Tuesday, July 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजTrimbakeshwar : साधूग्राम आणि घाट परिसराचे सुरक्षित व सक्षम नियोजन करावे -...

Trimbakeshwar : साधूग्राम आणि घाट परिसराचे सुरक्षित व सक्षम नियोजन करावे – मंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar

पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील साधूग्राम आणि घाट परिसराचे नियोजन आतापासूनच सुनियोजित पद्धतीने करण्याचे निर्देश कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. कुंभमेळा आणि पावसाळा एकाच कालावधीत येणार असल्याने अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

- Advertisement -

मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी दुपारी त्र्यंबकेश्वर येथील नियोजित साधूग्राम, अहिल्या नदीकाठ आणि घाट परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा आढावा घेतला. यावेळी नाशिकच्या महापौर आडके-आहेर, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा तुंगार, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, सहायक जिल्हाधिकारी डॉ. पवन दत्ता, तहसीलदार गणेश जाधव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव तसेच माजी नगराध्यक्ष कैलास घुले उपस्थित होते.

पाहणीदरम्यान नियोजित साधूग्राम परिसरात पावसाचे पाणी साचल्याचे निदर्शनास आले. याची गंभीर दखल घेत महाजन यांनी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान अशाच प्रकारची अतिवृष्टी झाल्यास साधू-महंत, भाविक आणि प्रशासनाला कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी पावसाच्या पाण्याचा निचरा, जलनिस्सारण व्यवस्था आणि अन्य आवश्यक नियोजन तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

यावेळी त्यांनी नदीपात्रात उभारण्यात येत असलेल्या नवीन घाटांच्या कामांचीही पाहणी केली. घाटांचे बांधकाम दर्जेदार, सुरक्षित आणि पूरस्थितीचा विचार करून करण्यात यावे, तसेच आवश्यक त्या संरक्षणात्मक उपाययोजना राबविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

साधूग्राम परिसरात भविष्यात पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन पर्यायी जागेचीही पाहणी करण्यात आली. संभाव्य धोके टाळण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने नियोजन करून सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुरक्षित व सक्षम व्यवस्था उभारावी, असे निर्देश मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

ताज्या बातम्या

आरटीओतील गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai परिवहन (आरटीओ) विभागातील गैरव्यवहार, कर चुकवेगिरी आणि त्यातील अनियमिततांच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी...