शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
श्री साईबाबा संस्थानच्यावतीने या वर्षीही गुरुवार दि. 14 ते रविवार दि. 17 ऑक्टोबर 2021 या कालावधीत करोनाच्या पार्श्वभूमीवर श्री साईबाबांचा 103 वा श्रींचा पुण्यतिथी उत्सव प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
श्रीमती बानायत म्हणाल्या, यावर्षीही करोना व्हायरसच्या संकटामुळे शासनाच्यावतीने लॉकडाऊन करण्यात आला होता. राज्य शासनाने 7 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे काही अटी-शर्तीवर खुले करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार शासनाच्या मार्गदर्शन तत्वांवर श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहे. परंतु अजून करोना व्हायरसचे सावट संपलेले नसल्यामुळे गुरुवार 14 ते रविवार 17 ऑक्टोबर या कालावधीत साजरा करण्यात येणारा श्रींचा पुण्यतिथी उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे.
तसेच श्रींचा पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी रुढी परंपरेनुसार भिक्षाझोळीचा कार्यक्रम होत असतो. त्याअनुषंगाने उत्सवाच्या मुख्य दिवशी आयोजित करण्यात येणार्या भिक्षा झोळीकरिता गावकरी व साईभक्तांकडून भिक्षा स्विकारण्याकामी मंदिर परिसरातील गेट नंबर 4, पिंपळवाडी रोड गेट नंबर 2, चावडी समोर, नाट्यगृहा शेजारी तसेच साईनगर मैदान येथे काऊंटर्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. तरी गावकरी व साईभक्तांनी भिक्षाझोळीत दान भिक्षा देताना मास्कचा वापर करावा व सामाजिक अंतरासंदर्भातील नियमांचे पालन करुन भिक्षा झोळी काऊंटरवर दान भिक्षा जमा करावी. तसेच संस्थानचे संरक्षण व दान भिक्षा स्विकारणारे कर्मचार्यांना सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात येत आहे.
श्रींच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त उत्सवाच्या प्रथम दिवशी गुरुवार दि. 14 रोजी पहाटे 4.30 वाजता श्रींची काकड आरती, पहाटे 5 वाजता श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे 5.15 वाजता व्दारकामाईत श्री साईसच्चरिताचे अखंड पारायण, पहाटे 5.20 वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी 6 वाजता श्रींची पाद्यपूजा, दुपारी 12.30 वाजता माध्यान्ह आरती, दुपारी 4 ते 6 कीर्तन समाधी मंदिरातील स्टेजवर होणार आहे. सायंकाळी 6.15 वाजता धुपारती होईल. रात्री 10.30 वाजता श्रींची शेजारती होणार आहे. त्यानंतर समाधी मंदिर बंद केले जाईल, परंतु श्री साईसच्चरित अखंड पारायण श्री द्वारकामाई मंदिरात रात्रभर चालू राहील.
शुक्रवार दि. 15 हा श्रींचे पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवस आहे. या दिवशी पहाटे 4.30 वाजता श्रींची काकड आरती, पहाटे 5 वाजता अखंड पारायण समाप्ती, श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे 5.15 वाजता श्रींचे मंगल स्नान, सकाळी 6 वाजता श्रींची पाद्यपूजा, सकाळी 8.30 वाजता लेंडीबागेत शताब्दी ध्वजारोहण कार्यक्रम होईल. सकाळी 9 ते 11.00 वाजता भिक्षा झोळी, 10 वाजता कीर्तन तसेच सकाळी 10.30 वाजता श्रींचे समाधी समोर आराधना विधीचा कार्यक्रम होईल. दुपारी 12.30 वाजता माध्यान्ह आरती तर सायंकाळी 5 वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्लंघन कार्यक्रम, सायंकाळी 6.15 वाजता धुपारती होईल. तर रात्री 10.30 वाजता श्रींची शेजारती होईल.
उत्सवाच्या तृतिय दिवशी शनिवार दि. 16 रोजी पहाटे 4.30 वाजता काकड आरती, सकाळी 5.05 वाजता श्रींचे मंगल स्नान, 6 वाजता श्रींची पाद्यपूजा होईल. दुपारी 12.10 वाजता श्रींची माध्यान्ह आरती, दुपारी 4 ते 6 कीर्तन समाधी मंदिरातील स्टेजवर होणार आहे. सायंकाळी 6.15 वाजता श्रींची धुपारती होऊन रात्री 10.30 वाजता शेजारती होईल.
उत्सवाच्या सांगता दिवशी रविवार दि. 17 रोजी पहाटे 4.30 वाजता काकड आरती, सकाळी 5.05 वाजता श्रींचे मंगलस्नान, 6 वाजता श्रींची पाद्यपूजा, 6.30 वाजता गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा होईल. 10 वाजता गोपाळकाला कीर्तन व दहीहंडी, दुपारी 12.10 वाजता श्रींची माध्यान्ह आरती, सायंकाळी 6.15 वाजता श्रींची धुपारती होऊन रात्रौ 10.30 वाजता शेजारती होणार असल्याचे सांगून उत्सव कालावधीतील सर्व विधी मर्यादित संख्येने सामाजिक अंतराचे पालन करून करण्यात येणार असल्याचेही श्रीमती बानायत यांनी सांगितले.
हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब शिंदे, प्रशासकीय अधिकारी सर्वश्री डॉ. आकाश किसवे, दिलीप उगले, संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी हे प्रयत्नशिल आहेत.