Friday, May 3, 2024
Homeक्रीडाराऊंड द विकेट : क्षेत्ररक्षणही कच्चा दुवा

राऊंड द विकेट : क्षेत्ररक्षणही कच्चा दुवा

डॉ. अरुण स्वादी

टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेसाठी ( T20 World Cup) ऑस्ट्रेलियाला प्रयाण करण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने इंदोरमध्ये आपल्या भारतीय संघाला आरसा दाखवला आहे. आपली गोलंदाजी शेवटच्या काही षटकांमध्ये पार ढिसाळ बनते हे आता सार्‍या जगाने पाहिले आहे. त्यात विशेष असे काही उरलेले नाही. उलट आता प्रतिस्पर्धी संघ त्यांच्या फलंदाजीचे प्लॅनिंग या बक्षिसांची खैरात करणार्‍या पाच षटकांची आठवण ठेवूनच करतील. त्यातच बुमराहच्या अनुपस्थितीचे भलतेच संकट आपल्या टीमवर ओढवले आहे.

- Advertisement -

अजूनपर्यंत त्याच्याऐवजी कोण जाणार याविषयी भला मोठा सस्पेन्स आहे. बहुतेक मोहम्मद शामी जाईल, पण तो फिट आहे का ? सिराज फिट आहे, पण तो योग्य रिप्लेसमेंट आहे का? एकूण प्रश्नांचे मोहोळ उठले आहे हे मात्र खरे! उत्तरे अनेक आहेत, पण सही उत्तर काय हा खरा प्रश्न आहे. मला आणखी एक चिंता सतावते आहे. ऑस्ट्रेलियातील मैदाने मोठी असतात. त्यामुळे क्षेत्ररक्षण करणे वाटते तितके सोपे नसते. ग्राऊंड कव्हरेज ही तिथे कौशल्याची बाब बनलेली आहे. एशियन क्रिकेटपटू त्यांच्या देशात छोट्या मैदानावर खेळतात. त्यामुळे त्यांच्याकडे हे कौशल्य नसते.

शिवाय आपला एकूणच क्षेत्ररक्षणाचा दर्जा साधारण आहे. म्हणजे पासिंग मार्क्स द्यावेत असा आहे. याचा अर्थ क्षेत्ररक्षण वाईट आहे असे नाही, पण फिल्डिंगमध्ये जो एक स्पार्क लागतो तो मात्र निश्चितपणे मिसिंग आहे. रवींद्र जडेजा हा आमचा एकमेव आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्षेत्ररक्षक! दुसरा हार्दिक पंड्या! हे दोेघे सोडले तर चित्तथरारक झेल किंवा अफलातून रनआऊट करणारे क्षेत्ररक्षक आमच्याकडे जवळपास नाहीतच. उदाहरण द्यायचे झाले तर विराट कोहली हा 34 वर्षांचा आमचा खेळाडू व माजी कर्णधार बाकी उरलेल्या संघातला सर्वात चांगला क्षेत्ररक्षक! पण गेले वर्षभर आपण बघतो आहोत, विराट कोहलीसुद्धा आता पहिल्यासारखा इलेक्ट्रिफाईंग फिल्डर राहिलेला नाही.

काहीही म्हणा, कुठेतरी वाढलेले वय दिसतेच. त्यामुळे त्याला दोष देता येणार नाही. वाईट म्हणावेत असे क्षेत्ररक्षक आमच्याकडे बरेच आहेत. उदाहरणार्थ – अश्विन, युजवेंद्र चाहल, मोहम्मद शमी, मोहमद सिराज, राहुलसुद्धा…! अगदी आपले सन्माननीय कर्णधार रोहित शर्मादेखील यात मोडतात. हे सर्वजण अतिशय सामान्य क्षेत्ररक्षक आहेत. सामन्याला कलाटणी देणारा एखादा झेल किंवा एखादा अनपेक्षित रनआऊट करायची त्यांची क्षमता बेतास बात आहे. पाकिस्तान सोडला तर बाकीच्या टॉप संघांमध्ये किमान दोन तरी जोनाथन र्‍होड्स असतात की, जे आपल्या क्षेत्ररक्षणाने सामना उलट-पुलट करू शकतात. ऑस्ट्रेलियाकडे मॅक्सवेल आहे, ग्रीन आहे. दक्षिण आफ्रिकेकडे तर पुरी फौज आहे.

वेस्ट इंडिज कधी गचाळ क्षेत्ररक्षण करतात तर कधी अप्रतिम! पाकिस्तान मात्र आपली री ओढतो आहे. आपल्या पावलावर पाऊल टाकतो आहे. त्यांचे एकूणच क्षेत्ररक्षण सुमार आहे, पण त्यांची गोलंदाजी त्यांच्या दर्जाहीन क्षेत्ररक्षणावर पांघरूण घालते. ऑस्ट्रेलियात हे सुमार क्षेत्ररक्षक कशी चपळाई दाखवतात यावर आपले भवितव्य ठरू शकेल. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध आम्ही असंख्य झेल सोडले. काही तर गल्लीतल्या पोरांनी पकडले असते तेही आम्ही सोडले. धावबाद करायचे अनेक हाफ चान्सेस तर आम्ही उदार होऊन सोडून दिले. हे असले औदार्य विश्वचषक स्पर्धेत परवडणार नाही. याला उपाय काय? दुर्दैवाने याला काहीही ट्रिटमेंट नाही.

रोहित शर्मा, विराट कोहली, अश्विन, मोहमद शमी हे आता पस्तिशीतले खेळाडू काय सुधारणा करणार? राहुल, चहल हे तिशी पार केलेले खेळाडू आताच ‘अंगम गलितं’ बनले आहेत. त्यांच्यात तरी काही सुधारणा घडावी. आजकाल मुख्य कोचच्या दिमतीला प्रशिक्षकांची फौज असते. फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक असतोच. काही दिवसांनी झेल घ्यायच्या सरावासाठी एक प्रशिक्षक तर चेंडू कसा अडवायचा यासाठी एक कोच असू शकेल. फलंदाजांना कवर ड्राईव्ह मारायला आणि पूल करायला शिकवायला वेगवेगळे कोच ठेवले जातील. महत्त्वाचे हेच आहे की, ही मंडळी काही तरी सुधारणा घडवतात का? प्रथमदर्शनी तरी आमच्या क्षेत्ररक्षण विभागात काही सुधारणा झाल्याचे ‘याचि डोळा’ पाहायला मिळालेले नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियात ही मंडळी एकदम किवी टीम होतील ही शक्यता दुरापास्त आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या