शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
रक्षाबंधन निमित्त छत्तीसगडमधील बिलासपूर येथील साईमाऊली परिवाराकडून श्री. प्रबोधराव यांनी साईबाबांना 35 किलो वजनाची 36 फूट लांब व 5 फूट रुंद अशी भव्य राखी समर्पित केली. याबद्दल प्रबोधराव यांनी सांगितले, ही राखी कलाकार दिलीप दिवाकर पात्रीकर यांनी 10 दिवसांत बनवली. यामध्ये फायबर प्लाय, मोती, जरी, बुटी आदींचे काम करण्यात आले आहे. साईनाथांनी लक्ष्मीबाईंना दिलेली नऊ नाण्याची थीम या राखीमध्ये समाविष्ट केली आहे. प्रत्येक नाणे श्रीमद भागवत आणि श्री रामचरितमानस यांच्या नवविधा भक्तीचे एक वैशिष्ट्य दर्शवते तेच या राखीमध्ये समाविष्ट केले आहे.
या राखीचे श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या पत्नी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व त्यांच्या सुविद्य पत्नी तसेच राखी देणगीदार साईभक्त प्रबोधराव यांच्याहस्ते विधिवत पूजन करून अर्पण करण्यात आले. यावेळी मंदिर विभागप्रमुख विष्णू थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी व कर्मचारी उपस्थित होते. आजवरच्या इतिहासात साई समाधी मंदिरात साईबाबांना रक्षाबंधनाच्या दिवशी हातात राखी बांधन्यात येते.
परंतु भाविकांच्या अपार श्रद्धेपोटी पहिल्यांदाच इतकी भव्य आकर्षक राखी मंदिरात व मंदिराच्या बाहेर छत्तीसगड येथील भाविकाने अर्पण केली आहे. या राखीचे अनेक भाविकांनी दर्शन घेतले तर छत्तीसगड अर्थात छत्तीस फूट लांब व पस्तीस किलो वजनाची राखी ही रक्षाबंधनाच्या दिवशी भाविकांचे मुख्य आकर्षण ठरली आहे. या राखीच्या संकल्पनेची साई संस्थानने प्रशंसा करत या देणगीदाराचा सन्मानही केला आहे.