अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात भक्तिरसाने भारलेले वातावरण असताना, सावेडी परिसरात पारंपरिक श्रध्दा आणि सेवाभावाची अमूल्य परंपरा जोपासणार्या सद्गुरु श्री गंगागिरी महाराज पायी दिंडीच्या रिंगण सोहळ्याने भक्तिभावाचा नवा अध्याय साकारला. गेल्या 35 वर्षांपासून दिंडी सोहळ्याचे आयोजन व वारकर्यांची सेवा यामध्ये निःस्वार्थपणे कार्यरत असलेल्या कै. नानासाहेब बारस्कर कुटुंबियांच्या वतीने यंदाही भाविकांचे स्वागत मोठ्या आदराने करण्यात आले.
रिंगण सोहळ्याची सुरूवात विधीवत पालखी पूजनाने झाली. प्रमुख उपस्थितीत महंत रामगिरी महाराज यांनी मार्गदर्शन करताना संत परंपरेचे स्मरण करून दिले. त्यांनी सांगितले, पांडुरंगाच्या भक्तीतूनच खरे सुख आणि समाधान लाभते. संत गंगागिरी महाराज यांना ज्ञानेश्वरी आणि वारीची अतिशय गहिरी आस्था होती. ही परंपरा आजही पायी दिंडीच्या माध्यमातून श्रध्देने पुढे नेली जाते. महाराष्ट्राला संतांची अनमोल परंपरा लाभली आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक अस्थिरता वाढली असून, ती शांती वारकरी संप्रदाय देतो.
हा संप्रदाय जात-पात न पाहता सर्वांना आपले मानतो, असे ते म्हणाले. रिंगण सोहळ्यावेळी उंच उंच पताका, टाळ-मृदंगाचा अखंड निनाद, विठ्ठलनामाचा घोष, महिला व पुरूष भक्तांचा ओघ, विविध वयोगटातील वारकर्यांचा उत्साह – या सर्वांनी परिसराला एक विलक्षण आध्यात्मिक तेज प्राप्त करून दिले. सोहळ्यात आ. संग्राम जगताप, भिमाबाई बारस्कर, बाळासाहेब बारस्कर, दिपाली बारस्कर, सचिन बारस्कर, सतीश बारस्कर, अनिल बोरूडे, धनंजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
महिपती महाराजांच्या दिंडीचे गोल रिंगण रंगले
चितळे रस्ता येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात चौपाटी कारंजा मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने सालाबाद प्रमाणे ताहाराबाद (ता. राहुरी) येथील श्री संतकवी महिपती महाराज दिंडीचे भक्तिपूर्ण वातवरणात विठ्ठलनामाच्या जयघोषात उत्साहात स्वागत करण्यात आले. यानिमित्त चौकात आकर्षक सजावट करून राम, कृष्ण व हरीच्या मुर्त्या तसेच पांडुरंग रूक्मिणी च्या मुर्त्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी दिंडीतील वारकर्यांनी चौकात गोल रिंगण केले. टाळ पखवाजाच्या व हलगीच्या तालात रिंगणास सुरवात झाली. यावेळी भगवे झेंडेकरी, दिंडीतील अश्व रिंगणात दौडले. सुमारे तास भर चाललेले हे रांगण याची देहे याची डोळा रांगण पाहून उपस्थित नगरकर सुखावले.




