Tuesday, February 3, 2026
HomeनगरShirdi : गुरुपौर्णिमेनिमित्त साईनगरीत लाखो भक्तांचा महासागर

Shirdi : गुरुपौर्णिमेनिमित्त साईनगरीत लाखो भक्तांचा महासागर

उत्सवाला 117 वर्षांची परंपरा || साईनामाच्या जयघोषाने शिर्डी दुमदुमली

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबांना गुरु मानून त्यांच्याप्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी देशभरातील कानाकोपर्‍यातून आलेल्या लाखो भक्तांच्या महासागराने शिर्डी नगरी दुमदुमून गेली आहे. 1908 साली स्वतः साईबाबांच्या अनुमतीने सुरू झालेल्या या उत्सवाला 117 वर्षांची परंपरा आहे. यंदा गुरुवारीच गुरुपौर्णिमा आल्याने या दुहेरी योगावर साईनामाचा गजर करत सुमारे तीन लाख भाविक साईसमाधीपुढे नतमस्तक झाल्याचा अंदाज आहे. भक्तांच्या अलोट गर्दीमुळे साईसंस्थानने उभारलेली दर्शन रांग प्रथमच ओसंडून रस्त्यावर आल्याचे चित्र दिसले.

- Advertisement -

उत्सवानिमित्त साई समाधी मंदिर, द्वारकामाई, चावडी आणि गुरुस्थान मंदिराला आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे. साईबाबांच्या मूर्तीला सुवर्ण आभूषणे घालण्यात आली असून बाबांचे हे मनोहारी रूप डोळ्यांत साठवताना अनेक भाविक भारावून जात आहेत. साईसमाधी मंदिराबरोबर श्रीसाईंच्या गुरुस्थान मंदिरातही भाविकांची रांग लागली. पहाटे अखंड पारायणाची समाप्तीनंतर साईबाबांची प्रतिमा, पोथी आणि वीणा यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संस्थानच्या तदर्थ समितीच्या अध्यक्षा न्यायाधीश अंजु शेंडे यांनी पोथी, सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी वीणा तर डेप्युटी सीईओ भिमराज दराडे व मेकॅनिकल विभाग प्रमुख अतुल वाघ यांनी प्रतिमा धरून सहभाग घेतला.

YouTube video player

यावेळी प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, मंदिर विभाग प्रमुख विष्णु थोरात, जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे, मंदिर पुजारी, ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री साडेसात वाजता प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा साई संध्या हा कार्यक्रम झाला. रात्री श्रींच्या रथाची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. भक्तांची प्रचंड गर्दी लक्षात घेता सामान्य भाविकांना सुलभ दर्शन व्हावे, यासाठी व्हीआयपी ब्रेक दर्शन व्यवस्था बंद ठेवण्यात आली. अधिकाधिक भक्तांना दर्शनाचा लाभ घेता यावा म्हणून साई मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले. पुणे, मुंबई, नाशिक अशा विविध शहरांतून आलेल्या शेकडो पालख्यांमुळे शिर्डीतील सर्व मुख्य रस्ते गर्दीने फुलून गेले.

गुरुचरणी आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक भाविकांनी यथाशक्ती गुरुदक्षिणा अर्पण केली. एका भक्ताने 59 लाख रुपये किमतीचा 566 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट, तर दुसर्‍या भक्ताने 3 लाख 5 हजार रुपये किमतीचे 54 ग्रॅम वजनाचे सोन्याचे फूल (ब्रॉच) अर्पण केले. तसेच एका भक्ताने 2 किलो वजनाचा चांदीचा हारही साईचरणी दान केला. याशिवाय देणगी काउंटर आणि दानपेट्यांमध्येही भक्तांनी भरभरून दान दिले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेत पक्षातंर्गत सव्वा-सव्वा वर्षाचा फॉम्युला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या (सोमवार) दिवशी, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीने सत्तेचा स्पष्ट फॉर्म्युला...