Thursday, May 2, 2024
Homeक्रीडाराउंड द विकेट : इंग्लंडचा हिसका, ऑस्ट्रेलियाला दणका!

राउंड द विकेट : इंग्लंडचा हिसका, ऑस्ट्रेलियाला दणका!

डॉ. अरुण स्वादी

अफगाणिस्तानविरुद्धचा ( Afghanistan )शुक्रवारचा चुरशीचा सामना जिंकून यजमान ऑस्ट्रेलियाने (Australia)आपले आजचे मरण उद्यावर ढकलले होते. काल शनिवारी इंग्लंडने अशाच चुरशीच्या ‘करो या मरो’ सामन्यात लंकेवर मात करून ऑस्ट्रेलियाचे मरण निश्चित केले. गेल्या स्पर्धेचे विजेते आणि या स्पर्धेचे संभाव्य विजेते म्हणून ज्यांच्या नावाचा उल्लेख होत होता त्या कांगारूंच्या संघाला या स्पर्धेतून बाद फेरीपूर्वी गाशा गुंडाळायला लागला.

- Advertisement -

आता या घडीला ङ्गअफ गटातून न्यूझीलंड आणि इंग्लंड हे संघ उपांत्य फेरीत खेळतील हे निश्चित झाले आहे. ‘ग्रुप ऑफ डेथ ‘म्हणून नाव ठेवलेल्या या गटात श्रीलंकाही शेवटच्या सामन्यापूर्वी काही काळ आपले आव्हान टिकवून होती. परंतु बिग फोरमधल्या त्यांच्या संघाचे लंकादहन आधीच झाले होते. त्यांना इंग्लंडचे दहन करता येईल का एवढेच कुतूहल होते.

इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेने जोरदार सुरुवात केली होती आणि सामन्याच्या पहिल्या दहा षटकात जबरदस्त फटकेबाजी करणार्‍या कुसल मेंडिस, पसुम निसांकामुळे इंग्लंडच्या गोलंदाजांची पाचावर धारण बसली होती, पण प्रथम आदिल रशीदने आपल्या फिरकीने त्यांना लगाम घातला आणि तेजतरार गोलंदाज मार्क वूड ने अठराव्या आणि विसाव्या शतकात लंकेच्या फलंदाजांच्या बॅटला बॉलसुद्धा लागू दिला नाही. तो नुसता 150 किलोमीटर वेगाने गोलंदाजी करत नाही तर त्याच्या बॉलिंगमध्ये खूप व्हेरिएशन तो तेज बाउन्सर टाकतो. तसा स्लो बाऊन्सरही आणि त्याच्याकडे अप्रतिम यॉर्कर आहे. त्यालाच ङ्गमॅन ऑफ द मॅचफ किताब मिळाला पाहिजे होता.

कारण जो श्रीलंकेचा संघ 170 ते 180 धावांपर्यंत पोहोचेल असे वाटत होते त्याला रडत-खडत 141 पर्यंत धापा टाकत पोचता आले. मला वाटते, सामना इथेच फिरला. इंग्लंडच्या गोलंदाजांची ही किमया फलंदाजांचे काम खूप सोपे करून गेले. मग काय बटलर आणि हेल्स या जोडीने तुफानी फटकेबाजी करत संघाच्या 75 धावा फलकावर लावल्या. त्यामुळे हा सामना लोकसभेच्या निवडणुका गेली काही वर्षे कशा एकतर्फी होतात तसे होणार असे दिसू लागले, पण प्रथम हसरंगाचा लेग स्पिन आणि त्यानंतर काही नेहमीचे, तर काही पार्ट टाईम स्पिनरनी इंग्लंडला जवळजवळ गोत्यात आणले. कठीण समय येता नेहमीच त्यांना बेन स्टोक कामाला येतो. याही वेळी तेच झाले. शांत चित्ताने एक बाजू लढवत आणि उगाच हिरो बनायचे नाटक न करता तो नेटाने खेळला. आणि म्हणून दुसर्‍या बाजूला विकेट जाऊनही इंग्लंडने सामना जिंकला.

या सामन्याची खेळपट्टी किंचित संत होती आणि चेंडू वळतही होता. अशी खेळपट्टी ऑस्ट्रेलियात मिळणे ही श्रीलंकेसाठी चैन होती. त्यांना त्याचा फायदा उठवता आला नाही ही गोष्ट वेगळी! इंग्लंडची गोलंदाजी उत्कृष्ट आहे यात शंकाच नाही. त्यांची फलंदाजी सखोल आहे हे तेवढेच खरे आहे, पण दडपण आल्यावर मातब्बर संघ सुद्धा कसे गोंधळून जातात हे आज इंग्लंडची फलंदाजी पाहताना जाणवले. आता त्यांची गाठ बहुतेक भारताशी पडेल. भारताला अर्थातच त्यासाठी झिंबाब्वेचा अडथळा दूर करायला लागेल, पण उपांत्य फेरीत पोहोचलेल्या चारही संघात जोश बटलरचा संघ उत्तम वाटतो.

त्यामुळे भारतासाठी हे आव्हान बिलकुल सोपे नाही. परंतु या स्पर्धेत आपण पाहत आलो आहोत की कोणताही संघ दुबळा नाही. ज्या दिवशी जो संघ चांगला खेळेल तो जिंकतो. त्यामुळे भारतालाही आशा आहेत. अर्थात हे सगळे जर-तरवर आहे. रविवारी संध्याकाळी त्याचा फैसला होईल, पण झिंबाब्वे विरुद्ध जर भारत पराभूत झाला तर त्यांना उपांत्य फेरीत पोचायचा नैतिक हक्क तसाही नाही असं मला वाटते. सध्या मात्र श्रीलंकेविरु्द्ध मिळवलेल्या विजयापेक्षा ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाची कशी जिरवली याच आनंदात बार्मी आर्मी सेलिब्रेशन करत असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या