शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
जगप्रसिद्ध शिर्डी साईबाबा मंदिरात सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे वातावरण तापले आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय काळे आणि शिर्डी नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी साईबाबा संस्थान प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे साईभक्तांमध्ये नाराजी पसरली असून, आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांच्या आरोपानुसार, मंदिरात समाधीजवळ एका अनोळखी महिलेने मंदिर प्रमुख आणि लिपिकांच्या उपस्थितीत ड्रॉवरमध्ये काहीतरी ठेवल्याची घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे, यावेळी सुरक्षा व्यवस्थेने तिला अडवले नाही. उलट अधिकार्यांनी ती वस्तू स्वीकारली, असा आरोप आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मागितल्यानंतरही महिनाभर कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर आंदोलनाचा इशारा दिल्यावर प्रशासनाने, त्या महिलेने अत्तराची बाटली आणि मोराचे पीस दिले, असे उत्तर दिले.
यावर काळे यांनी प्रश्न उपस्थित केला की, जर ती अत्तराची बाटली नसून सोने किंवा गुंगीचे औषध असते तर काय झाले असते? समाधीपासून अवघ्या दहा फुटांवर सुरक्षा व्यवस्था का अपयशी ठरली? अनोळखी व्यक्तीकडून मंदिर प्रमुखांनी वस्तू का स्वीकारली? अत्तर असो वा सोनं, लाच म्हणजे लाचच, असे स्पष्ट मत काळे यांनी मांडले. जर न्याय मिळाला नाही, तर द्वारकामाईसमोर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याच प्रकरणात शिर्डी नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी थेट मंदिर प्रमुखांवरच बोट ठेवले आहे. त्या दिवशी ड्रॉवरमध्ये काय ठेवले, याचा व्हिडिओ दाखवा, अन्यथा गुरुवारपासून उपोषण करेन, असा इशारा त्यांनी दिला आहे. भ्रष्ट अधिकार्यांना पाठीशी घालून गरीब कर्मचार्यांवर कारवाई करणे योग्य नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
या प्रकारामुळे साईभक्तांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. साईबाबांच्या पैशातून गाड्या, विमान प्रवास, पंचतारांकित हॉटेल्समध्ये राहणे आणि समाधीजवळ भ्रष्टाचार? भक्तांनी कोणावर विश्वास ठेवायचा? असे प्रश्न मोठ्या आवाजात विचारले जात आहेत. आंदोलने आणि उपोषणाची टांगती तलवार असताना, जर साई संस्थान प्रशासनाने सत्य समोर आणले नाही, तर भक्त रस्त्यावर उतरतील, असे स्पष्ट दिसत आहे. या घटनेमुळे शिर्डीच्या दरबारातील भ्रष्टाचार, बेफिकीरी आणि सत्तेच्या गोंधळाचा पर्दाफाश झाला आहे.




