Friday, May 17, 2024
Homeक्रीडाराऊंड द विकेट : फिरुनी पुन्हा जन्मेन मी...!

राऊंड द विकेट : फिरुनी पुन्हा जन्मेन मी…!

डॉ. अरुण स्वादी

विराट कोहलीच्या विराट खेळीमुळे भारताने पाकिस्तानवर चित्तथरारक व नाट्यपूर्ण विजय मिळवला हे खरेच, पण त्याच बरोबर विराटने त्याच्या विरोधकांची तोंडे सुतळीच्या टाक्याने शिवून टाकली आहेत.दक्षिण आफ्रिका दौर्‍यात नेतृत्व सोडल्यापासून विराट कोहली काही जणांच्या टीकेचा धनी ठरला होता. शिवाय त्याच्या धावांचा स्त्रोत कमी झाला होता. म्हणजे स्कोअर होत नव्हता असे नाही पण लाखाने पैसे मोजणारा शंभराचे बंडल मोजत होता, पण क्रिकेट जाणणार्‍या रसिक मंडळींना माहीत होते. विराट कोहली हे अजब रसायन आहे. त्याचा हरवलेला फॉर्म ही फक्त हंगामी गोष्ट आहे, पण तो पुन्हा येईल, खोर्‍याने धावा जमवेल आणि भारताला सामने जिंकून देईल…

- Advertisement -

विराटने थोडी जास्त प्रतीक्षा करायला लावली, पण ‘देरसे आये दुरुस्त आये’या उक्तीप्रमाणे तो आला आणि पाकिस्तानच्या तोंडातला घास पळवून त्याने भारताला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. म्हणतात ना.. बादशाह आखिर बादशाह होता है. विराटच्या तुलनात्मक अपयशाविषयी बोलताना बर्‍याच जणांची जीभ घसरली होती. काहींनी त्याला निवृत्त व्हायचा सल्ला दिला होता. काहींनी त्याचे क्रिकेटवर लक्ष्य नसल्याचे भाष्य केले होते. माजी क्रिकेटपटूंनी तर त्याच्या टेकनिकची चाळण केली होती. कोणी म्हणायचे, तो चेंडूवर उशिरा येतोय तर कोणी म्हणायचे लवकर! त्याची ऑफस्टंप हा तर बर्‍याच जणांच्या चेष्टेचा विषय बनला होता. .

काही दिवसांपासून तज्ज्ञ मंडळी म्हणत होती तो इनकमिंग बॉलवर फसतोय. हे सगळे ऐकल्यावर वाटले, विराट कोहलीचा युजवेंद्र चाहल झालाय, पण कर्णधार रोहित आणि टीम मॅनेजमेंटचा विराटवर पूर्ण विश्वास होता. या एका खेळीने विराटने आपण किस मिट्टी के बने है हे जगाला दाखवून दिले. त्यामुळेच सामना जिंकल्यावर त्याने आत्तापर्यंत कधीही केले नाही असे जोरदार सेलिब्रेशन केले. सुरुवातीला जेव्हा शाहीन आफ्रिदी आणि नसीम आग ओकत होते तेव्हा एक कव्हर ड्राईव्ह सोडला तर विराटने फारसा कोणताही आक्रमक फटका मारला नाही.

तो शांतपणे वणवा विझायची वाट पहात बसला.त्याने मोजून 11 डॉट बॉल खेळून काढले. कोहलीचा फॉर्म पुरता आहे यावर शिक्कामोर्तब करावे असे काही जणांना वाटू लागले होते. तेराव्या शतकापर्यंत सामना भारतापासून खूप दूर निघून गेला आहे असे वाटू लागले होते. त्यात विराट स्पिनरना पण जपून खेळत होता. ते जरा अति होतेय असे वाटू लागले होते, पण अचानक विराटने गिअर बदलले आणि आक्रमक रुख अपनाया. दुसर्‍या बाजूने हार्दिक पांड्या जोर लावत होताच. तरीही शेवटच्या तीन षटकापर्यंत भारत हा सामना जिंकेल, अशी शक्यता बिलकुल वाटत नव्हती. एकोणिसाव्या शतकात उरलेल्या दोन चेंडूंनी भारतीय संघाचे नशीब बदलले. तोपर्यंत भारताचा कर्दनकाळ ठरलेला रौफ जबरदस्त गोलंदाजी करत होता. त्याचा पाचवा चेंडू स्लोर वन होता. 150 किलोमीटरने गोलंदाजी करणारा बोलर अचानक स्लोअर वन टाकतो तेव्हा तो खेळायला अवघड असतो. त्यावर विराटने लाँग ऑनला षटकार खेचला मेलबर्नला स्ट्रेट बाउंड्री स्क्वेअर बाऊंड्रीपेक्षा थोड्या जवळ असतात हे ऐतिहासिक सत्य त्याला माहीत होते.

हरिस रौफ थोडा गडबडलाय हे त्याच्या लक्षात आले होते. शेवटचा वेगवान चेंडू किंचित दिशाहीन होता. बस विराटने तो फाईन लेग बाउंड्रीवर अक्षरशः फेकून दिला आणि आठ चेंडूत 28 धावांचे गणित 6 चेंडूत 16 वर आणले. इथे पहिल्यांदा भारत जिंकेल असे वाटले. काही नाट्यमय घटना घडल्या पण शेवटच्या चेंडूवर भारताने सामना जिंकला. विराटची ही इनिंग सर्वोत्कृष्ट असावी असे बहुतेकांना वाटते. त्यालाही तसेच वाटते. आमच्या कर्णधाराला तर ती भारताची सर्वोत्कृष्ट विजयी खेळी वाटते आणि ते बरोबरही आहे कारण एक म्हणजे सामना पाकिस्तान बरोबरचा, विश्वचषक स्पर्धेतल्या एक लाख प्रेक्षकांसमोरचा, त्यांच्या बलाढ्य गोलंदाजांबरोबरचा, शिवाय तो जवळ जवळ हरलेला होता. तरीही तो विराटने खेचून आणला.

त्याबरोबरच आणखी एक गोष्ट महत्त्वाची ठरते ती म्हणजे विराटचा एकूणच फॉर्म गेल्या दोन वर्षांमध्ये फारसा चांगला नव्हता. विशेषत: हे टी-20 मध्ये जास्त जाणवायचे. म्हणजे भरात असताना तो हा डाव खेळला नाही तर फॉर्मशी झुंजत असताना तो इतके अफलातून खेळला आणि सामन्याचा निकालही महत्वाचा होता. त्याच्या या खेळीनंतर विराटबद्दल व त्याच्या फॉर्मबद्दल होणार्‍या चर्चा काही काळ तरी थांबतील अशी आशा आहे. भारत हा विश्वचषक जिंकेल किंवा नाही याबद्दल आत्ताच काही बोलणे योग्य नाही, पण या एका डावाने भारताला या स्पर्धेत आशा आहेत, एवढे तरी प्रत्ययास आले. विराटचे मोठेपण हेच की त्याने ‘फिरूनी पुन्हा जन्मेन मी’ हे सिद्ध केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या