायचे. जेव्हा अजितदादा विभानभवन परिसरात येत असायचे तेव्हा आमदारांचा घोळका त्यांच्यासोबत असायचा. एका रुबाबात ते याठिकाणी यायचे. अधिवेशनात रोज पहिला माणूस किंवा पहिला नेता कोण येत असेल ते अजितदादा असायचे. तसेच अधिवेशनातून सगळ्यात शेवटी जाणारा कोण नेता असेल तर ते अजितदादा असायचे. असं एक व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही, अशी खंत रोहित पवार यांनी बोलून दाखवली.
थातुरमातुर तपास केल्यास मराठी माणूस काय ते दाखवून देऊ
“माझ्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. मराठी माणूस म्हणून अजितकाकांसाठी मी बोलत राहणार, लढत राहणार. थातुरमातुर तपास केल्यास मराठी माणूस काय ते दाखवून देऊ. शिस्त कशी पाळायची, मुद्देसुद कसं बोलायचं हे सगळं अजितदादा बघायचे. त्यामुळे एवढा मोठा नेता, एक मराठी माणूस, एक मराठी नेता आणि शिस्तप्रिय अनुभवी नेता आज आपल्या बरोबर नाही, त्यामुळे या अधिवेशनात येत असताना मनामध्ये कुठेतरी दु:ख होत आहे. पण त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली आहे, काहीही झालं तरी लढत राहायचे आणि त्यादृष्टीकोनातून आम्ही सर्वजण अधिवेशनात लोकांच्या वतीने, लोकांच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जे कुठले जमतील ते मुद्दे मांडून लढत राहू” असे रोहित पवार यांनी म्हटले.
सीआयडीला अपघाती मृत्यूचा तपास दिला गेला
सीआयडीला अजित पवारांच्या अपघाती मृत्यूचा तपास दिला गेला आहे. सीआयडीने महिनाभरात काय केले आहे? सीसीटीव्ही कॅमेराचे फूटेज ताब्यात घेतले आहे का? प्रमुख वैमानिक का बदलले गेले? अॅरोचा व्हॉट्स अॅप ग्रुप होता त्यावर गोष्टी समोर आल्या होत्या. अजितदादा कारने जाणार होते ते विमानाने का गेले? दोन थातुरमातुर रिपोर्ट दिले आहेत. आम्ही मात्र वाट पाहतो आहोत की काय प्रकारचा तपास केला गेला आहे याची वाट पाहतो आहोत. प्रमुख अहवाल येणं बाकी आहे असं कालच सांगण्यात येतं आहे. त्यात असणार आहे, काय गोष्टी समोर येतात ते पाहणं महत्त्वाचं आहे. सत्तेतल्या लोकांचे आणि VSR चे कसे संबंध आहेत ते देखील बघावं लागणार आहे.विमान चालवत असताना VSR कंपनीने काय चुका केल्या, सत्तेतल्या लोकांचे आणि या कंपनीचे कसे संबंध आहे याचे पुरावे आमच्याकडे आहे.





