अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
पाथर्डी आणि जामखेड पंचायत समितीमधून पात्र नसलेल्या, तसेच बोगस लाभार्थी दाखवून रोहयो योजनेतून विहिरींचा महाघोटाळा केल्याचा प्राथमिक अंदाजानूसार जिल्हा परिषद प्रशासनाने तीन गटविकास अधिकार्यांसह 21 कर्मचार्यांना नोटीस बजावल्या होत्या. या नोटिसांना संबंधीतांनी उत्तर दिलेले असून याप्रकरणातील एका-एका कर्मचार्यांने अंदाजे एक हजारांपेक्षा अधिक पानाचा खुलासा सादर केलेला आहे. या खुलाशाचे गाठोडे पाहून प्रशासन देखील चक्रावले आहे. दरम्यान, आलेल्या खुलाशापैकी काही खुलासे पाहून झाले असून उर्वरित पुढील काही दिवसांत तपासण्यात येणार आहेत. त्यानंतर याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
जामखेड, पाथर्डी पंचायत समितीमध्ये रोजगार हमी योजनेत मंजूर विहीरींच्याप्रकरणात अनियमितता, घोटाळा झाल्याचे जिल्हास्तरावर झालेल्या तपासणीत समोर आल्यानंतर जामखेडचे गटविकास अधिकारी, पाथर्डीचे दोन प्रभारी गट विकास अधिकारी अशा तीन अधिकार्यांसह दोनही तालुक्यातील 21 रोहयो कर्मचारी, लिपीक यांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. या दोनही तालुक्यात सुमारे 700 ते 750 रोहयोतील विहिरींचे बोगस प्रस्ताव अथवा पात्र नसताना विहीर मंजूर केल्याचे जिल्हास्तरावर रोजगार हमी विभाग, ग्रामपंचायत विभाग आणि अर्थ विभागाच्या अधिकारी-कर्मचार्यांनी केलेल्या तपासणीत समोर आले होते.
या प्रकरणातील एका विहिरीसाठी प्रत्येकी चार लाख रुपयांचे अनुदान आहे. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर रोहयोतील विहिरींसह अन्य व्यक्तीगत लाभाच्या योजनांसाठी एजंटगिरी करणार्या टोळीचे धाबे दणालेले आहे. पाथर्डी, जामखेड पाठोपाठ कर्जत पंचायत समितीमधून रोहयोतून मंजूर विहिरींच्या कामाची तपासणी करण्यात आलेली आहे. त्यात देखील प्राथमिक स्तरावर अनियमितता आढळलेली आहे. यामुळे याठिकाणी देखील गटविकास अधिकारी यांच्यासह कर्मचार्यांना नोटीस धाडण्यात आलेल्या आहेत.
दरम्यान, गेल्या आठ दिवसांत पाथर्डी आणि जामखेडच्या गटविकास अधिकारी यांच्यासह 21 कर्मचार्यांचे खुलासे जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. यात तीन गटविकास अधिकारी यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे तर उर्वरित कर्मचार्यांनी रोहयो विभागाकडे खुलासे सादर केलेले आहेत. विशेष म्हणजे नोटीसनुसार खुलास करणार्यामध्ये एका-एका कर्मचार्याने एक ते दीड हजार पानाचा खुलासा सादर केलेला आहे. तर गटविकास अधिकार्यांनी खुलाशाच्या फाईलींचे गाठोडेच सादर केलेले आहे. या गाठोड्यात काही हजार पानात केलेल्या खुलाशाचा अभ्यास प्रशासनाने सुरू केला असून नियमानुसार आपला अहवाल ते वरिष्ठांना सादर करणार आहेत. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
आठवडाभरात पुढील कार्यवाही
रोहयो योजनेत अनियमितता, बोगस लाभार्थी मंजूर केलेल्या अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून आलेल्या खुलाशाचा अभ्यास करून पुढील आठवड्यात कार्यवाही करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. खुलासे संयुक्तीक न वाटल्यास संबंधितांची आणखी सखोल तपासणीसह विभागनिहाय चौकशी होऊ शकते.